१६४० साली बार्बाडोसमध्ये मोठ्या प्रमाणात उसाची लागवड आणि साखर उत्पादन सुरू झाले. याने बार्बाडोसमधील सामाजिक जीवनात, अर्थव्यवस्थेत व भौगोलिक घटकांतही आमूलाग्र बदल घडवले. साखर उत्पादन हा मोठा किफायतशीर उद्योग आहे, हे लक्षात आल्यावर ब्रिटिश व इतर युरोपीयांनी बार्बाडोसमधील लहान शेतकऱ्यांच्या १५-२० एकरांपर्यंतच्या शेतजमिनी सरसकट चढ्या किमतींना विकत घ्यायचा सपाटा लावला. त्यांवर मोठ्या ऊसमळ्यांची लागवड बार्बाडोसमध्ये सर्रास सुरू झाली. ऊसमळ्यांवर मोठ्या संख्येने मजुरांची आवश्यकता असते. मळेवाल्यांनी आफ्रिकेतून गुलाम आणून मजुरांची उणीव भरून काढली. पुढे ऊसमळे जसे वाढू लागले तसे आफ्रिकी गुलामांची संख्या बरीच वाढली. बहुतेक आयरिश कामगार बार्बाडोस सोडून इतरत्र गेले आणि ब्रिटिश व इतर युरोपीय लहान शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतजमिनी ऊसमळेवाल्यांना विकल्यावर ते जमैका आणि इतर बेटांवर स्थायिक झाले. त्यामुळे बार्बाडोसमध्ये कृष्णवर्णीय गुलामांची संख्या श्वेतवर्णीय इंग्रजांपेक्षा वाढतच गेली. १६४४ साली तेथील ३० हजार लोकसंख्येपैकी ८०० आफ्रिकी गुलाम आणि बाकी इंग्रज व आयरिश होते. १७२४ साली परिस्थिती बदलून तिथे ५५ हजार आफ्रिकी गुलाम आणि १८ हजार गोरे इंग्रज होते!

कष्टाचे आणि हलाखीचे जीवन कंठणाऱ्या गुलाम मजुरांनी अनेक वेळा बंड, निदर्शने केली. पुढे १८३३ मध्ये ब्रिटिश साम्राज्यात गुलामगिरी कायद्याने बंद झाल्यावर हे मुक्त झालेले गुलाम उसाच्या मळ्यांमध्ये कामगार म्हणून काम करू लागले. बार्बाडोसमध्ये सर्व राजकीय सूत्रे व अर्थव्यवस्था गोऱ्या मळेवाल्यांच्याच हातात होती. मळ्यांतल्या आफ्रिकी कामगारांच्या तक्रारींची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने एक चौकशी समिती बार्बाडोसला पाठवली. या समितीने दिलेल्या अहवालानुसार ब्रिटिश सरकारने आफ्रिकी कामगारांसाठी अनेक सुविधा देऊन त्यांना बार्बाडोसच्या अंतर्गत प्रशासकीय निवडणुकांत मतदानाचे हक्कही प्राप्त करून दिले. त्यामुळे १९५० पासून हे आफ्रिकी कामगार बार्बाडोसच्या अंतर्गत राजकारणात महत्त्वाचा सहभाग नोंदवू लागले. – सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com