ब्रिटिशांनी १९६७ साली नेदरलॅण्ड्स ऊर्फ हॉलंडशी एक करार केला. या करारान्वये ब्रिटिशांनी सुरीनाममधील स्वत:च्या ताब्यातील प्रदेश हॉलंडला देऊन हॉलंडच्या कब्जातील उत्तर अमेरिकेतील न्यू अ‍ॅमस्टरडॅम ही वसाहत घेतली. पुढे ब्रिटिशांनी न्यू अ‍ॅमस्टरडॅमचे नाव बदलून ‘न्यू यॉर्क’ केले. हॉलंडच्या अमलाखाली आल्यावर सुरीनाम ही थोड्याच काळात डच मळेवाल्यांची बागायती शेतीची समृद्ध वसाहत बनली. ऊस मळ्यांबरोबरच इथे अनेक साखर कारखानेही सुरू झाले. साखरेची निर्यात हे सुरीनामचे उत्पन्नाचे प्रमुख साधन असले, तरी त्याच्या जोडीने कॉफी, कोको, कापूस, नीळ व लाकूड यांचीही मोठी निर्यात येथून होत असे. १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत सुरीनामच्या लोकवस्तीत बहुतांश वस्ती पश्चिम आफ्रिकेतून आलेल्या गुलामांची होती. इथे स्थायिक झालेल्या युरोपीयांमध्ये डच, फ्रेंच, जर्मन, ज्यू, ब्रिटिश हेही थोड्याबहुत प्रमाणात होते. पुढे सुरीनामच्या मळेवाल्यांनी काही चिनी मंडळी कामगार म्हणूनही आणली.

१८६३ साली सुरीनामच्या डच वसाहत सरकारने कायद्याने गुलामगिरी बंद केली. मुक्त झालेल्या काही गुलामांनी छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले, तर काही मुक्त गुलामांना डच मळेवाल्यांनी काही वर्षांच्या कराराने मक्तेदारीवरचे कामगार म्हणून नियुक्त केले. मात्र, सर्व गुलाम मुक्त झाल्यामुळे मळेवाल्यांना कामगार, मजुरांची मोठीच कमतरता भासू लागली. डच सरकारने मग भारतातून ब्रिटिशांच्या परवानगीने पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार या भागातून शेकडो कामगार आणि मजूर सुरीनाममध्ये आणले. काही थोडे मजूर इंडोनेशियातूनही आणले गेले. सुरीनामच्या मळेवाल्यांनी त्यांची उसाची लागवड आणि साखरनिर्मिती उत्तमरीत्या विकसित केली.

पुढे २० व्या शतकाच्या सुरुवातीस सुरीनामच्या भूगर्भात बॉक्साइट हे खनिज सापडले. बॉक्साइटपासून अ‍ॅल्युमिनियम मिळते. १९१६ मध्ये ‘अ‍ॅल्युमिनियम कंपनी ऑफ अमेरिका’ने सुरीनामच्या काही प्रदेशातील खाणींमधून बॉसाइट काढून त्यातल्या अ‍ॅल्युमिनियम शुद्धीकरणाचा मक्ता घेतला. तोपर्यंत सुरीनाम ही केवळ डच मळेवाल्यांची वसाहत म्हणून हॉलंड त्याकडे पाहात होता. परंतु बॉक्साइटच्या शोधामुळे हॉलंड सरकारने १९३९ मध्ये बिलिटन ही डच खाणकाम कंपनी सुरीनाममध्ये सुरू केली.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com