News Flash

मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव

मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राची स्थापना सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यातील पाडेगाव येथे १९३२ या वर्षी झाली. उसाचे अधिक उत्पन्न व साखर उतारा देणाऱ्या जातींची निर्मिती करणे,

| January 22, 2013 12:07 pm

मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राची स्थापना सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यातील पाडेगाव येथे १९३२ या वर्षी झाली. उसाचे अधिक उत्पन्न व साखर उतारा देणाऱ्या जातींची निर्मिती करणे, ऊस लागवडीसंबंधी किफायतशीर तंत्रज्ञान विकसित करणे या कामात संशोधन केंद्र सतत कार्यरत आहे. आजपर्यंत या संशोधन केंद्राने महाराष्ट्रात लागवडीसाठी उसाच्या १३ जाती प्रसारित केल्या आहेत. त्यापकी नऊ जाती अजूनही कमीअधिक प्रमाणात राज्यात लागवडीखाली आहेत. या संशोधन केंद्राने १९९६ या वर्षी शिफारस केलेल्या को-८६०३२ या एकाच जातीने राज्यातील ऊस लागवडीखालील क्षेत्रापकी जवळजवळ ६० टक्के क्षेत्र व्यापले आहे.
केंद्राने लागवड पद्धती, खत व्यवस्थापन, आंतरपिके, पाणी व  व्यवस्थापन, ठिबक व तुषारसिंचन पद्धती, तण व्यवस्थापन, खोडवा व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, जैविक खते, माती, पाणी व रसायनशास्त्र अशा अनेक महत्त्वाच्या बाबींसंबंधी मोलाचे संशोधन केले आहे. २००७ साली केंद्राने खारवट चोपण जमिनीत चांगली वाढणारी, पाण्याचा ताण सहन करणारी व अधिक उत्पन्न, उत्तम खोडवा व मध्यम साखर उतारा असणारी फुले २६५ या जातीची तिन्ही हंगामांसाठी शिफारस केलेली आहे. गेल्या पाच वर्षांत ही जात शेतकऱ्यांच्या आíथक उत्पन्नात वाढ करण्यासाठी व साखर कारखानदारीसाठी उपयुक्त ठरली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील ऊस शेतकऱ्यांच्या जीवनात या ऊस जातीने क्रांती घडविलेली आहे. यामुळे दिवसेंदिवस या जातीचे लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे.
संशोधन कार्यक्रमांबरोबरच उसाच्या सुधारित जातींच्या मूलभूत बेण्यांची निर्मिती करून ते राज्यातील साखर कारखान्यांना व शेतकऱ्यांना वाटपाच्या कामात हे संशोधन केंद्र सतत कार्यरत राहिलेले आहे. या व्यतिरिक्त मोठमोठी शेती प्रात्यक्षिके, शेतकरी मेळावे, कृषी प्रदर्शने, आकाशवाणी, दूरदर्शन, वर्तमानपत्रे, मासिके, घडीपत्रिका अशा विविध माध्यमांद्वारे ऊसलागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या संशोधन केंद्रावरील शास्त्रज्ञ सतत प्रयत्नशील राहिले आहेत.                                        
-डॉ. एस. एम. पवार, (फलटण)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई२२ office@mavipamumbai.org

जे देखे रवी..      शरीर
मेडिकलच्या पहिल्या वर्षांत शरीररचना हा विषय शिकवला जातो. त्यासाठी एक दालन असते आणि त्यात प्रेते ठेवलेली असतात. प्रत्येक विद्यार्थ्यांला एक चाकू, कात्री वगैरे संच घ्यावा लागतो आणि मग शवविच्छेदन करावयाचे असते. त्यासाठी एक पुस्तक असते. पहिल्या दिवशी आमच्यातले दोघे ते दृश्य बघून कोसळले, मग सावरले आणि कामाला लागले.
सगळी प्रेते सारखी नसत. काही मऊ तर काही कडक किंवा वातड असत. (योगायोगाने, मांसाहारी लोक मटण किंवा तत्सम पदार्थासाठी हेच शब्द वापरतात). विच्छेदनाचे काम किचकट असे. काहींना जमे, काहींना जमत नसे. पण ज्यांना जमत नसे त्यांची उणीव प्राध्यापकांनी भरून काढल्याची आठवण आहे. त्यांचे नाव काळे. पाच मिनिटे उशिरा येत. काळय़ा फळय़ाकडे टक लावून पाच मिनिटे बसत. मग चार-पाच रंगीत खडूंच्या मदतीने शरीराच्या एखाद्या भागाची आकृती काढत असत. मग खडूने त्वचेला छेद देत, आतला पापुद्रा दाखवत, त्यावर मग निळय़ा रंगाची ‘नीला’ काढत आणि सांगत की, ही जाडी नीला त्वचेला लागून असते. काही थोडे लागले तरी फुटू शकते आणि धमनीच्या मानाने नीलेत स्नायू कमी असल्यामुळे ती आकुंचित होऊ शकत नाही, म्हणून माणूस रक्तबंबाळ होतो. मग पापुद्रय़ाच्या खालचे स्नायू, त्याच्या आतले हाड, हाडांमधले सांधे, त्या सांध्यांतली कूर्चा असे हळूहळू उलगडून दाखवत. हाडाला रक्तप्रवाह कोठून मिळतो, कोठल्या हाडाला कुठे रक्तप्रवाह कमी असतो, त्याच्या आकृत्या काढत असत आणि तिथे हाड मोडले तर ते जुळून यायला का वेळ लागतो, याचे स्पष्टीकरण देत असत. आम्ही सगळे मंतरल्यासारखे स्तब्ध होत असू. पण प्राध्यापक काळे हे एक अपवादात्मक व्यक्तिमत्त्व होते. शरीररचना हा विषय निरस आणि कोरडाच ठेवण्यात आला होता. या धमनीच्या शाखा कोठल्या, हृदयाच्या झडपांचा आकार काय, हा सांधा कोठल्या प्रकारचा आहे, हा स्नायू कोठून सुरू होतो आणि कोठे संपतो असले साचेबंद प्रश्नच विचारले जात असत.
हल्ली तर सगळय़ा शरीराचे शवविच्छेदन करण्याची सक्ती नाही. आता संगणक आले. एकदा क्लिक दाबले की शरीराचा एक भाग पडद्यावर येतो, मग नेम धरून क्लिक केले की त्या भागावरची त्वचा दूर होते आणि तिसऱ्यांदा क्लिक केले की स्नायू दिसू लागतात. संगणकाच्या पडद्यावरले एखादे खास बटन दाबले तर बाकी सगळे नाहीसे होऊन फक्त एक धमनी आणि तिच्या शाखा दिसू लागतात.
प्राध्यापक काळे ज्या पद्धतीने शिकवत होते, ती एकप्रकारे पुढे येणाऱ्या या संगणकीय शिक्षणपद्धतीची नांदी होती. त्याबद्दल पुढच्या लेखात.
रविन मायदेव थत्ते  १’३ँं३३ी@ॠें्र’.ूे

आजचे महाराष्ट्रसारस्वत        २२ जानेवारी
१२९६>  कवी, आध्यात्मिक ग्रंथकार आणि नागपंथी योगी चांगदेव तथा चांगा वटेश्वर समाधिस्थ. ज्ञानदेव गाथेतील सुमारे ७७ व तत्त्वसार हा आध्यात्मिक ग्रंथ तसेच काही पदे अशा रचना त्यांच्या नावावर सापडते.
१६८२>  प्रचंड वाङ्मयीन कार्य करणारे संत-साहित्यिक समर्थ रामदास तथा नारायण सूर्याजीराव ठोसर यांचा देहत्याग.  समाज व जनरीतींचे सूक्ष्म अवलोकन त्यांच्या ‘दासबोधा’त वाचकाला सापडते, तर हिंदूंमध्ये सामूहिक उपासनेसाठी ‘आरती’ हा प्रकार रुळवण्यासाठी त्यांनी रचलेल्या अनेक आरत्या आजही म्हटल्या जातात. ‘मनाचे श्लोक’ तसेच करुणाष्टके यांतून काव्यलेखनाचे नवे वृत्त-छंद त्यांनी मराठीत आणले. उपदेशपर रचना, पदे, भूपाळय़ा, स्तोत्रे असे काव्यप्रकार त्यांनी हाताळले तसेच ‘अस्मानी सुलतानी’- परचक्र निरूपण यांसारख्या स्फुटरचनाही केल्या.  
१९२०> ‘प्राचीन मराठी वाङ्मयाचे स्वरूप’, ‘संतसाहित्याचे मंत्राक्षरत्व’ , ‘संत-तत्त्वज्ञान संज्ञा कोश’ ‘नामयाची अमृतवाणी’ आदी पुस्तके लिहिणारे अभ्यासक ह. श्री. शेणोलीकर यांचा जन्म. ‘साहित्य अकादमी’ साठी नामदेव गाथेचे संपादन त्यांनी केले.     
संजय वझरेकर

वॉर अँड पीस                                                        कावीळ : रुद्धपथकामला
काविळीच्या अनेक प्रकारांपैकी ‘ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस’ हा प्रकार म्हटले तर बरा व्हायला सोपा, पण दुर्लक्ष केले तर जिवावर बेतणारा ठरू शकतो. आपल्या पोटातील पहिला ‘गार्ड’ यकृत हा अवयव आहे. त्यातून सुटणारे पित्ताचे स्राव खाल्लेल्या अन्नाबरोबर मिसळून, मळाला पिवळा रंग आणतात, पोट साफ करतात. या पित्ताच्या मार्गात अडथळा आल्यास पित्त अन्नाबरोबर न मिसळता रक्तात मिसळते. डोळे, त्वचा, लघवी यांचा रंग गडद पिवळा वा लाल होतो. मळ पांढरा वा काळय़ा वर्णाचा व निश्चितपणे पिवळा नसलेला होतो. भूक मंदावते. ‘कामाचा’- इच्छेचा लय होतो. म्हणूनच संस्कृत शब्द कामला असा आहे. अंगाला खाज सुटणे, यकृत प्लीहेला सूज येणे, शौचाला साफ न होणे, थकवा, अरुची अशी लक्षणे असतात. या प्रकारच्या काविळीची प्रामुख्याने कारणे : खराब दूषित पाणी, भेसळीचे दूध, कृमी, जंत, मद्यपान, खराब दर्जाचा खवा असणारी मिठाई, शौचाची नेहमीची रडकथा, दही, गूळ, लोणचे, पापड मांसाहार, शिळे अन्न यांचा अतिरेकी वापर. रुग्णाने मनापासून ठरविले तर औषधे न घेता केवळ पथ्यपाणीच सांभाळून ही कावीळ बरी होऊ शकते. रोज एका कोरफडीच्या पानाचा गर, राजगिऱ्याच्या लाहय़ा, ज्वारीची भाकरी, उकडलेल्या भाज्या, उकळलेले पाणी, घरी केलेले उसाचे तुकडे चावून खाणे. मधुमेह नसल्यास साळीच्या लाहय़ा व मनुका भरपूर खाव्यात. पूर्ण विश्रांतीत झोपून राहावे. औषधोपचार म्हणून कुमारी आसव नं.३ व अम्लपित्तवटी जेवणानंतर, जेवणाआधी आरोग्यवर्धिनी व त्रिफळा गुग्गुळ प्रत्येकी ३ गोळय़ा व झोपताना कपिलादी वटी ६गोळय़ा, त्रिफळा वा गंधर्वहरीतकी चूर्णासह घ्याव्या. लघवीचे प्रमाण कमी असल्यास गोक्षुरादी गुग्गुळ तीन गोळय़ा व रसायनचूर्ण एक चमचा घ्यावे. खूप जुनाट कावीळ असल्यास कुटकी, गुलाबकळी बाहवा मगज, बाळहिरडा, मनुका यांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने काढा-नि काढा घ्यावा. थातूरमातूर औषधांनी दोन-चार दिवसांत कावीळ बरी होत नाही हे लक्षात ठेवावे.  
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 12:07 pm

Web Title: sugercane reserching centerpadegaon
टॅग : Kutuhal,Navneet,Sugercane
Next Stories
1 जे देखे रवी.. : संयुक्त महाराष्ट्र
2 कुतूहल – मिश्र पीक म्हणजे काय?
3 कुतूहल – सेंद्रिय खतामुळे वनस्पतीला कसा फायदा होतो ?
Just Now!
X