25 November 2020

News Flash

कुतूहल – सल्फर डायॉक्सॉइड वायू (SO2)

आम्लवर्षां होते आणि पिकापाण्याची नासाडी होते. सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक वारसा असलेल्या वास्तूंची हानी होते. माणसाच्या स्वास्थ्याचा देखील बट्टय़ाबोळ होतो.

| June 14, 2014 01:01 am

आम्लवर्षां होते आणि पिकापाण्याची नासाडी होते. सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक वारसा असलेल्या वास्तूंची हानी होते. माणसाच्या स्वास्थ्याचा देखील बट्टय़ाबोळ होतो. कुठून येतो हा आम्लयुक्त पाऊस?
त्याला कारणीभूत असतो सल्फर डायॉक्सॉइड हा वायू. खनिज तेलातून मिळणाऱ्या इंधनात आणि वातावरणात सल्फरचा अंश असतो. तो काळ्या खनिज तेलातून या उपयुक्त पदार्थात उतरलेला असतो. इंधनाचे ज्वलन होते. तेव्हा सल्फर (गंधक) जळते व त्याचे सल्फर डायॉक्सॉइड या वायूत रूपांतर होते. हा वायू हवेतील बाष्पात किंवा पावसाच्या पाण्यात विरघळतो, तेव्हा त्याचे सल्फ्युरिक आम्ल तयार होते. आणि आम्लवर्षां होते.
त्यासाठीच तर इंधनात नि वंगणात असलेल्या सल्फरचे उच्चाटन केले जात आहे. युरोप देशांतून काही वर्षांपूर्वी युरो-नियंत्रणे जारी झाली. त्याद्वारे इंधनातील सल्फरचा अंश कमी कमी करण्यात आला. हे प्रमाण पी.पी.एम. (एकदशलक्षांश) पातळीवर आणले गेले आहे. उदा. युरो ३ नियंत्रणानुसार पेट्रोलमधला सल्फर १५० पी.पी.एम. पातळीवर असतो, तर युरो ४ नियमावलीनुसार सल्फरची ही पातळी ५० पी.पी.एम.पर्यंत मर्यादित आहे. तसेच युरो ३ गटातल्या डिझेल इंधनात ३५० पी.पी.एम. गंधक असतो व युरो ४ डिझेलमध्ये पेट्रोलप्रमाणेच ५० पी.पी.एम.पर्यंत रोखला जातो. यापुढची युरो ५ इंधने गंधकरहित असतील, जेणेकरून ती मोटारगाडय़ांच्या इंधनात, जनित्रात किंवा कारखान्यातील यंत्रात जळताना वातावरण प्रदूषित करणार नाहीत.
तेलशुद्धीकरण कारखान्यात इंधनातील सल्फर निपटून काढण्यासाठी खूप खर्चिक यंत्रणा बसवावी लागते. तिला डीहायड्रोडीसल्फरायझेशन (DHDS) असे म्हणतात. त्यामुळे अशा सल्फररहित इंधनाची किंमत जास्त असते. डिझेलमधले सल्फर कमी झाले की त्याची वंगणीयता कमी होते. ती योग्य प्रमाणात राखण्यासाठी त्यात जैविक डिझेलसारखी पूरके घालावी लागतात. फॅटी अ‍ॅसिड मिथाईल ईथर (FAME)) हे जैविक इंधन ते काम करते.  
प्रदूषण हे भावी इंधनाचे स्वरूप ठरविण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यासाठी इंधनाचे ‘रोड मॅप’तयार करण्याची धडपड, संशोधकांच्या मदतीने शासनकत्रे करीत असतात.
जोसेफ तुस्कानो (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

प्रबोधन पर्व – ‘पुराणे म्हणजे शिमगा!’
‘‘देव-देवळांविषयी शाब्दिक प्रेमाचा हिंदूू जिव्हेचा धबधबा पहावा तो त्याच्या धडधडाटापुढे गिरसप्पा, नायगाराच्या कानठळ्या बसतात. हे काय भटबंगाल आहे? हे भटबंगाल हिंदुस्थानच्या नकाशात सापडणारे नसून, ते थेट भटाच्या पोटात आहे. देवळांचा धर्म म्हणजे भटांच्या पोटापाण्याचे गुप्त मर्म आहे. या मर्माचं वर्म अफाट भटेतरांना कधीच उमगू नये, म्हणून भटांनी अठरा पुराणांची पैदास करून ठेवलेली आहे. गीता व उपनिषदादी आचारविचार-क्रांतिकारक आणि सत्यशोधक ग्रंथ कितीही असले, तरी देवळांवर देह जगवणाऱ्या या भूदेवांचा विशेष मारा या पुराणांवरच असतो. पुराणांचा पाचकळपणा प्रगट करण्याचे येथे प्रयोजन नाही. पुराणांच्या पचनी पडलेला प्रत्येक प्राणी ईश्वरविषयक कल्पनेत इतका पागल बनतो की, दगडय़ा देवाच्या पायाऐवजी भटाच्याच पायावर टाळकी घासतो आणि त्याचे पाय धुतलेले पाणी ‘पवित्र तीर्थ’ म्हणून घटाघटा पितो.’’
देवाच्या नावाने अवंडबर माजवणाऱ्यांची लबाडी प्रबोधनकार ठाकरे उघडी करताना पुराणांच्या सत्यतेविषयाही शंका उपस्थित करताना म्हणतात-
‘‘देवळांत कथा, कीर्तने, पुराणे प्रवचने होतात. पण सर्वाची झाप छिनाल भागवतावर आणि पाचकळ पुराणांवर! या पुराणाच्या श्रवण, मनन निदिध्यासाने हिंदू स्त्री-पुरुषांच्या मनावर कसकसले घाणेरडे व विकृत परिणाम आजपर्यंत झाले, आजही होत आहेत. देव आणि देवळांचे माहात्म्य या पुराणांनीच वाढवले. ‘पुराणे म्हणजे शिमगा’ असे पुष्कळ विचारवंतांचे म्हणणे आहे. पुराणे म्हणजे शौचकूप, असे आमचे मत आहे. पुराणे म्हणजे शौचकूप ठरल्यावर त्यांच्या जिवावर जगणाऱ्या देवळात काय काय पातकांच्या गिरण्या सुरू असतात, याची कल्पनाच केलेली बरी.. देवळे म्हणजे भिक्षुकशाहीच्या जन्मसिद्ध वतनी जहागिऱ्या, देवळाशिवाय भट नाही आणि भटाशिवाय देऊळ नाही, असा एक सनातनी नियमच ठरून गेला. ह्य़ामुळे पुराणप्रसव्या भटांनी देवळांची संख्या भरमसाट वाढविण्यासाठी देवांचीही देवसंख्या वाढवीत वाढवीत ३३ कोटींवर नेऊन भिडवली.

मनमोराचा पिसारा – सुंदर ती ‘टिनटिन टाइम्स’ची दुनिया
कॉमिक्स वाचण्याचं वय असतं का? मराठी माध्यमातून शिकलेली पन्नाशीच्या आसपासची पिढी इंग्रजी कॉमिक्स वाचते का? ‘चांदोबा’मधल्या भरपूर चित्रं असलेल्या गोष्टींचं चित्रमय स्वरूप कॉमिक्सच्या जवळ जातं. मग इंद्रजाल कॉमिक्सच्या वेताळकथा, त्यामधले वज्रमुष्टी ठोसे, त्यानं जंगलात दिलेल्या ललकाऱ्या काळाबरोबर विरल्या का? ‘अमर चित्रकथा’मधून रामायण- महाभारतातल्या अनेक गोष्टी प्रसिद्ध झाल्या, लोकप्रिय ठरल्या, त्यांना ‘मराठी कॉमिक्स’ म्हणावं का? आजची प्रौढ पिढी त्या प्रकारच्या साहित्याशी आयडेंटिफाय करते का?
कॉमिक्समधलं रंगीबेरंगी जग आकर्षक वाटतं, पण त्यामधल्या ‘व्यक्तिरेखां’शी मैत्री होते, त्यांच्या साहस आणि पराक्रमाविषयी कुतूहल आणि आदर वाटतो का? त्या मोहमयी कॉमिक्सच्या जगाचं आकर्षण वाटतं ते केवळ पलायनवादी नशा म्हणून. कॅरेक्टरबद्दल वाटणाऱ्या जिव्हाळा अथवा बांधीलकीमुळे नाही.
स्पायडरमॅन, हीमॅन, सुपरमॅन’मधली कथा दुष्टांचं निर्दालन करणाऱ्या एकमेवाद्वितीय ‘हिरो’ची अथक, चमकदार आणि अतिमानवी शक्ती, या एकुलत्या एका थीमभोवती घुटमळत राहतं. त्यातून वाचकांना ढोबळमानानं काही मूल्यात्मक ज्ञान आणि समज निर्माण होते. अशा वरवरच्या मांडणीमधून जीवनाबद्दल सकस जाणिवा निर्माण होत नाहीत. नवी जीवनदृष्टी मिळत नाही, फक्त ‘टाइमपास’ होतो. अत्यंत सोप्पं करून जगाचा अनुभव घेतल्यावर मनातल्या चिरंतन मूल्यांचा पाया मजबूत होत नाही. साहित्य, वाङ्मय, अभिजात कलाकृती किंवा उत्स्फूर्त अभिव्यक्ती, रसपरिपोष करणाऱ्या नृत्य, नाटय़ आणि संगीतकलानी मनाच्या जाणिवा अधिक स्पष्ट प्रखर होतात.
टिनटिन वाचून अशी सखोल जीवनदृष्टी निर्माण होईल, असं वाटत नाही. अर्थात, व्हावी असा आग्रह असेल तर!
कॉमिक्समधला आणखी एक मानसिक पदर इथे उलगडला पाहिजे. तो म्हणजे, चित्रांच्या उपयोजनांमुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला आवर बसतो. राक्षस, दुष्ट माणसं, सज्जन, स्त्रिया आणि मुलं यांच्या स्वभाववैशिष्टय़ांचा अभ्यास केवळ सांगून अथवा वाचून होत नाही, तर त्यांच्याविषयी कल्पनाशक्ती लढवली, त्यांची व्यक्तिचित्रं मनात रंगवता आली तर मन (मुलांचं आणि प्रौढांचंही) प्रगल्भ होतं.
तरीही ‘अ‍ॅस्टेरिक्स’कडे मन ओढ घेतं. याचं कारण त्यात गुणात्मक फरक आहे.
मुळात ग्रीक-रोमन, ब्रिटनी, फ्रान्स, सेल्टिक देश यांचा प्राचीन इतिहास ठाऊक नसला तरी ख्रिस्तपूर्व ५० च्या दशकात ‘गॉल’ रहिवाशांच्या अनामिक खेडय़ात आपण सहज पोहोचतो. मूळ फ्रेंच कथेच्या इंग्रजी भाषांतरात गॉल रहिवाशांच्या नावानं गंमत येते. अ‍ॅस्टेरिक्स, ओबेलिक्स ही जोडी मजेदार. त्यांचा कुत्रा डॉगमॅटिक्स, त्यांचा एक ल्युटिअन पाव्हणा जस्टफॉरकिक्स. शक्तिमान करणाऱ्या औषधाचा निर्माता गेटोफिक्स, तर गावप्रमुख व्हायटल स्टॅटिस्टिक्स!
मुळात अ‍ॅस्टेरिक्समध्ये विनोद हा बुद्धिगत आहे. किंचित ब्लॅक ह्य़ूमर आहे. अ‍ॅनाक्रॉनिझम पूर्वीच्या काळाला नव्या उपकरण, सुविधा इ.च्या संदर्भात मांडणं म्हणजे संगमरवरी स्लॅबच्या तीन प्रतींमध्ये रिपोर्ट सादर करणं. हा प्रकार तसा खुसखुशीत आहे. मुळात अ‍ॅस्टेरिक्स हुशार, किरकोळ देहयष्टीचा आणि ओपेलिक्स (पाठीवर इजिप्शियन ओबेलिक्स स्तंभ) घेऊन वावरणारा अफाट शक्तिमान, पण मंद डोक्याचा ही जोडी मजेदार आहे. बाकी त्यांची साहसी दर्यावर्दी वृत्ती, नॉर्मनशी होणाऱ्या लढाया, या गोष्टीरूपांत येतात, पण सर्व कथांच्या विस्तारीकरणात आधुनिक राजकारणातले संदर्भ सहज सापडतात. अ‍ॅस्टेरिक्स पुन:पुन्हा वाचाविशी वाटतात आणि हेच त्यांचं यश आहे. फ्रेंचांनी तर आपल्या सॅटेलाइटला अ‍ॅस्टेरिक्स (छोटा तारा) असं नाव दिलं. ९२ सालच्या पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये अ‍ॅस्टेरिक्स थेट आयफेल टॉवरवर विराजमान. हजारो र्मकडाइझ, थीम पार्क सिनेमा अ‍ॅस्टेरिक्स नावावर चालतात. त्याच मराठीत भाषांतर झालं तर? ते वाचणार कोण, हा प्रश्न आहे!
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2014 1:01 am

Web Title: sulfur dioxide
टॅग Navneet
Next Stories
1 कुतूहल: मिथेन वायू – ‘जळता बर्फ’
2 कुतूहल: कार्बन डायऑक्साइड वायू (CO2)
3 कुतूहल: अग्निरोधक फर्निचर
Just Now!
X