सुरीनाम हा दक्षिण अमेरिकेच्या विषुववृत्तीय प्रदेशातील एक छोटासा देश. घनदाट जंगलांनी वेढलेला हा देश सांस्कृतिकदृष्टय़ा कॅरेबियन देशसमूहामध्ये मोडतो. १९७५ साली हॉलंडपासून स्वातंत्र्य मिळवल्यावर ‘प्रजासत्ताक सुरीनाम’ हा देश उदयास आला. तोपर्यंत सुरीनाम हा हॉलंडची दक्षिण अमेरिकेतील वसाहत होता. ‘डच गिआना’ या नावाने तो ओळखला जाई. उत्तरेला अटलांटिक महासागर, पूर्वेस फ्रेंच गयाना, पश्चिमेस गयाना आणि दक्षिणेला ब्राझील अशा चतु:सीमा असलेला सुरीनाम हा द. अमेरिकेतील सर्वात लहान देश.

नव्या भूमीच्या शोधात १६व्या शतकाच्या अखेरीस या प्रदेशात आलेले स्पॅनिश हे येथे आलेले पहिले युरोपियन. त्यांनी या प्रदेशाचे नाव ‘सुरीनाम’ केले. सुरीनामचे भारतीयांशी फार जुने लागेबांधे आहेत. या देशातील सध्याच्या सहा लाख लोकसंख्येपैकी साधारणत: ३७ टक्के लोक हे भारतीय वंशाचे आहेत. १९व्या शतकात उत्तर प्रदेश व बिहारमधून हजारो कामगार येथे येऊन स्थायिक झाले. त्यांचे पुढचे वंशज भोजपुरी भाषेशी साम्य असलेली हिंदी भाषा बोलतात. त्यांची ही  ‘सुरीनामी हिंदी’ इथली तिसरी प्रचलित भाषा आहे.

ख्रिस्तोफर कोलंबस भारताच्या शोधार्थ निघाला, पण तो पोहोचला अमेरिकेच्या भूमीवर! त्यावेळी जाताना त्याला सुरीनामचा  हा प्रदेश दिसला. अमेरिगो व्हेस्पुसीच्या नेतृत्वाखाली १४९९ साली निघालेल्या स्पॅनिश मोहिमेत त्यांच्या जहाजांचे तांडे सुरीनामच्या किनाऱ्या-किनाऱ्याने गेले. पुढे स्पॅनिश, डच, ब्रिटिश आणि फ्रेंच लोकांनी १७व्या शतकाच्या मध्यापर्यंत या प्रदेशात वस्ती करण्यासाठी बरेच प्रयत्न केले, पण ते इथल्या रेड इंडियन्स या मूळच्या रहिवाशांच्या प्रखर विरोधामुळे निष्फळ ठरले.

सुरीनाममध्ये प्रथम आलेले युरोपियन हे जरी स्पॅनिश लोक असले तरी इथे वसाहत स्थापन करण्यात आणि उसाची मोठी लागवड करण्यात १६५१ मध्ये प्रथम यशस्वी झाले ते ब्रिटिश मळेवाले आणि त्यांचे गुलाम. पुढे १६६७ मध्ये या ब्रिटिश मळेवाल्यांवर डचांनी आरमारी हल्ला करून त्यांना जेरीस आणले. अखेरीस हे ब्रिटिश मळेवाले आणि डच यांच्यामध्ये एक करार करण्यात आला. या करारान्वये १६६७ मध्ये ब्रिटिशांनी सुरीनामचा प्रदेश हॉलंडला देऊन त्या बदल्यात हॉलंडची उत्तर अमेरिकेतील ‘न्यू अ‍ॅमस्टरडॅम’ ही वसाहत ब्रिटिशांच्या मालकीची केली.

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com