News Flash

नवदेशांचा उदयास्त : सुरीनाम : राजकीय जागृती आणि स्वातंत्र्य

हॉलंड सरकारने सुरीनामींना १९५४ साली त्यांच्या अंतर्गत बाबींसाठी स्वायत्तता देऊन त्यासाठी मतदानाचा अधिकार दिला.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सुरीनाममध्ये बॉक्साइट मुबलक प्रमाणात सापडल्यामुळे या प्रदेशाचे महत्त्व वधारले. परिणामी, १९३९ पासून हॉलंड सरकारने सुरीनामच्या विकासाच्या योजना सुरू केल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर, विशेषत: १९४८ नंतर सुरीनामी जनतेकडून अंतर्गत राजकीय स्वायत्ततेची मागणी सुरू झाली. केवळ मागणी करून न थांबता सुरीनाममधील विविध समाजांचे, विचारांचे गट तयार होऊन त्यांच्या नेत्यांनी राजकीय पक्षबांधणी सुरू केली. यामध्ये दक्षिण आशियाई आणि इंडोनेशियन वंशाच्या लोकांनी ‘प्रोग्रेसिव्ह रिफॉर्म पार्टी’ हा पक्ष स्थापन केला.

हॉलंड सरकारने सुरीनामींना १९५४ साली त्यांच्या अंतर्गत बाबींसाठी स्वायत्तता देऊन त्यासाठी मतदानाचा अधिकार दिला. साठच्या दशकात येथील अ‍ॅल्युमिनियमच्या उत्पादनात लक्षवेधी वाढ होऊन अर्थव्यवस्था सुधारली. १९५८ ते १९७३ या काळात स्थानिक विधिमंडळांच्या झालेल्या निवडणुकांत प्रत्येक वेळी दोन किंवा तीन पक्षांच्या युतीची सरकारे सत्तेवर आली. १९७३च्या निवडणुकीनंतर सर्व पक्षांच्या तरुण नेत्यांकडून सुरीनामच्या पूर्ण सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली. हॉलंडमधीलही काही नेते सुरीनामला स्वातंत्र्य देण्याची मागणी करू लागले. अखेरीस ही मागणी मान्य करीत हॉलंड ऊर्फ नेदरलॅण्ड्स सरकारने २५ नोव्हेंबर १९७५ रोजी सुरीनामला पूर्ण स्वातंत्र्य दिले अन् सुरीनाम हे सार्वभौम राष्ट्र अस्तित्वात आले.

सुरीनामचे तत्पूर्वीचे गव्हर्नर जोहान फेरियर यांना राष्ट्राध्यक्षपदी, तर हेन्क अ‍ॅरान यांना पंतप्रधानपदी नियुक्त करण्यात आले. या काळात सुरीनामची अर्थव्यवस्था ढासळली होती. नवजात सुरीनामचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून हॉलंडच्या सरकारकडून सर्व प्रकारच्या मदतीचा, अर्थपुरवठ्याचा ओघ सतत चालू होता. परंतु ही मदत लोकांपर्यंत न पोहोचता, सत्तारूढ ‘नॅशनल पार्टी ऑफ सुरीनाम’च्या भ्रष्टाचारी नेत्यांनी स्वत:चे खिसे भरून पक्षाचा खजिना समृद्ध केला. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये सुरू झालेल्या संघर्षाच्या परिणामी, १९७७ च्या निवडणुकीत तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जोहान फेरियरना हरवून हेन्क अ‍ॅरान राष्ट्राध्यक्ष बनले. स्वातंत्र्यानंतर सुरू झालेला राजकीय आणि वांशिक संघर्ष आणखी पेटून दंगली होतील या भीतीने साधारणत: ३० टक्के सुरीनामी जनता हॉलंडमध्ये स्थलांतरित झाली.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2021 12:26 am

Web Title: suriname political awareness and independence akp 94
Next Stories
1 कुतूहल : सर्जनशील गणिती
2 कुतूहल : पथदर्शी रशियन स्त्रीगणिती
3 नवदेशांचा उदयास्त : सुरीनाम : उसाचे मळे, बॉक्साइटच्या खाणी
Just Now!
X