दुर्मिळ मृदा मूलद्रव्यांचा (रेअर अर्थ एलिमेंट्स) गुंता उकलणारे स्वीडिश शास्त्रज्ञ कार्ल गुस्ताव मोझँडर. यांचा जन्म १० सप्टेंबर १७९७ साली स्वीडनमधील कलमार या शहरात झाला. वयाच्या बारा वर्षांपर्यंत कलमार येथेच त्यांचे शालेय शिक्षण झाले. नंतर स्टॉकहोम येथे त्यांनी उग्लान फार्मसीमध्ये उमेदवारी केली आणि १८१७ साली फार्मसीची (औषधनिर्मितीशास्त्राची) परीक्षा दिली. कार्ल मोझँडर यांना वैद्यकशास्त्राची आवड होती. याच कारणामुळे औषधनिर्मितीशास्त्राचे पदवीधर असतानाही वैद्यकशास्त्राकडे असलेल्या ओढीमुळे कार्ल मोझँडर यांनी वैद्यकशास्त्राचीही पदवी घेतली. १८२० साली स्टॉकहोम येथील कॅरोलीन्स्का संस्थेत वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेत असताना त्यांची ओळख स्वीडिश शास्त्रज्ञ बर्झीलीयस यांच्याशी झाली. बर्झीलीयस यांच्या प्रभावामुळे त्यांना रसायनशास्त्रात विशेष रुची वाटायला लागली. कार्ल गुस्ताव मोझँडर यांनी लष्करात शल्यविशारद म्हणून काम केले होते. १८२८ साली कॅरोलीन वैद्यकीय संस्थेच्या रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी कार्ल मोझँडर यांची नेमणूक झाली. १८३२ साली रसायनशास्त्र आणि खनिजशास्त्र या विषयाचे प्राध्यापक झाले. १८३३ साली, रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. याच संस्थेत कार्ल मोझँडर यांनी बर्झीलीयस यांच्याबरोबर अनेक वर्षे अकॅडमीचे काम पाहिले. त्याच अकॅडमीत बर्झीलीयस यांनी त्यांची खनिज संपत्तीचे अभिरक्षक म्हणून नेमणूक केली. त्यांच्यावर असलेल्या कामाच्या जबाबदारीत मुख्य काम होते खनिजांचा संग्रह करणे. खनिजांचा संग्रह करताना मिळालेल्या अनुभवाचा कार्ल मोझँडर यांना पुढे दुर्मिळ मृदा मूलद्रव्यांच्या संशोधनात खूप उपयोग झाला.

साधारणपणे पन्नास वर्षे आधी ‘ट्रियेट’ नावाच्या नवीन खनिजाचा शोध लागला होता. कार्ल मोझँडर यांनी १८३९ साली लँथनम या मूलद्रव्याचा शोध लावला. १८४३ साली त्यांनी आपल्या संशोधनाची दिशा इट्रियेटमधील ‘इट्रिया’ या मृदेकडे वळवली. इट्रियामध्ये असणाऱ्या तीन घटकांचे ‘इट्रिया’, ‘अर्बिया’ व ‘टर्बिया’ असे नामकरण केले. १५ ऑक्टोबर १८५८ रोजी स्टॉकहोमजवळील लोवॉन या बेटावर वयाच्या ६१ व्या वर्षी कार्ल मोझँडर यांचे निधन झाले.

– डॉ. तनुजा परुळेकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org