दोन धातू  एकमेकांना जोडून बनवलेल्या जोडपट्टीने बेडकाच्या पायाच्या स्नायूंना स्पर्श केल्यावर त्या बेडकाचे स्नायू आखडत असल्याचे इटालियन शरीरशास्त्रज्ञ ल्युइजी गॅल्व्हानी याने १७८० साली दाखवून दिले. त्यानंतर अकरा वर्षे निरनिराळे प्रयोग करून, त्याचे निष्कर्ष त्याने १७९१ साली ‘कॉमेंटेरियस’ या पुस्तिकेद्वारे प्रकाशित केले. बेडकाच्या शरीरात प्राणिज विद्युत असल्यामुळेच, बेडकाला धातूचा स्पर्श होताच त्याचे पाय आखडले जातात, असे गॅल्व्हानीचे म्हणणे होते. ही प्राणिज विद्युत प्राण्यांच्या स्नायूंत साठवलेली असते. इटालियन भौतिकशास्त्रज्ञ अलेस्सान्द्रो व्होल्टा यानेही प्रथम या शोधाचे कौतुक केले. त्यानंतर व्होल्टाने स्वत:च ही प्राणिज विद्युत अभ्यासण्यास सुरुवात केली. मात्र आपल्या प्रयोगांत व्होल्टाने जेव्हा धातूंच्या जोडपट्टीने बेडकांच्या स्नायूंऐवजी त्याच्या नसांना स्पर्श केला, तेव्हाही बेडकाचे पाय आखडल्याचे त्याला आढळले. इतकेच नव्हे, तर बाहेरील विद्युतशक्तीलाही बेडूक अशाच प्रकारचा प्रतिसाद देत होता. या आखडण्याला प्राणिज विद्युत कारण नसून, धातूंच्या जोडपट्टीत निर्माण होणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे ते घडून येत असल्याची शक्यता त्याने व्यक्त केली. त्यानंतर व्होल्टाने या विद्युत-शक्तीवरील आपल्या संशोधनाला सुरुवात केली.

धातुजन्य विद्युत निर्माण करण्यासाठी व्होल्टाने वेगवेगळ्या धातूंच्या चकत्यांच्या जोडय़ा वापरल्या. चांदी आणि जस्ताच्या चकत्यांच्या जोडणीतून उत्तम विद्युतनिर्मिती होत असल्याचे त्याला आढळले. चांदीऐवजी तांबे किंवा जस्ताऐवजी कथलाचा वापर करूनही त्याला विद्युतनिर्मिती करता आली. यातील प्रत्येक दोन जोडय़ांच्या दरम्यान मिठाच्या दाट द्रावणात भिजवलेला -टीपकागद, चामडे किंवा तत्सम- सच्छिद्र पदार्थ तो ठेवत गेला. अल्पशा विद्युतप्रवाहाच्या निर्मितीने सुरुवात करून, नंतरच्या प्रयोगांत व्होल्टा लक्षणीय प्रमाणात विद्युतप्रवाह निर्माण करू  शकला. धातूच्या जोडय़ांच्या वाढत्या संख्येबरोबर विद्युतप्रवाहाची तीव्रता वाढू लागली. चकत्यांच्या अगदी शंभर जोडय़ाही त्याने एकमेकांना जोडून पाहिल्या. वीस जोडय़ांच्या वापरातच बोटाला वेदना होण्याइतका विद्युतप्रवाह निर्माण झाला होता. जोडय़ांची संख्या आणखी वाढवल्यानंतर त्याच्या बाहू आणि खांद्यापर्यंतही विजेचा झटका जाणवू लागला. ‘व्होल्टाइक पाइल’ म्हणून ओळखल्या गेलेल्या या उपकरणाचा शोध व्होल्टाने २० मार्च १८०० रोजी लंडनच्या रॉयल सोसायटीला कळवला. ल्युइजी गॅल्व्हानीने शोधलेली विद्युत ही प्राणिजन्य नसून ती धातूजन्य असल्याचे सिद्ध करतानाच, या पहिल्यावहिल्या विद्युतघटाची निर्मिती झाली.

डॉ. सुनंदा करंदीकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org