जे देखे रवी.. :
हैदराबादची स्वारी यशस्वी झाली आणि लवकरच आमचा बिदरचा मुक्काम हलला तो गोध्य्राला, ज्या गोध्य्राच्या नावाने भारतीय राजकारणाच्या सोंगटय़ा आज टाकल्या जात आहेत. गोध्रा तसे तेव्हा मागासलेलेच. तेव्हा शिक्षणासाठी मला येवल्याला माझ्या काकांकडे ठेवण्याचे ठरले. आई सोडायला आली होती. छोटेसे स्टेशन आठवते. टांग्याने आम्ही घरी गेलो. येवल्याला ईन मीन तीन गाडय़ा थांबत असत. तेव्हा हा टांगेवाला काय मिळवीत असेल आणि कुटुंबाला आणि घोडय़ाला काय खायला घालत असेल, असा विचार हल्लीच मनात आला. काका दिवाणी वकील होते. आमचे घर चुन्यामातीचे होते आणि आठवडय़ातून एकदा शेणाने घर सारवीत. घरात आजी होती. सोवळे कडक होते. काकांना चार मुले. सकाळी दहाला पंगत बसे. त्या पंगतीच्या टोकाला बाहेरगावहून आलेले पक्षकार आपल्या शिदोऱ्या घेऊन बसत. त्यांच्या जातीची कधीही चौकशी झाल्याचे आठवत नाही. काँग्रेसच्या वतीने काका एक वर्ष जेलमध्ये जाऊन आले होते, पण गावात आणि घरात समाजवादी मंडळींचे राष्ट्र सेवा दल होते. काँग्रेसचे काही खरे नाही, या कुजबुजीची ही नांदी असणार. माझा मोठा चुलत भाऊ सेवा दलात सक्रिय होता. स्वच्छता मोहीम, प्रभात फेरी होत असे. कलापथक होते. ते खेडय़ापाडय़ांत जाऊन जनजागृती करीत असे, पण घरातले शौचालय टोपलीचे होते. डुकरे होती आणि जनावरे जे मागे ठेवत ते उचलण्यासाठी माणूस येत असे. गावात सर्वत्र मोठे हौद होते. तिथे दूरवरून पिण्याचे पाणी येई. ते कावडीने घरी आणण्यासाठी राजस्थानमधले ब्राह्मण कवाडी होते. ती माणसे गावभर फिरत असत. गावात मोहरमला ताबूत निघत. तेव्हा दंगली होतात, अशी कुजबुज होती; पण मी काही दंगा बघितला नाही. गावातले शिक्षक, वकील, डॉक्टर पांढरपेशा मराठी. गावात आण्टे गुरुजी राहत असत. उत्तम नोकरी सोडून त्यांनी राष्ट्रीय शाळा चालविली आणि गरिबीत दिवस काढले. गावातले धनवान सावकार, जमीनदार, गुजराती किंवा राजस्थानी, ती मंडळी धेडगुजराती मराठी बोलत. शतकांपूर्वी गावात आलेल्या या मंडळींच्या हातात गावाच्या आर्थिक नाडय़ा असणार. शेती कोरडवाहू, शेतकरी अशिक्षित, बरेच वेळा कर्जबाजारी, शिवाय भाऊबंदकी या सगळ्या जात्यातून दळून जे कज्जे तयार होत असतील त्यावर दिवाणी वकील चालत असणार. माझे काका अतिशय सालस आणि सहृदय होते. खटले चालविताना त्यांच्या मनात काय चलबिचल होत असेल असा विचार मनात येतो. पुढे कूळकायदा आला, पण त्यानेही प्रश्न मिटले नाहीत. सत्ताधीश बदलले त्यांनी जमिनी हडप केल्याच. शिक्षणाचाही बाजार झाला आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. सगळ्यांच्याच हातात भ्रमणध्वनी आले; हीच एक मोठी क्रांती, पण त्यामुळे खरंच संवाद वाढण्याऐवजी माणसे एकलकोंडीच झाली आणि स्फोट करण्यासाठी या भ्रमणध्वनीचा वापर सुरू झाला.
रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com

कुतूहल – भातपिकाचे मूळ कोठे सापडते?
तांदळाचा आपल्या आहारात अन्नघटक म्हणून प्रवास सुरू झाला तो एक जंगली गवत म्हणून. या रानटी गवताने आता एक महत्त्वाचे तृणधान्य म्हणून अवघं जग व्यापलंय. अंटाíक्टका सोडून जगभरात जवळजवळ सर्वत्र भात पिकतो. त्यातील ९० टक्के उत्पादनक्षेत्र आशियात आहे. चीनचा व भारताचा वाटा आहे ४८  टक्क्यांच्या जवळपास. ७५ टक्के भारतीयांचं अन्न भातच आहे.
भात मूळचा कुठला? शास्त्रज्ञ म्हणतात, आशियातलाच. दक्षिण भारताच्या उष्ण कटिबंधीय प्रदेशात त्याची उत्पत्ती होऊन तो पूर्वेकडे चीनमध्ये, तर पश्चिमेकडे इराण-इजिप्तमध्ये गेला. तेथील ओरिझा सटायव्हा ही आधुनिक जात जंगली जातीतून जन्मली. भारतात जंगली जाती आजही खूप आहेत. उत्क्रांती शिडीतील मधले दुवेही इथे आहेत. भारतात लावल्या जाणाऱ्या भाताच्या सुमारे ६००० प्रकारांची नोंद आहे. जगात कुठेही इतके प्रकार नाहीत.
भाताचा जगातील सर्वात जुना पुरातत्वीय पुरावा इसवीसन पूर्व ३५०० वर्षांचा आहे. तो थायलंडमधील नान नोक था या ठिकाणी उत्खननात सापडला. भाताच्या तुसांचे ठसे तेथील मातीच्या भांडय़ांवर दिसले. हडप्पा व मोहोंजोदडो या सिंधू संस्कृती क्षेत्रात भाताच्या टरफलांचे अवशेष आणि दाण्यांचे चिखलातील ठसे सापडले. गुजरातच्या लोथलमध्ये याचे पुरातत्वीय अवशेष सापडले. त्यांचा काळ असेल इसवीसन पूर्व २३०० वर्षांचा. हस्तिनापूर उत्खननात इसवीसन पूर्व ८०० तील कार्बनीभूत भाताचे दाणे आणि टरफले सापडली.
अलेक्झांडरच्या भारतावरील आक्रमणानंतर ग्रीकांना भातपिकाची माहिती झाली. त्यांच्या लिखाणात तसे उल्लेख आहेत. खरं तर ग्रीकांना भाताचा परिचय अरब व्यापाऱ्यांकडूनच झाला. द कँडोल या संशोधकाने इसवीसन १८८६ मध्ये भाषांतरित केलेल्या चिनी ग्रंथांमधून भातविषयक उल्लेख प्रकाशात आणले. त्यानुसार चीनमध्ये भाताची लागवड २८०० वर्षांपासून होत असावी.
तांदळाच्या ओरिझा या प्रजातीच्या तृणकुलात २४ जाती आहेत. पकी २२ जंगली आहेत. फक्त ओरिझा सटायव्हा आणि ओरिझा ग्लॅबेरिमा यांची लागवड शेतीत केली जाते. आता जगभरात असलेल्या विविध भातप्रकारांच्या संचयिका स्थापन झाल्या आहेत. .
क. कृ. क्षीरसागर, पुणे , मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२  office@mavipamumbai.org

आजचे महाराष्ट्रसारस्वत : १६ जानेवारी
१९०१ >  समाजसुधारक, विचारवंत राजकारणी आणि साहित्यिक अशी तिहेरी जबाबदारी निभावणारे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे निधन. त्यांचा जन्म १८ जानेवारी १८४८ चा. एम. ए. होऊन सरकारी नोकरीत त्यांनी प्रवेश केला आणि स्मॉल कॉज कोर्टाच्या न्यायाधीशापासून हायकोर्टाचे न्यायाधीश झाले. राष्ट्रीय सभेच्या (काँग्रेस) संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या रानडे यांनी ‘प्रार्थना समाज’ मुंबईत रुजवला. पुढे त्यांची ‘धर्मपर व्याख्याने’ प्रकाशितही झाली. ‘स्वदेशी व्यापार’ आणि ‘व्यापारासंबंधी व्याख्याने’ ही पुस्तके त्यांच्या नावावर आहेत, परंतु त्यांची खरी साहित्यसेवा म्हणजे मराठी ग्रंथोत्तेजक मंडळाची (१८९८) स्थापना, तसेच ‘अ नोट ऑन द ग्रोथ ऑफ मराठी लिटरेचर’द्वारे मराठी वाङ्मयाचे त्यांनी केलेले  इतिहासरेखन. रानडे यांचा ‘द राइज ऑफ मराठा पॉवर’ हा इतिहासाचा अन्वय लावणारा ग्रंथ सर्वाधिक गाजला.  
१९६० >  प्रवासवर्णनकार असा लौकिक संपादन करणारे मोरेश्वर गोपाळ काळे यांचे निधन. काश्मीर, हिमालय आणि म्हैसूर या मराठी पर्यटकांना आजही प्रिय असलेल्या सफरींची रोचक वर्णने काळे यांनी लिहिली.
संजय वझरेकर

वॉर अँड पीस : अर्धागवात – पॅरालिसिस
अर्धागवात म्हणजे ‘भोग’; अर्धागवात म्हणजे सेवा; सेवेनंतर पुन्हा कदाचित अर्धागवात, नंतर पुन्हा सेवा असा रोगाचाच दंडक आहे. वैद्य डॉक्टरांचा त्यातील भाग फक्त सल्लामसलतीचा असतो. वयस्कर मंडळींनी विशेषत: मधुमेह, उच्च रक्तदाब, मानसिक चिंता असणाऱ्यांनी व मलावरोधाचा इतिहास असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यायलाच हवी. हा रोगामुळे माणूस शारीरिक व मानसिकदृष्टय़ा खचतो; त्याची कार्यक्षमता कमी होते. मधुमेही व्यक्तींनी मधुमेह हा ‘छुपारूस्तुम’ आहे, हे लक्षात घ्यावे. त्याकरिता दर तीन महिन्यांनी रक्त देऊन रक्त शर्करा तपासावी. जेवणात ज्वारी, बाजरी व बटाटा, रताळे सोडून सर्व भाज्यांना प्राधान्य द्यावे. जेवण विभागून जेवावे. कटाक्षाने रोज सकाळी दहा बेलाची पाने एक कप पाण्यात अटवून उकळून – अर्धाकप उरवून काढा प्यावा. रात्री जेवणानंतर फिरून यावे. पिष्टमय पदार्थ, गोड पदार्थ, व्यसने व जागरण टाळावे.
ज्यांना बौद्धिक काम खूप आहे, त्यांनी किमान पाच मिनिटे सकाळी व सायंकाळी शवासनात स्वस्थ पडून रहावे. दीर्घश्वसन व प्राणायाम करावा. जेवणात पुदीना, आले, लसूण अशी चटणी व सुंठचूर्ण मिसळलेले गरम पाणी प्यावे. मनावर सतत आघात, कुढणे, दु:ख दाबणे, अती विचार ही कारणे टाळावी. अर्धागवाताच्या काहींना पूर्वसूचना मिळत असतात. त्यांची लगेच दखल घ्यावी. मधुमेह व रक्तदाबाचा पूर्वेतिहास असणाऱ्यांनी आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, मधुमेह वटी, गोक्षुरादि गुग्गुळ प्रत्येकी तीन गोळ्या व रसायन चूर्ण एक चमचा असे सकाळ-सायंकाळ घ्यावे. मधुमेह काढा दोन्ही जेवणानंतर चार चमचे घ्यावा. मधुमेह नसणाऱ्यांनी किंवा मधुमेह असणाऱ्यांनी नियमितपणे आयुर्वेदीय पद्धतीने दशमूलादि काढय़ांचा एनिमा व तीळ तेलाची पिचकारी घेतल्यास सत्वर आराम मिळतो. पोटात वायू धरणाऱ्यांनी अभयारिष्ट, त्रिफळा गुग्गुळ, आम्लपित्त गोळ्या; गरज पडल्यास दशमूलारिष्ट घ्यावे. मानसिक लक्षणे असल्यास सारस्वतारिष्ट घ्यावे. सर्वागाला नियमितपणे महानारायण तेल जिरवावे. अणू तेलाचे नस्य करावे. रात्री निद्राकर वटी घ्यावी.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले