News Flash

अनेक पुरस्कारांचे मानकरी

बंगाली साहित्यात मोलाची भर घालणारे ताराशंकर बंद्योपाध्याय यांना अनेक सन्माननीय पुरस्कार मिळाले आहेत.

बंगाली साहित्यात मोलाची भर घालणारे ताराशंकर बंद्योपाध्याय यांना अनेक सन्माननीय पुरस्कार मिळाले आहेत. १९४७ मध्ये कलकत्ता विद्यापीठातर्फे त्यांना शरद मेमोरिअल पदकाने सन्मानित करण्यात आले. १९५६ मध्ये पश्चिम बंगाल सरकारतर्फे, रवींद्र मेमोरिअल अकादमीतर्फे रवींद्र पुरस्कार प्रदान करण्यात आला.  १९६६ -शिशिरकुमार पुरस्कार. १९६९ – कलकत्ता व जादवपूर विद्यापीठातर्फे त्यांना डी.लीट्. साहित्य अकादमीची फेलोशिपही मिळाली आणि १९६९ मध्ये ते वंगीय साहित्य परिषदेचे अध्यक्ष झाले होते.  भारतीय साहित्यिकांच्या प्रतिनिधींचे प्रमुख म्हणून ते ताश्कंदला गेले होते. त्यांनी रशियालाही भेट दिली. चीन सरकारच्या नियंत्रणावरून त्यांनी चीनचा दौरा केला. १९५२ ते ६० विधानसभा सदस्य, १९६०-६६ राज्यसभा सदस्य, १९६६ मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार.

भारत सरकारने ताराशंकर यांना ‘पद्मश्री’ आणि १९६९ मध्ये ‘पद्मभूषण’ने सन्मानित केले आहे. ताराशंकर यांच्या साहित्यकृतींवर- उदा. जलसाघर, अभिजन इ. चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

. ताराशंकरांचे व्यक्तिगत आदर्श व त्यांची साहित्यिक निष्ठा म्हणजेच ‘गणदेवता’ ही कादंबरी म्हणजे त्यांच्या ‘चंडीमंडप’ आणि ‘पंचग्राम’ या दोन कादंबऱ्यांचे एकत्रित स्वरूप आहे. कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी शोषक आणि शोषित वर्गातील परस्परकलहाची मूळ कारणे शोधून काढण्याचा प्रयत्न केला आहे. समाज, न्याय, प्रतिष्ठा इ.ला कसा सुरुंग लागतो व जनतारूपी गणदेवतेचा कोप झाला की, कोणत्या अरिष्टांना तोंड द्यावे लागते, हे त्यांनी ‘गणदेवता’ या पुरस्कारप्राप्त कादंबरीत चित्रित केले आहे. पूर्वापार चालत आलेल्या, बलुतेदारी पद्धतीला हळूहळू का आणि कसा सुरुंग लागतो याविषयी अनिरुद्ध लोहार आणि गिरीश सुतार यांच्या निर्णयातून स्पष्ट होत जाते. पुढे मग चांभार, न्हावी इ. सर्व कामगारही अन्यायाला तोंड देण्याचे धाडस दाखवू लागतात. समाजाची पारंपरिक चौकटच हळूहळू खिळखिळी होत जाते. ताराबाबूंनी आपल्या वीरभूम या प्रदेशातील शेतकऱ्यांचे, श्रमिकांचे कठीण आणि कष्टप्रद जीवन जवळून पाहिले होते. त्यामुळेच त्यांच्या समस्या, त्यांची मानसिकता ते प्रभावीपणे मांडू शकले.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

 

व्यवहारात एककांची आवश्यकता

मनुष्याच्या आयुष्याची सुरुवात वजनाने होते व शेवट मापाने होतो असे म्हणतात. मूल जन्माला आले की सर्वप्रथम त्याचे वजन मोजले जाते. वजनावरून मुलाची वाढ योग्य आहे की नाही याचा अंदाज बांधला जातो. आणि मानवाच्या जीवनाची सुरुवात होते.

इहलोकीची यात्रा संपवून मनुष्य जेव्हा जगाचा निरोप घेतो, तेव्हाही त्याचा देह ठेवण्यासाठी योग्य लांबीची पेटी वा तिरडी बांधली जाते. अथवा खड्डा केला जातो. थोडक्यात, मनुष्याचे जन्म-मरणच नव्हे तर त्याच्या दैनंदिन जीवनातही वजनमापे महत्त्वाच्या स्थानी आहेत.

अन्न, वस्त्र आणि निवारा या मनुष्याच्या मूलभूत गरजा. हे सर्व करताना देवाणघेवाण आलीच. जिथे देवाणघेवाण आहे, तिथे तिथे मोजमापन आहे.

मानवाने मापन करण्यासाठी शरीर, हात, पाय, बोटे (अंगुळे), डोळ्याच्या पापणीची हालचाल, पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिवलन इत्यादींचा उपयोग केला आहे.

विहीर किती पुरुष खोल आहे? ओटय़ाची लांबी किती वीत आहे? घरापासून शाळा किती पावलांवर आहे? पिकाची आणेवारी किती? जमिनीचा सामू किती? अशा अनेक बाबतींत मोजमाप सांगण्याचा प्रघात फार प्राचीन काळापासून आहे.

 

बनियन कोणत्या साइजचा? किती नंबरची बूट- चप्पल? फास्टिंग आणि पोस्ट फास्टिंग शुगर किती? काविळीत बिलिरुबिनचे प्रमाण किती? तापमान किती आहे? आद्र्रता किती? वाऱ्याचा वेग किती? प्रदूषणाचे प्रमाण काय? असे मोजमापनाशी निगडित अनेक प्रश्न अधूनमधून कानावर येत असतात. या मोजमापांबद्दलचे कुतूहल सर्वसामान्यांच्या मनात असणे स्वाभाविक आहे.  अनेक वेळा १ पौंड म्हणजे किती किलोग्रॅम? १ गुंठा म्हणजे किती चौरस किलोमीटर? १ एकर म्हणजे किती हेक्टर? १ क्यूसेक्स म्हणजे किती लिटर पाणी? काही लाख कोटी म्हणजे किती परार्ध? अशी अनेक रूपांतरणे त्या त्या क्षेत्रातील व्यक्तीला माहीत असावी लागतात. या संदर्भातील माहितीसुद्धा खूप रंजक आणि उपयुक्त आहे.  निरनिराळ्या देशांतही मापनात खूपच विविधता आढळते. कालपरत्वे मापनांची विविधता जाणून घेणे आता खूप गरजेचे झाले आहे.

वैज्ञानिक प्रगतीमुळे जग खूप जवळ येत चाललेले आहे. आधुनिक संशोधनामुळे निरनिराळी एकके माहीत होत आहेत. या एककांची माहिती आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेऊ.

– प्रा. दिलीप गोटखिंडीकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 12:10 am

Web Title: tarasankar bandyopadhyay 3
Next Stories
1 अर्थक्रांतीला मर्यादा
2 ताराशंकर बन्द्योपाध्याय
3 गणदेवता : लक्षवेधी कादंबरी
Just Now!
X