News Flash

कुतूहल : गणित शिक्षकाचे मनोगत

गणिताचा पाया भक्कम असलेल्या व्यक्ती कारकीर्दीच्या क्षेत्रात यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते.

कुतूहल : गणित शिक्षकाचे मनोगत

५ सप्टेंबर हा शिक्षकांच्या सन्मानाचा दिवस! शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांना आदरभावना असतेच पण गणिताचा शिक्षक बहुतेकदा अप्रिय या सदरात मोडणारा, कारण गणित विषय डोक्यावरून जातो असे अनेक मुलांना वाटते. एकदा ही भावना पक्की झाली की मग ती दूर करणे महाकठीण! त्यामुळे विद्यार्थी गणितप्रेमी कसे होतील ही गणिताच्या शिक्षकापुढील नेहमीची समस्या! विशेषत: शालेय शिक्षकाच्या, कारण तिथे गणित अनिवार्य आहे.

‘नेमके आणि अचूक’ हा गणिताचा मूलमंत्र आहे, जो तसे पाहिल्यास प्रत्येक क्षेत्रात आवश्यक असतो. पण हे लहान मुलांच्या मनावर कसे बिंबवणार? इथेच शिक्षकाच्या कल्पकतेचा कस लागतो. पाढे शिकवताना, ते कसे तयार होतात? त्यांच्यात काही विशेष आकृतिबंध दिसतात का? पाढय़ांमुळे आकडेमोड कशी सोपी होते? याची गमतीदार उदाहरणे वर्गात दिली तर लहान मुले छान रमतात. मोठय़ा वर्गातली मुले सरावासाठी रोज पाढे म्हणायला, लिहायला कंटाळतात. मग काहीतरी मार्ग काढला तर? रोजच्या दिनांकाचा एकच पाढा सर्वानी म्हणायचा आणि लिहायचा. १ आणि ३१ तारखेला सुट्टी! एवढे तरी मुले आनंदाने करतात. बालवयातील संस्कार इतका दृढ असतो की भारतीय प्रौद्योगिकी संस्थानात (आयआयटी) शिकणारी दोन मराठी मुले, एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आकडेमोड करताना मनात पाढेच म्हणत असत.

गणित कठीण वाटण्याचे एक कारण म्हणजे त्यातील पारिभाषिक शब्दांचा, कृतींचा अर्थ माहीत नसणे. भाषामाध्यम कोणतेही असो, परिभाषेत खूप गुणधर्म दडलेले असतात. उदाहरणार्थ, एकपदी, द्विपदी, त्रिपदी, बहुपदी या शब्दांमध्ये जो अर्थ व्यक्त होतो तोच इंग्रजीत मोनोमिअल, बायनॉमिअल, ट्रायनॉमिअल, पॉलिनॉमिअल यांमधून होतो. समीकरण- इक्वेशन या शब्दांतच दोन बाजू समान- इक्वल हा अर्थ आहे. मग एकाच वेळी सत्य असतात ती एकसामयिक (सायमल्टेनिअस) समीकरणे. इथे ‘सामयिक’ हा शब्द आहे, ‘सामाईक’ नव्हे. समय म्हणजे वेळ, आणि एकसामयिक म्हणजे एकाच वेळेची, एकत्र सोडवण्याची! सामाईक म्हणजे साधारण/ सर्वाचा/ सर्वासाठी, कॉमन! म्हणून संख्यांच्या सामाईक विभाजकांमधील सर्वात मोठा तो महत्तम सामाईक विभाजक आणि सामाईक विभाज्यांमधील सर्वात लहान तो लघुतम सामाईक विभाज्य. येथे महत् = मोठे आणि लघु = लहान. म्हणून महत्तम आणि लघुतम (लघुत्तम नव्हे!) असे शब्द. मानवी भाषा आणि गणित यांची एकमेकांत गुंफण आहे. शब्दमैत्री झाली की गणित आवडू लागेल! भरपूर आकृत्याही गणिती संबोध स्पष्ट करण्यास मदत करतात.

गणिताचा पाया भक्कम असलेल्या व्यक्ती कारकीर्दीच्या क्षेत्रात यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे शाळेतच गणिताशी मैत्री कशी जुळावी आणि ती टिकावी याबद्दलचे विचारमंथन आगामी लेखांतून वाचू.

– डॉ. मेधा लिमये

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : www.mavipa.org    

ईमेल : office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2021 1:05 am

Web Title: teacher day quotes mathematics teachers mindset zws 70
Next Stories
1 नवदेशांचा उदयास्त : मखमली घटस्फोट!
2 नवदेशांचा उदयास्त : वेल्व्हेट रिव्होल्यूशन
3 कुतूहल : घोड्याचे शिस्तबद्ध पर्यटन
Just Now!
X