एकोणिसाव्या शतकात नवनव्या मूलद्रव्यांच्या शोधासाठी शास्त्रज्ञांचे बरेच प्रयत्न चालू होते. कार्लो पेरिर आणि एमेलिओ नसेग्रे या इटलीतील पालेर्मो विद्यापीठातील संशोधकांनी सायक्लोट्रॉनच्या टाकाऊ भागापासून या मूलद्रव्याची निर्मिती केली. कृत्रिम या अर्थाच्या टेक्नेटोज या ग्रीक शब्दावरून या मूलद्रव्याला टेक्निशिअम हे नाव देण्यात आले. टेक्निशिअम हे ४३ अणुक्रमांकाचे पाचव्या आवर्तनातील सातव्या श्रेणीतील सर्वात हलके आणि किरणोत्सारी मूलद्रव्य! पृथ्वीच्या पृष्ठभागात ते अत्यंत कमी प्रमाणात असते. युरेनिअम व थोरिअम यांच्या विघटनातून निर्माण होणारे हे मूलद्रव्य स्वत: किरणोत्सारी असल्यामुळे कुठल्याही वेळी पृथ्वीच्या पृष्ठभागावर ते जास्तीत जास्त १८ हजार टन एवढेच सापडते.

प्लॅटिनमसदृश रूप असलेल्या या मूलद्रव्याची अणुरचना षटकोनी, काहीशी ग्रॅफाइटसारखी आहे. फारसे क्रियाशील नसलेले टेक्निशिअम हे आम्लराज (अ‍ॅक्वा रेजिया) व गंधकाम्लात विरघळते. त्याची पावडर ऑक्सिजनच्या सान्निध्यात पेट घेते.

टेक्निशिअम ऑरगॅनिक अणूंबरोबर संयोग करून जी जटिल संयुगे बनवते ती न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये अत्यंत उपयोगी ठरली आहेत. टेक्निशिअमचे सर्वात स्थिर समस्थानिक आहे Tc-98 ज्याचे अर्धे आयुष्यकाळ ४२ लाख वर्षे आहे. Tc-93, Tc-94, Tc-95, Tc-96, Tc-99m यांचे अर्धे आयुष्यकाळ अनुक्रमे २.७३ तास, ४.८८ तास, २० तास, ४.३ दिवस व ६.०१ तास असल्याने त्याचा उपयोग न्यूक्लियर मेडिसिनमध्ये पुष्कळ होतो. मेंदू, हृदय थायरॉइड, फुप्फुसे, यकृत, पित्ताशय,  मूत्रिपडे, अस्थी रचना, रक्त व टय़ूमर्स यांच्या अभ्यासाकरिता Tc-99m म्हणजे मेटास्टेबल) रेडिओ ट्रेसर म्हणून वापरला जातो. महत्त्वाचा भाग हा की, निदानासाठी टेक्निशिअम वापरण्याचा फायदा म्हणजे हे मानवी शरीरातून पटकन बाहेरही टाकले जाते.

Tc-95 या समस्थानिकाचा उपयोग वनस्पती व प्राण्यांच्या अभ्यासाकरिता केला जातो. Tc-99 चे अर्धे आयुष्यकाळ मात्र २१.१ लाख वर्षे आहे. हा रेणू कमी शक्तीचे बीटा किरण सोडते, त्याचा वापर कॅलिब्रेशन (मात्रांकन), उत्प्रेरक, गंजरोधक घटक म्हणून होतो.

असे हे टेक्निशिअम व त्याचे समस्थानिक प्रयोगशाळेतच प्रामुख्याने तयार होतात. वैज्ञानिक ज्या तऱ्हेने प्रत्येक मूलद्रव्याचे गुण जाणून त्यांना मनुष्याच्या सेवेकरिता वापरतात त्याने अचंबित व्हायला होते.

डॉ. कविता रेगे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org