वातानुकूलन यंत्रांच्या गाळण जाळ्या (फिल्टर्स) : घरामध्ये, कार्यालयामध्ये किंवा उद्योगांमध्ये हवेचे तापमान आणि आद्र्रता नियंत्रित करण्यासाठी तसेच हवा खेळती राहण्यासाठी वातानुकूलन यंत्रांचा वापर केला जातो. या यंत्रांमध्ये आतील किंवा बाहेरील हवा घेऊन तिचे तापमान किंवा आद्र्रता नियंत्रित करून परत आत पाठविली जाते. या वेळी हवेतील धुळीचे कण गाळण्यासाठी सहा जाळ्यांचा वापर केला जातो.
व्हॅक्युम क्लीनरच्या गाळण जाळ्या : व्हॅक्युम क्लीनरमुळे खोलीतील धूळ व हवा शोषून घेतली जाते. शोषून घेतलेली ही हवा परत खोलीतच सोडली जाते. या वेळी ती गाळून घेणे महत्त्वाचे असते यासाठी गाळण जाळी वापरण्यात येते. या गाळण जाळीची रचना अतिशय महत्त्वाची असते. कारण अतिशय सूक्ष्म आकाराचे कणही गाळण्याची तिची क्षमता असावी लागते.
गाद्या व उशा यांचे घटक : घरामध्ये विविध प्रकारच्या गाद्या व उशा वापरण्यात येतात. या सर्व गृहवस्त्रांच्या वर्गामध्ये मोडतात. पारंपरिक पद्धतीच्या गाद्या व उशा कापसापासून तयार केल्या जात असत. आधुनिक पद्धतीच्या गाद्या फोम वापरून तयार करण्यात येतात तर उशा या पॉलिस्टरचे पोकळ किंवा त्रिदलीय अथवा बहुदलीय तंतू वापरले जातात.
विनावीण कापडाची पुसणी : या पुसण्यांचा उपयोग स्वच्छतेसाठी तसेच किटाणू नाहीसे करण्यासाठी केला जातो. त्यांच्या मऊपणा आणि शोषकता या गुणधर्मामुळे अलीकडच्या काळात या प्रकारची पुसणी चेहरा पुसण्यासाठी, लहान मुलांसाठी, हात आणि अंगपुसणी म्हणून आणि स्त्रियांची आरोग्यदायक पुसणी म्हणून अतिशय लोकप्रिय झाली आहेत. विनावीण कापडापासून तयार केलेली पुसणी ही पॉलिस्टर, व्हीस्कोज आणि पॉली प्रॉपिलीन या तंतूंपासून स्पनलेस तंत्राने बनविली जातात.
मच्छरदाण्या : डासांपासून संरक्षणासाठी मच्छरदाणीचा उपयोग केला जातो त्यामुळे भारतासारख्या देशांमध्ये त्यांना मोठी मागणी असते. यासाठी बहुधा नायलॉन तंतूंचा उपयोग करण्यात येतो.
फíनचरचे घटक : घरामध्ये किंवा कार्यालयांमध्ये जे फíनचर वापरले जाते त्यांचे बरेचसे घटक कापडापासून बनविले जातात. यासाठी वीणाई पद्धतीने बनविलेले कापड वरचे आच्छादन म्हणून तर काथ्या, कापूस, पॉलिस्टर यासारखे तंतू भरणतंतू म्हणून वापरले जातात.
चं. द. काणे (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – राजा रवि वर्मा
त्रावणकोरच्या राजघराण्यात किलीमानूर येथे जन्मलेले रवि वर्मा कोवील थंपुरन त्यांच्या अप्रतिम चित्रकारितेमुळे पुढे ‘राजा’ या नावाने गौरविले गेले. १८४८ साली जन्मलेल्या रवि वर्मा यांचे नातलग, तत्कालीन त्रावणकोरचे महाराजा अयीलम थिरूनल यांच्या प्रोत्साहनामुळे मदुराई येथे चित्रकलेचे प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी गेले. पुढे थिओडोर जेन्सन या डच चित्रकाराकडे त्यांनी तलरंगशैलीचेही शिक्षण घेतले. ब्रिटिश प्रशासक एडगार थर्सटन यांच्या आग्रहामुळे रवि वर्मानी १८७३ मध्ये व्हिएन्ना येथील चित्रप्रदर्शनात पाठविलेल्या त्यांच्या चित्राला पुरस्कार मिळाला. पुढे १८९३ साली शिकागो येथील जागतिक चित्रप्रदर्शनातही त्यांना तीन सुवर्णपदके मिळाली आणि त्यानंतर जागतिक पातळीवर ते एक अग्रगण्य चित्रकार म्हणून ओळखले जाऊ लागले. तंजावर चित्रशैलीचा अभ्यास केल्यावर त्यांनी भारतीय साहित्य आणि संस्कृतीतील पात्रांची रंगीत चित्रे चितारण्यास सुरुवात केली. रवि वर्मानी काढलेल्या चित्रांनंतरच हिंदूंना आपले देव कसे दिसत असावेत याची कल्पना आली. भारतातील परंपरागत हिंदू महाकाव्ये आणि पुराणकथा यांवर रवि वर्माने काढलेली चित्रे आजही प्रमाण मानली जातात. युरोपियन चित्रकारांप्रमाणे ‘कमिशन पोर्टरेट’ काढणारे ते पहिले चित्रकार. रामायण, महाभारतातील त्यांच्या विश्वामित्र-मेनका, दुष्यंत-शकुंतला, जटायू वध इत्यादी चित्रांनी प्रसंगदृश्ये डोळ्यांसमोर साकार झाली. आपली चित्रे छापून सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी लोणावळ्याजवळ मळवली येथे लिथोग्राफी पद्धतीचा छापखाना काढला. पौराणिक कथाचित्रांशिवाय त्यांची ‘विचारमग्न युवती’, ‘तंतुवाद्य वाजवणारी स्त्री’, ‘भिकारी कुटुंब’ अशी अनेक चित्रे लोकप्रिय झाली. १९०४ साली भारताचे व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी सम्राट सातवे एडवर्ड यांच्या वतीने ‘कैसर-ए-हिंद’ हा पुरस्कार देऊन राजा हा खिताब रवि वर्मा यांना दिला.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com