अठराव्या शतकाच्या अखेरीस ‘ऑरम प्रॉब्लेमेटिकम’ असे नाव असलेले निळसर चंदेरी दिसणारे सोन्याचे खनिज सापडले. फ्रान्झ-जोसेफ म्यूलर वॉन रायकनस्टाइन याने महत्प्रयासाने यातून अँटिमनी समजून एक मूलद्रव्य, वेगळे केले. परंतु अशा पद्धतीने मिळविलेल्या अँटिमनीला येणारा मुळ्यासारखा वास कसा हे काही त्याच्या लक्षात येईना. पुढे १७९८ मध्ये क्लॅपरॉथने याच ‘ऑरम- प्रॉब्लेमेटिकम’पासून एक मूलद्रव्य वेगळं केलं. त्याच्या लक्षात आलं की रायकनस्टाइनसाहेबांना सापडलेलं मुळ्याच्या वासाचं मूलद्रव्य आणि हे मूलद्रव्य एकच असून ते अँटिमनी नाही. त्याने या मूलद्रव्याचं नाव पृथ्वीत मिळालेला म्हणून टेलुरिअम ठेवलं. टेलुरिअमची लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, हे मूलद्रव्य पृथ्वीपेक्षा इतर विश्वात अधिक प्रमाणात आढळतं. असे असण्याची एक शक्यता मानली जाते ती ही की पृथ्वीच्या गर्भातील टेलुरिअम, पृथ्वीचा तप्त गोळा थंड होऊन, जमीन बनण्याच्या काळात हायड्रोजन टेल्युराइड (H2Te) हे वायुरूपात विश्वात विलीन झाले. आवर्तसारणीतील सोळाव्या गणातील ऑक्सिजन कुटुंबातील मूलद्रव्यांना चालकोजन (chalcogen) म्हणजेच खडक तयार करणारेदेखील म्हणतात. याचे मुख्य कारण म्हणजे खडकांमधील अनेक खनिजांत या कुटुंबातील मूलद्रव्ये आढळतात. प्राणवायू म्हणून परिचयाचा असणारा ऑक्सिजन या कुटुंबाचा प्रमुख तर याच कुटुंबातील टेलुरिअम हा प्राणघातक आहे.

मूलद्रव्य म्हणून अगदी नगण्य प्रमाणात आढळणारा व म्हणून कदाचित मानवी व्यवहारात कमी सापडणारा आणि संयुग स्वरूपात देखील खूप उपयुक्तता नसणारा तरी रसायनशास्त्राच्या अभ्यासात टेलुरिअम महत्त्वाचा कसा? याची दोन कारणं सांगता येतील. एक म्हणजे टेलुरिअमचे इतर धातूंबरोबर बनणारे टेल्यूराइड्स उदाहरणार्थ कॅडमियम टेल्यूराइड (CdTe4) जे सौर ऊर्जानिर्मितीत लागणारे (सौर घट (सोलार पॅनल्स) बनविण्यासाठी वापरले जाते. दुसरे कारण आधुनिक रसायनशास्त्राशी निगडित आहे. नॅनो रसायनशास्त्राच्या अत्याधुनिक जगात वावरणारे, अणुसमूहांची आयनं ज्यांना झिंटल आयन (Zintl ion) म्हणतात, अशी (Te4)2+ (Te6)2+ आयन आहेत. अशा झिंटल आयनची रचना व अभ्यास आधुनिक रसायनशास्त्रात खूप महत्त्वाचा मानला जातो. तेल शुद्धीकरणात उत्प्रेरक म्हणून तसेच रीरायटेबल (पुन:पुन्हा रेकॉर्ड करता येण्याजोग्या) सीडी, डीव्हिडीमध्ये टेलुरिअमचा वापर केला जातो.

फ्रेंच भूगर्भशास्त्रज्ञ चांकोटरेइसने १८६२ मध्ये अणुभारावरून तयार केलेल्या आवर्तसारणीच्या  टेल्युर- स्क्रू- मॉडेलच्या केंद्रस्थानी टेलुरिअम होते.