20 January 2019

News Flash

तापमान व विद्युतप्रवाहाची एकके

प्रत्येक एककाचे वेगळे मोजमाप घ्यावे लागू नये

प्रत्येक एककाचे वेगळे मोजमाप घ्यावे लागू नये म्हणून, वैश्विक स्थिरांक वापरून एककांना एकमेकांशी सांधण्याची संकल्पना सेकंद-मीटर-किलोग्रॅम यांपलीकडेही वाढवता येते. आज आपण केल्विन (तापमानाचे एकक) व अँपिअर (विद्युतप्रवाहाचे एकक) यांचा आढावा घेऊ.

एक केल्विनची व्याख्या ही पाण्याच्या तिहेरी बिंदूवर आधारित आहे. एका वातावरणाइतक्या दाबाखाली, ज्या तापमानाला पाणी, बर्फ व वाफ एकत्र अस्तित्वात राहू शकतात, ते तापमान २७३.१६ केल्विन इतके मानले गेले आहे. त्याचबरोबर उष्मप्रवैगिकीनुसार (म्हणजे थर्मोडायनॅमिक्सनुसार) सर्वात कमी तापमान हे शून्य केल्विन मानले गेले आहे. या दोन तापमानांतील फरकाचा २७३.१६वा भाग म्हणजे एक केल्विन.

एककाची ही व्याख्या अर्थातच काही फारशी समाधानकारक नाही. इथे मदतीला येतो तो उष्मप्रवैगिकीतील बोल्ट्झमनचा स्थिरांक. हा स्थिरांक वायूंतील रेणूंची ऊर्जा व वायूचे तापमान यांचा एकमेकांशी संबंध जोडतो व याची किंमत १.३८०६४९ ७ १०-२३ ज्यूल प्रति केल्विन एवढी स्थिर असते. ज्यूल हे ऊर्जेचे एकक मीटर, किलोग्रॅम आणि सेकंद या परिचित एककांद्वारा मिळवता येते. त्यामुळे बोल्ट्झमनच्या स्थिरांकाचे मूल्य वापरून केल्विनची व्याख्या सुलभरीत्या करता येते. ही नवी व्याख्या २०१८ पासून प्रचलित होईल.

विद्युतप्रवाहाचे एकक असणाऱ्या एक अ‍ॅम्पिअरची व्याख्या ’अनंत लांबीच्या व अतिसूक्ष्म जाडीच्या दोन तारा एकमेकांपासून एक मीटर अंतरावर ठेवल्या असताना, जो विद्युतप्रवाह एकमेकांवर २ ७ १०-७ न्यूटन प्रति मीटर एवढे विद्युतबल निर्माण करतो. तितका विद्युतप्रवाह’ अशी आज केली जाते.

व्याख्येतील क्लिष्टपणा सोडला, तरी इथे मुळात अडचण म्हणजे अशा अनंत लांबीच्या व अतिसूक्ष्म जाडीच्या तारा मिळणे शक्य नाही. याऐवजी जर इलेक्ट्रॉनचा विद्युतभार हाच स्थिरांक म्हणून वापरला तर अ‍ॅम्पिअरची व्याख्या करणे सुलभ होईल. एक अ‍ॅम्पिअर म्हणजे सेकंदाला एक कुलम विद्युतभाराचे वहन. ६.२४१५०९१२ ७ १०१८ इतक्या इलेक्ट्रॉनवरचा एकत्रित विद्युतभार हा एक कुलम इतका असतो. म्हणूनच, ‘६.२४१५०९१२ ७ १०१८ इतके इलेक्ट्रॉन एका सेकंदात पार होतील एवढा

विद्युतप्रवाह’ अशी एक अ‍ॅम्पिअरची सरळ व्याख्या करता येऊ शकते. लवकरच ही नवी व्याख्या अंगीकारली जाईल.

– डॉ. अमोल दिघे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

 office@mavipamumbai.org

 

डॉ. रघुवीर चौधरी – गुजराती

२०१५ चा  भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार, कवी, समीक्षक  रघुवीर चौधरी मिळाला. उत्तर गुजरातमधील महेसाणा जिल्ह्य़ातील गांधीनगरजवळील बापुपुरा या गावी ५ डिसेंबर १९३८ रोजी रघुवीर चौधरी यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मनसा या गावी झाले. महात्मा गांधीजी, विनोबा भावे, उमाशंकर जोशी, गोवर्धनराम त्रिपाठी, मनुभाई पंचोलींचे ‘दर्शक’ आाणि ‘गीता’ या साऱ्यांच्या विचारांच्या वाचनाने समता, बंधुत्वाचे संस्कार शालेय वयातच त्यांच्यावर झाले.  वडिलांच्या शेतीकामात ते मदत करीत असत. खादी विणत असत. म. गांधीजींच्या आत्मवृत्ताचा, विचारांचा विलक्षण प्रभाव त्यांच्यावर होता. गुजराती, हिंदी, संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. कालिदास, रवींद्रनाथ टागोर, प्रेमचंद, इलियट इत्यादींचे साहित्य त्यांच्या आवडीचे आहे. १९६० मध्ये हिंदी विषयात बी.ए.ला प्रथम क्रमांकाने तर १९६२ मध्ये एम.ए. परीक्षा ते उत्तीर्ण झाले.

हिंदी आणि गुजराती बोलीभाषेचा (व्हर्बल रूटस) तुलनात्मक अभ्यास या विषयावर १९७९ मध्ये त्यांनी पीएच.डी. केली. गुजरात विद्यापीठाच्या भाषा विभागात १९७७ ते १९९८ पर्यंत ते हिंदीचे प्राध्यापक, विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते.

१९७० च्या आणीबाणीला त्यांचा विरोध होता. नवनिर्माण चळवळीत त्यांचा सहभाग होता. १९९८ ते २००२ साहित्य अकादमीचे आणि २००२ ते २००४ ते प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य होते.  रघुवीर चौधरी यांची ८० हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली असून, अधिकतर लेखन गुजरातीमध्ये, तर काही हिंदीमध्ये आहे. आतापर्यंत ३१ कादंबऱ्या, ३३ काव्यसंग्रह, नाटके, प्रवासवर्णन आणि  विपुल स्तंभलेखन केले आहे.  ग्रामशिक्षण, प्रौढ शिक्षण, शालेय ग्रंथालय या साऱ्यांविषयी त्यांना आस्था आहे. गावातील शेतीतही ते रमतात. शहरात आल्यावरही त्यांचे मन त्यांच्या शेतात, गावातच मोकळा श्वास घेण्यासाठी धावते आणि मगच ‘मी रिचार्ज होतो’असे ते म्हणतात.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

First Published on December 22, 2017 3:06 am

Web Title: temperature and power supply units