18 February 2019

News Flash

दुभंग

मोटारींच्या इंजिनमधील सिलिंडरचा दट्टय़ा त्यातील पेट्रोलवर दाब टाकत त्याला हळूहळू त्याच्या ज्वलनिबिंदूपर्यंत नेतो.

मोटारींच्या इंजिनमधील सिलिंडरचा दट्टय़ा त्यातील पेट्रोलवर दाब टाकत त्याला हळूहळू त्याच्या ज्वलनिबिंदूपर्यंत नेतो. इंधन मग पेट घेतं आणि इंजिनाला ऊर्जा पुरवतं; परंतु पूर्ण दाब पडायच्या आधीच जर ज्वलनिबिंदू गाठला गेला तर मग इंजिन पूर्ण कार्यक्षमतेनं काम करू शकत नाही. या समस्येवर मात करण्यासाठी पेट्रोलमध्ये टेट्राईथाईल लेड हे शिशाचं संयुग घालण्याचा उपाय वैज्ञानिकांना सापडला होता. त्यानुसार असं शिसेमिश्रित पेट्रोलच मोटारींसाठी वापरलं जाऊ लागलं; परंतु अशा मोटारींमधून जे वायू उच्छिष्टासारखे बाहेर फेकले जातात त्यात या शिशाचा अंश सापडू लागला. त्यापायी हवेचं मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होऊ लागलं. त्याच सुमारास शिशाच्या विषारी गुणधर्माचाही छडा लागला. जडशील धातूंचं विषारीपण ही आरोग्याला हानीकारक ठरणारी मोठीच समस्या आहे. त्यात शिशाचा क्रमांक वरचा लागतो. म्हणूनच शिशापायी होणारं हवेचं प्रदूषण टाळण्याला प्राधान्य देण्यात आलं. अमेरिकेत १९९५ सालीच कायद्यानं पेट्रोलमध्ये शिसं मिसळण्यावर बंदी घालण्यात आली. आपल्याकडेही गेल्या पंधरा वर्षांपासून असं ‘अनलेडेड पेट्रोल’ विकलं जाऊ लागलं. सुरुवातीला शिसेमिश्रित आणि शिसेविरहित, अशी दोन्ही प्रकारची पेट्रोल मिळत असत. शिसेविरहित पेट्रोलपायी इंजिनाची कार्यक्षमता जरी वाढली तरी त्यासाठी इंजिनाला त्याच्या आयुर्मानात घट सोसावी लागते. म्हणून काही जण शिसेमिश्रित पेट्रोलच वापरत असत; पण कायद्यानंच त्याला बंदी करण्यात आल्यावर आता फक्त शिसेविरहित पेट्रोलच बाजारात मिळतं.

शिशाचे आरोग्यावर होणारे विषारी परिणाम फारच गंभीर आहेत. यातले काही तर प्रसंगी जीवही घेऊ शकतात. म्हणून हवेव्यतिरिक्त अन्न व पाणी यातूनही शिशाचं प्रदूषण होऊ नये याची दक्षता घ्यावी लागते. विशेषत: काही लहान मुलांना भिंती ओरखडून माती खाण्याची सवय असते. त्या िभतीला दिलेल्या रंगात जर शिसे असेल तर ते त्या बालकांच्या पोटात जाण्याचा धोका असतो. काही खेळण्यांना दिलेल्या रंगातही शिशाचा समावेश असे. आता अशा प्रकारे रंगांमध्ये शिसे असणार नाही किंवा शिसे असलेल्या मातीत भाजीपाला पिकवला जाणार नाही, याची काळजी घेण्यात येते. काही वेळा पाण्यातही शिसे मिसळण्याचा धोका असतो. त्यामुळे पेयजलात ते येणार नाही याकडेही लक्ष दिलं जातं.

जीवघेण्या किरणोत्सर्गापासून आपलं संरक्षण करणारं शिसं त्याच्या अंगच्या विषारीपणापायीच आपल्या जिवावर उठतं. दुभंगलेलं व्यक्तिमत्त्व यापरी याला दुसरं काय म्हणणार?

– डॉ. बाळ फोंडके

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

First Published on October 12, 2018 2:57 am

Web Title: tetraethyllead chemical compound