जुल ते सप्टेंबर या तिमाहीत सूतकताई संपवून विणाईची पूर्वतयारी, प्रत्यक्ष विणाई, त्यासाठीची यंत्रसामग्री, त्यांची वैशिष्टय़े व मर्यादा, याचा ऊहापोह केला होता. ताणा बाणा म्हणजे काय? कापडाच्या मूलभूत विणी, त्यांचे प्रकार, शर्टिंग, डेनिम, साडय़ांचे विविध प्रकार यांचा आढावा घेतला होता. या तिमाहीत वेगवेगळ्या लेखकांचे योगदान होते, त्यामुळे कंटाळा आला अशी एकही प्रतिक्रिया नव्हती. खादी, टर्किश टॉवेल या प्रकारांची ओळख करून दिली होती.

या टप्प्यावर अनुकूल प्रतिक्रियांचे दूरध्वनी, लघुसंदेश खूपच आले, खासकरून साडय़ांबाबतच्या लेखांवर सर्वात जास्त प्रतिक्रिया होत्या. चोखंदळपणे साडय़ा खरेदी करणाऱ्या स्त्रियांना वैशिष्टय़े समजली, त्यामुळे साडी खरेदी करताना ही माहिती उपयुक्त ठरली. साडय़ांची ओळख करून देताना विषयाची मांडणी समर्पक शब्दांत केली होती, तसेच साडीचा इतिहास, अर्थशास्त्र, तांत्रिक माहिती यांची चांगली सांगड घातली होती, अशी प्रतिक्रिया पुण्यातल्या वाचकाने दिली होती. अमरावतीहून आलेल्या प्रतिक्रियेद्वारे शहापुरी साडी कुठे मिळेल, याविषयी चौकशी केली. आणखी काही साडय़ांबद्दलचे लेख वाचून या विषयावर पुस्तक काढावे अशी मागणी आली. विशेष म्हणजे या दोन्ही प्रतिक्रिया पुरुष वाचकांनी दिल्या होत्या. दीपा काळे यांनी साडय़ांविषयीचे सर्व लेख आवडले, ते माहितीपूर्ण होते, आम्ही साडय़ा नेसतो पण असा तपशील कधीच माहीत नव्हता. तो या लेखांमुळे समजला. नारायण गिडटकर आणि अनिल जांभेकर या वस्त्रोद्योगातील बुजुर्गानी लेखांचे कौतुक केले. पुस्तक छापावे अशी विनंती केली. इतकेच नव्हे तर गिडटकर यांनी परिषदेला भेटही दिली. पुरुषोत्तम कनाडखेडकर या वंगण उद्योगातील अधिकाऱ्याने सदर नेहमी वाचतो, माहिती उपयुक्त आहे असे कळवले.
मिलिंद यांनी माहिती ज्ञानात भर घालणारी आहे. रंगीत कपडे खरेदी करताना काय काळजी घ्यावी अशी विचारणा केली. मुकुंद फडके यांनी टíकश टॉवेल आणि तुर्कस्थानचा संबंध आहे का, अशी विचारणा केली होती. काही साडय़ांच्या किमती दिल्या होत्या, सर्वच साडय़ांच्या किमती द्यायला हव्यात अशी मागणी सुनील बुधावत यांनी केली होती. मनोहर प धुंगट यांनी साडय़ांवरील लेख खूप माहितीपूर्ण आहेत असे कळवून पठणीविषयी माहिती विचारली. ती त्यांना ई-पत्राद्वारे पाठवली.
दिलीप हेर्लेकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – ‘विलीन’ होण्यापूर्वी – १
संस्थानांची माहिती देता देता वर्ष कसे सरले ते समजलेच नाही! अपेक्षेपेक्षा अधिक, भरघोस प्रतिसाद वाचकांकडून मिळाला. धन्यवाद!
शब्दमर्यादा आणि कालमर्यादा यांमुळे सर्व संस्थाने पुरी करता आली नाहीत. क्षमस्व. काही निवडक वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
‘आपल्या लेखांमधून ईस्ट इंडिया कंपनीविषयी दुर्मिळ माहिती ( २ जानेवारी) आपण पुरविली. धन्यवाद!’ असे पहिले पत्र श्रीकांत जगताप यांचे आले. या प्रकारे, माहितीबद्दल धन्यवाद किंवा दाद देणारी पत्रे वर्षभरात येत राहिली. तानसेन आणि रेवा संस्थानाविषयी (३ मार्च) नावीन्यपूर्ण माहिती दिल्याचा खास उल्लेख सुनील वैद्य -मुंबई यांनी केला, इंदूर संस्थानाविषयी नवीन माहिती मिळाल्याचे (१० मार्च) दिलीप देवधर- मुंबई यांनी, भोर संस्थानाविषयी (१ जून) उत्तम माहिती मिळाली असे संतोष पोतनीस, विलेपाल्रे यांनी, मोरवी/ गोंडल संस्थानाबद्दल (१५ जून) चांगली माहिती मिळाली असे आनंद चित्रे- मुंबई यांनी कळविले. औंधबद्दल (१८ सप्टेंबर) चांगली माहिती मिळाली असे महेश रणदिवे यांनी; तर मुधोळ संस्थानाविषयी लेख (१२ ऑक्टोबर) चांगला वाटला, असे अरुण पागनीस- अंधेरी यांनी लिहिले.
‘बडोदा संस्थान आणि टी. माधवराव यांच्याबद्दल सखोल माहिती मिळाली, असे प्रसिद्ध लेखिका मीना नेरुरकर यांचेही पत्र (२६ जून) आले.
बडोदे संस्थानाबद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे. ‘बडोद्याविषयीचा लेख परिपूर्ण’ असे सुजाता गुप्ते- मुंबई यांनी कळविले. काही संस्थांनांची माहिती मिळवणे जिकिरीचे होते, परंतु मिलिंद देशपांडे – पुणे (२४ फेब्रु.) यांनी ‘माहितीचा खजिनाच’ अशी दाद देऊन हुरूप वाढविला. विकास भट – अमरावती, परिश ठक्कर – सातारा, डॉ. सचिन नंदगुंडे, दापोली तसेच सुलभा बर्वे, सुरेश शिंदे, संदीप कान्हेरे, पंकज नेरूरकर, दिनेश पानसे (सर्व मुंबई) यांनीही वेळोवेळी माहितीला दाद दिली.
सूचना करणारी पत्रेही अनेक होती, त्यांबद्दल उद्या!
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com