News Flash

मनोवेध : भावनांचा खेळ

आपल्याला जे हवे असते ते ज्याला मिळालेले असते त्याचा आपल्याला मत्सर वाटतो

डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com

प्रेम, राग, मत्सर, चिंता, उत्सुकता, कंटाळा या सर्व भावना आहेत. समुपदेशनाचा एक उद्देश भावनांविषयी जागरूकता वाढवणे हा असतो. भावनावेगात होणारी कृती टाळायची असेल तर ‘आत्ता मनात ही भावना आहे’ याची नोंद करता यायला हवी. अशी नोंद करू लागलो की त्यांचा आवेग कमी होतो. मला राग येतोय याचे भान आले की रागाची तीव्रता कमी होते. अन्यथा रागाच्या भरात काय करतो आहे, बोलतो आहे याचे भान राहत नाही. ‘मला राग येतो आहे’ अशी नोंद करता येणे म्हणजेच मनाचा साक्षी होणे होय.  साक्षी होणे म्हणजे भावनाशून्य होणे नव्हे. मनात कंटाळा, राग, मत्सर निर्माण होणे हे माणूस असल्याचे लक्षण आहे, त्यामध्ये चुकीचे काहीच नाही. अनेक वेळा या भावना आपल्याला आपल्या आयुष्याचा उद्देश कळायला मदत करतात. आपल्याला कुणाकुणाचा मत्सर वाटतो हे समजून घ्यायला हवे, त्यामुळे आपली आंतरिक ओढ कोणत्या दिशेला आहे ते समजू शकते. आपल्याला जे हवे असते ते ज्याला मिळालेले असते त्याचा आपल्याला मत्सर वाटतो. समृद्धी, नावलौकिक, सत्ता, सुखोपभोग, स्वातंत्र्य यांतील आपल्याला नक्की काय हवे आहे, याचा विचार करायला हवा. ते मिळवण्यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत हेदेखील ठरवायला हवे आणि नंतर त्या प्रयत्नांचा, कष्टाचा कंटाळा आला तरी त्या कंटाळ्याला महत्त्व न देता प्रयत्न करीत राहायला हवेत. साक्षीभाव विकसित झाला की आपण आपल्या भावनांना नीट समजून घेऊ शकतो. कोणत्या भावनेला महत्त्व देऊन कृती करायची आणि कोणत्या भावनेला महत्त्व द्यायचे नाही ही निवड करण्याची क्षमता साक्षीभावाने येते. ती नसेल तर भावना आपल्यावर हुकूम गाजवते, आततायी निर्णय घ्यायला भाग पाडते. साक्षीभाव म्हणजे बुद्धिबळाच्या पटावरील सोंगटी न राहता त्या सोंगटय़ा हलवणारा खेळाडू होणे! पटावरील अनेक सोंगटय़ा एकाच वेळी हलवता येत असल्या तरी पुढील अनेक चालींचा विचार करून आत्ताच्या खेळीला कोणती सोंगटी किती घरे हालवायची हे खेळाडू ठरवतो. हेच मनातील भावनांविषयीदेखील करता येते. आपले मन नेहमी तर्कशुद्ध असतेच असे नाही. अशा वेळी आत्ता मनात परस्परविरोधी भावना आहेत असेही तटस्थपणे जाणणे शक्य असते. त्यातील कोणत्या भावनेनुसार कृती करायची हे विवेकबुद्धी ठरवते. ती विवेकबुद्धी साक्षीध्यानाने म्हणजे साक्षीभावाच्या सरावाने विकसित होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 2:25 am

Web Title: the game of emotions zws 70
Next Stories
1 मनोवेध : भावनावेग
2 कुतूहल : जागतिक चिमणी दिन
3 मनोवेध : देहबोली
Just Now!
X