ख्रिस्तपूर्व काळापासून फ्रान्स आणि जर्मनीचा काही प्रदेश गॉल या नावाने ओळखला जात असे. ख्रिस्तपूर्व २५० ते २२५ या काळात सीन नदीच्या काठी पारिसी या जमातीने प्रथम वस्ती केली. या वस्तीतूनच पुढे पॅरिस शहराचा उदय झाला.
रोमन सम्राट ज्युलीयस सिझरने साम्राज्यविस्तार करताना लंडन आणि केंट घेण्यापूर्वी आपला मोर्चा पॅरिसकडे वळवला. पॅरिसवर आक्रमण करण्यापूर्वी सिझरने तिथे असलेल्या पारिसी जमातीच्या नेत्यांना असे भासविले की, पारिसींवर हल्ला करून लूट करणाऱ्या रानटी टोळ्यांपासून त्यांचे रक्षण करण्यासाठी रोमन सन्य सीन नदीकाठी आणले आहे. सिझरचा हा डाव पारिसींच्या लक्षात येऊन त्यांनी सरळ सिझरलाच युद्धाचे आव्हान दिले. ख्रिस्तपूर्व ५२ साली टायटस लॅबीनस या रोमन सेनापतीच्या नेतृत्वाखाली रोमन लष्कराने पारिसींशी झालेल्या युद्धात त्यांचा पराभव केला. पारिसींच्या वस्तीवर आक्रमण करून सिझरने तिथे अंमल बसवला आणि त्या ठिकाणी छोटेसे गाव वसवून गॅलो-रोमन शिबंदीचे सन्य ठेवले.
सुरुवातीला त्याने या गावाचे नाव ठेवले ‘ल्युटेसिया’, या रोमन राज्याची ल्युटेसिया ही राजधानी केली. पुढच्या रोमन राज्यकर्त्यांनी या राजधानीचे नाव लॅटीनमध्ये ‘पारिसीयस’ तर फ्रेंचमध्ये ‘पॅरिस’ केले. रोमन पॅरिसचा राज्यकाळ ख्रिस्तपूर्व ५२ ते इ.स. ४८६ असा झाला. तिसऱ्या शतकात पॅरिसमध्ये ख्रिश्चन धर्माचा शिरकाव होऊन पॅरिसची संपूर्ण वस्ती ख्रिश्चनधर्मीय झाली. सीन नदीच्या डाव्या तीरावर वसलेल्या पॅरिसमध्ये रोमन राज्यकर्त्यांनी पहिल्या शतकात रोमन शैलीची सार्वजनिक स्नानगृहे, अ‍ॅम्फी थिएटर्स आणि उत्तम रस्ते बांधले.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

 

flowars

वनस्पतींची नैसर्गिक संरक्षण व्यवस्था
निसर्गात प्रत्येक सजीव आपल्या अस्तित्वासाठी स्वत:चे संरक्षण करीत असतो. प्राणी शत्रूंवर प्रतिहल्ला करून किंवा त्यांच्यापासून दूर पळून स्वत:चे संरक्षण करू शकतात. वनस्पतींना या दोन्ही गोष्टी शक्य नसल्याने तसेच त्या प्राणीमात्रांचे अन्न असल्यामुळे आपल्या जागीच प्रतिकार करतात.
निसर्गाने वनस्पतींना प्राण्यांच्या हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी काही विशिष्ट योजना केलेल्या दिसतात. काही वनस्पतींना निसर्गाने बहाल केलेला काटेरी अंगरखा हा त्यापकी एक आहे. दैनंदिन व्यवहारात जरी आपण अशा काटेरी वनस्पती पाहात असलो तरी त्या निसर्गाने वनस्पतीं रक्षणार्थ केलेल्या काही योजना असतात हे आपल्या क्वचितच ध्यानात येते.
यापकी एक प्रकार म्हणजे वनस्पतींच्या विविध अवयवांवरील काटे, काटेरी अंगरखा वेगवेगळ्या प्रकारचा आणि वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येतो. मोठे टणक आणि सरळसोट वाढणारे किंवा फांद्या फुटलेले काटे हे झाडाच्या फांद्यांचेच बदलेले रूप असते. िलबू, करवंद, आसाणा या वनस्पतींचे काटे हे या प्रकारात मोडतात. असे काटे चरणाऱ्या प्राण्यांच्या जाड कातडीतही घुसतात त्यामुळे ते प्राणी अशा वनस्पतींपासून दूर पळतात. पानांचे किंवा पानांच्या अवयवांपासून रूपांतरित झालेले काटे आकारमानाने लहान असतात. ‘युक्का’ या वनस्पतीच्या पानांचे शेंडे अत्यंत तीक्ष्ण काटय़ांनी सजलेले असतात. ती पाने कटय़ारीसारखी भासतात, म्हणूनच त्या वनस्पतींना इंग्रजीत ‘अ‍ॅडॅम्स निडल’ किंवा ‘स्पनिश डॅगर’ असे म्हणतात. बाभूळ, खजुरी, घायपात, अननस यांचे काटे या प्रकारात मोडतात व त्या झाडांचे संरक्षक म्हणून कार्य करतात. गुलाब, शमी, पांगारा, काटेसावर या वनस्पतींच्या फांद्यांवर लहानखुरे पण टणक, टोकदार आणि वक्राकार काटे आढळतात. वांगी, पिवळा धोत्रा यांच्या पानांवर असलेले काटे त्याचे चरणाऱ्या प्राण्यांपासून संरक्षण करतात. वेताच्या झाडावरील तसेच काटेरी वेलींवरील काटे संरक्षणाबरोबरच दुसऱ्या झाडांचा आधार घेऊन वर चढण्यासाठी उपयोगी पडतात. निवडुंग, नागफणी, पेरेस्किया व इतर कॅक्ट्स्वर्गीय वनस्पती यांच्या खोडावर आढळणारे लहानखुरे ताठ, सुईप्रमाणे असणाऱ्या काटय़ांचे गुच्छ किंवा कुसे प्राण्यांना दूर ठेवतात.

 डॉ. रंजन देसाई
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org