12 December 2019

News Flash

अ‍ॅप्स देतात उद्दीपन    

सर्वासाठी उपयुक्त आणि सर्वाना भंडावून सोडणारा मोबाइल फोन.

(संग्रहित छायाचित्र)

सर्वासाठी उपयुक्त आणि सर्वाना भंडावून सोडणारा मोबाइल फोन. वयात येणाऱ्या पोरासोरांच्याही हातात सतत फोन असतो तो कशामुळे?  याचा आपल्या मनावर – मेंदूवर काय परिणाम होतो, हे आपण पुढील काही भागांमध्ये बघणार आहोत.

मोबाइल फोन उपयुक्त आहेत, याबद्दल काही शंकाच नाही. बँकेपासून ते कॅशबॅकयुक्त खरेदीपर्यंत आणि जुन्या हिंदी गाण्यापासून जुने मित्र शोधण्यापर्यंत, मुलांच्या अभ्यासाच्या प्रोजेक्ट्सपासून ते साध्या कॅलेंडर, घडय़ाळ, अलार्मपर्यंत. हे सगळं याच्याच तालावर करायचं असेल तर तो सारखा हातात पाहिजे. मोबाइल फोन नावाचं उपकरण न वापरून चालणार नाही. शिवाय तो सतत आसपास पाहिजे. या फोनला माणसं इतकी चिकटून का बसतात, याचं कारण आपल्या मेंदूला कंटाळा अजिबात आवडत नाही. सतत उद्दीपन मिळालं तर ते हवंच असतं. हे उद्दीपन देण्याचं काम मोबाइल फोनमधली विविध अ‍ॅप्स करीत असतात.

आपण रोज तेच काम करत असतो. हे काम आव्हानात्मक नसेल, त्यात आनंद वाटत नसेल. तर आयुष्य म्हणजे एक रूटीन होऊन जातं. रूटीनमुळे कंटाळा आणि थकवा येतो. त्यात ‘गंमत’ आणण्याचं काम ही अ‍ॅप्स करत असतात. हे बसल्या जागी मिळणारं मनोरंजन आपल्याला भुरळ घालतं.

मेंदूला कंटाळवाण्या वातावरणापेक्षा उत्साही वातावरण आवडतं. न्यूरॉनच्या नव्या जुळण्या करण्यासाठी मेंदू आसुसलेला असतो. गॅझेट्स आणि विविधरंगी – विविधढंगी अ‍ॅप्सवरच्या विविध पोस्टमुळे मेंदूला निदान त्या वेळेपुरतं का होईना उत्साही वाटतं. नेहमीपेक्षा काही तरी वेगळं वाटतं. मित्रमैत्रिणींची, त्यांच्याबरोबरच्या गप्पांची कसर भरून निघाली, असं मेंदूला वाटतं.

घरकाम एके घरकाम करून कंटाळलेल्या स्त्रियांना टीव्ही शिवायची ही करमणूक बरी वाटते. शाळा-अभ्यास याचा मुलांना कंटाळा येतो, त्यातून सुटका म्हणून ते मोबाइलच्या अधीन होतात. तर तरुण वयातल्या मुलांना हाताशी भरपूर वेळ असतो. आणि जवळपासच्या मित्रमैत्रिणींमध्ये ‘टिकून राहायचं’ असतं. या सगळ्या कुलुपांची एकच किल्ली म्हणजे मोबाइल फोनवर वेळ घालवणं, असं झालं आहे.

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com

First Published on February 1, 2019 1:42 am

Web Title: the human brain
Just Now!
X