19 October 2019

News Flash

व्यक्ती तितक्या प्रकृती

‘एखादीच व्यक्ती सुगरण का असते?’

‘एखादीच व्यक्ती सुगरण का असते?’, ‘संगीतकारांना एवढय़ा वेगवेगळ्या चाली कशा काय सुचतात?’ , ‘संशोधक एका खोलीत दिवसेंदिवस प्रयोग का करत असतात,’ ‘एखाद्याच खेळाडूच्या नावावर जबरदस्त विक्रम का नोंदवलेले असतात?’ अशा प्रकारचे प्रश्न नेहमीच पडत असतात. इतरांच्या कलेबद्दल, अभ्यासाबद्दल, व्यवसायाबद्दल मनात औत्सुक्य असतं.

‘बहुआयामी बुद्धिमत्ता’ हा सिद्धांत समजून घेतल्यामुळे ‘गणितात नेहमी कमी मार्क का पडतात’ याचं खरं कारण कळेल. ‘तसं असलं तरी बुद्धिबळ का आवडतं हे कळेल’, ‘मित्रांमध्ये खेळायचं सोडून तासन्तास खोलीचं दार बंद करून प्रयोग का चाललेले असतात’ हे कळेल.   काही शारीरिक अपघात वगळता, निसर्गाने कोणताही मेंदू अप्रगत, ढ असा ठेवलेला नाही. शाळेने ‘अप्रगत’ असा शिक्का लावलेल्या मुलामध्येही निश्चितच गुण असतात. पण ते काही ना काही कारणाने उजेडात आलेले नसतात. प्रत्येक आणि प्रत्येक माणसात काही ना काही विशेषता असतात. असं बघा की,  एखादं काम करायला आपल्याला अतिशय आवडतं. तासन्तास, दिवसेंदिवस आपण ते काम मनापासून करतो, थकवा का येत नाही, हे यातून समजतं. खरं तर जी आपली आवडती कामं असतात, तिथेच आपली बुद्धिमत्ता दडलेली असते.

– काही कामांचा आपल्याला अतिशय कंटाळा येतो. ते आपण टाळायचा खूप का प्रयत्न करतो. याचं कारण ‘त्या विशिष्ट क्षेत्रात न्यूरॉनच्या जुळणीचा वेग कमी असतो.’  तसंच खूप प्रयत्न करूनही एखाद्या विषयातली गती वाढत नाही. असं असतं तेव्हा एकतर प्रयत्नांची दिशा चुकलेली असते किंवा मग त्या क्षेत्रात न्यूरॉन्सच्या जुळणीचा वेग कमी असण्याची शक्यता असते.

– लहान असताना विविध व्यक्तींच्या धाकाने काही कामं करतो, पण एकदा मोठं झाल्यावर त्याच्याकडे मुळीच पाहात नाही.

आपण स्वत:चं विश्लेषण करायला हवं. त्यातून आपल्या बुद्धिमत्ता समजतील, इतरांच्या समजतील. विशेष म्हणजे मुलांमधल्या बुद्धिमत्तांची जाणीव होईल. त्यांच्या अभ्यासात, करियरनिवडीत याची मदत होईल.  सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्वातून स्वत:शी चांगला संवाद करता येईल. मुलांशी ही चांगला संवाद घडेल, जे आजच्या काळात फारच आवश्यक आहे.

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com

 

First Published on April 15, 2019 2:19 am

Web Title: the human brain 2