स्वत:ला योग्य प्रकारे ओळखणं आणि स्वत:च्या भावनांवर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवता येणं या भावनिक बुद्धिमत्तेसाठी करायच्या पहिल्या दोन पायऱ्या. आसपासच्या माणसांना ओळखता येणं, त्यांचे स्वभाव जाणून घेता येणं ही तिसरी पायरी आहे.

कोणत्याही धर्माच्या शिकवणीचा महत्त्वाचा भाग म्हणजे दुसऱ्यांवर प्रेम करणं. किती सोपं वाक्य आहे हे. पण यात अनंत अडचणी असतात. दुसऱ्याबद्दल मनात संशय निर्माण होणं, मत्सर निर्माण होणं, उच्च किंवा हीन भावना निर्माण होणं. या सर्व भावना नकारात्मक आहेत. या भावना माणसाला माणसापासून दूर करतात. मैत्री, प्रेम अशामध्ये या भावना कळत किंवा नकळत घुसतात. घर करून बसतात. त्रास देत राहतात. काही वेळा स्पर्धेची भावना निर्माण होते. स्पर्धा करायचीच असेल तर फक्त स्वत:शीच स्पर्धा करायला हवी. दुसऱ्यांची प्रगती आणि यश यात आनंद घेता आला पाहिजे.

स्वत:मध्ये कधीही कोणाबद्दलही नकारात्मक भावना येऊ न देणं हे शक्य असतं का? अशी भावना येत असेल तर सोडून देता यायला हवी. स्वच्छ, छान, मोकळं जगण्यासाठी आपला जन्म झालाय याच्यावर आपला विश्वास हवाच! ‘नावडतीचं मीठ अळणी’ हा मनुष्यस्वभाव. मात्र भावनिक बुद्धिमान माणसाचा हा स्वभाव असू शकत नाही. किंवा जरी ही भावना नैसर्गिकरीत्या मनात आली तरी तिचं समायोजन कसं करायचं हे आपल्याला केव्हाही शिकता येतं.

आपल्या एका स्वतंत्र दृष्टीने जगाकडे बघा. प्रवासी ट्रकच्या मागे एक वाक्य अनेकदा वाचायला मिळतं – देखो मगर प्यार से. जीवनविषयक तत्त्वज्ञानच लिहिलं आहे या तीन शब्दात. रंगीबेरंगी फुलझाडांनी डवरलेल्या एखाद्या बागेत नुसतीच हिरवी पानं ल्यालेलं झाडही लक्ष वेधून घेतं. सुंदर दिसतं. इतरांपेक्षा उठून दिसतं.

आपण एखाद्या ‘विषारी’ टीव्ही मालिकेतलं विषारी पात्र नाही. आपलं स्क्रिप्ट आपण लिहितो. दुसऱ्याने लिहून दिलेले संवाद आपल्याला बोलायचे नसतात.  प्रत्येक सकारात्मक किंवा नकारात्मक भावना ही अत्यंत नैसर्गिक असते. ही भावना मनात आली तर आधी ती स्वीकारली पाहिजे. ती मनात येईल. तिचं अस्तित्व दाखवून देईल, रेंगाळेल. त्यानंतरच या भावनांचा निचरा होईल. हा निचरा होणं आवश्यक तर खरंच. नकारात्मक भावनांना रेंगाळू न देणं हीच तर भावनिक बुद्धिमत्ता.

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com