जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढवून सुपिकता वाढविण्याचे काम करणे महत्त्वाचे आहे. त्याशिवाय अपुऱ्या पाऊसमानात पीक घेणे कठीण आहे. सेंद्रिय खतांचा पुरवठा पुरेसा नसल्याने मोठय़ा प्रमाणावर असलेल्या कोरडवाहू क्षेत्रात त्यांचा वापर करणे केवळ अशक्य आहे. यासाठी शेणखत, कंपोस्ट खत वापराला अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
 केवळ मशागत बंद करून शेती केल्यास जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढते. शिवाय, पिकांच्या शिल्लक भागातून सेंद्रिय खत जागेवरच तयार करता येते. यासाठी पीक कापणीनंतर बुडखा व मुळांचे जाळे जमिनीत तसेच राहू देऊन पुढील पिकाची पेरणी करायला हवी. फक्त कापणीनंतर जमिनीत राहणारा बुडखा व मुळांचे जाळे जागेवरच कुजल्यास बाहेरून कोणतेही खत न टाकता उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत आपोआप मिळू शकेल. सेंद्रिय खत तयार करण्यासाठी जमिनीवरील भागापेक्षा मुळे व बुडखा हा सर्वात जास्त गुणवत्तेचा भाग आहे. त्याच्या तुलनेत जमिनीवरील भागाची गुणवत्ता कमी असते.
परंतु मुळांचे जाळे व बुडखा पूर्वमशागतीनंतर धसकटे म्हणून गोळा करून जाळून टाकला जातो, अगर जमिनीबाहेर फेकून दिला जातो. पूर्व मशागत व धसकटे गोळा करण्यावर शेतकऱ्यांचा खूप पसा खर्च होतो. जमिनीवर राहणारा पदार्थ वैरणमूल्याचा असेल, तर त्याचा वैरणीसाठी वापर करावा. तसा नसेल तर (उदा. कापूस) उन्हाळ्यात वाळल्यानंतर फक्त पिकात (जमिनीला न लावता) रोटोव्हेटर यंत्र फिरवून त्याचा भुगा करून त्याचे आच्छादन जमिनीवर करावे व बुडखे जमिनीत तसेच राहू द्यावेत. पुढे बुडखे जर परत फुटू लागले तर ग्लायसेल व २, ४-डी सारख्या तणनाशकाने ते मारावे.
विनामशागत तंत्र अवलंबण्यासाठी रानात बहुवार्षकि हरळी, लव्हाळा यांसारखी तणे नियंत्रणात ठेवावी लागतात. यासाठी मागील पिकात त्याचे नियंत्रण करावे. पूर्वमशागतीवर होणारा खर्च तणनाशकाकडे काही प्रमाणात वळविल्यास हे काम करणे शक्य आहे. रोटोव्हेटरसारख्या यंत्राद्वारे धसकटांचा चुरा करून तो जमिनीत मिसळणे, पुढील पिकाच्या वाढीसाठी चांगले नाही. धसकटांना कोणताही धक्का न लावता, आहेत त्या अवस्थेत ती हळूहळू कुजत जाणे जास्त फायदेशीर आहे.
 – प्रताप चिपळूणकर (कोल्हापूर)    मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

वॉर अँड पीस                                        गृध्रसी – सायटिका : २
कारणे – अग्निमांद्य असताना पचावयास जड, थंड, स्राव निर्माण करणारे पदार्थ अधिक प्रमाणात खाणे, अजीर्ण, अपचन, आमांश या विकारांचा पुन: पुन्हा प्रादुर्भाव होणे. कोणत्यातरी एका पायाच्या पाठीखालच्या कमरेच्या भागावर अकारण ताण, आघात, जोर, मार यामुळे शीर दबणे. मलावरोध, शौचास जोर करावा लागणे. वेडीवाकडी बैठक, लोंबकळून उभे राहणे, स्कूटरची किक मारताना पाय सटकणे, दीर्घकाळ ताकदीच्या बाहेर वजन उचलणे, थंडी वाऱ्यात भिजून श्रमाची कामे करणे.
उपचारांची दिशा – कमरेत पाठीच्या खाली सूज आहे का, हे पाहावे. जीभ, पोट, मलावरोध, चिकटपणा करिता तपासावे. इतिहासात आमवात, आमांश, आगंतु आघात आहे का याची चौकशी करावी. गरम पाण्याच्या पिशवीने/तव्यावरील फडक्याने शेकणे, लेप- गोळीचा दाट गरम, लेप, पूर्ण विश्रांती, फळीवर झोपणे यामुळे बरे वाटते का? पोटात वायू धरत असल्यास वातानुलोमनाचे औषध व लंघनाने गुण येतो का? वाहन न चालविण्यामुळे आराम पडतो का? ते पाहावे.
अनुभविक उपचार – सिंहनाद गुग्गुळ, लाक्षादि गुग्गुळ, वातगजांकुश प्र. ३ गोळ्या २ वेळा गरम पाण्याबरोबर घेणे. सौभाग्यसुंठ अर्धा चमचा २ वेळा जेवणानंतर गरम पाण्याबरोबर घेणे. एरंडेल तेल १ चमचा एका चपातीकरता या प्रमाणात कणकेत मोहन म्हणून वापरावे. महानारायण तेलाने रात्री झोपताना व सकाळी अंघोळीपूर्वी हलक्या हाताने मसाज करावे. नंतर गरम पाण्यात मीठ टाकून त्या पाण्यात पंचा, फडके बुडवून शेकावे. दु:ख सुरू होते असे वाटते, त्यावेळेस लगेच गरम पाण्याच्या पिशवीने वा तव्यावर फडके ठेवून त्याने शेकावे. गवतीचहा अर्क १ भाग व महानारायण तेल ४ भाग असे मिश्रणाचे मसाज अधिक प्रभावी आहे. त्याअभावी सहचर तेल, महाविषगर्भ, शतावरी सिद्धतेल, मोहरीतेल किंवा तिळतेल वापरावे. लेपगोळीअभावी आंबेहळद, तुरटी, रक्तरोडा, सुंठ, मोहरी, गुग्गुळ यापैकी  मिळेल तो दाट, गरम लेप लावावा.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत        १६ मे
१८२४ > गणिताचे गाढे अभ्यासक, ज्योतिषशास्त्र आणि पंचांग यांसह अनेक विषयांत रस असलेले विज्ञानविषयक लेखक केरो लक्ष्मण छत्रे यांचा जन्म. केरोपंतांनी फ्रेंच व इंग्रजी ज्योतिषग्रंथांच्या आधारे ‘ग्रहसाधनांची कोष्टके’ आणि ‘पंचांगसाधन- कोष्टके’ हे ग्रंथ लिहिले. ‘हवेवरील ग्रंथ’ ‘पर्जन्यसंबंधी व्याख्यान’, ‘पदार्थविज्ञान शास्त्र’, ‘अंकगणित’ ‘भूमापन’ या पुस्तकांचे लेखनही त्यांनी मराठीत केले.
१९२४ > लेखक, चरित्रकार, संपादक मधुकर श्रीधर दीक्षित यांचा जन्म. अनेक वृत्तपत्रे, मासिके यांतून ग्रंथपरीक्षणे करणाऱ्या दीक्षित यांनी ‘भारतरत्न नेहरू’, ‘पंतप्रधान शास्त्री’, ‘सत्तावन्नचे सप्तर्षी’,‘तेजस्वी तारका’ या चरित्रपुस्तकांसह  ‘एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र’, ‘साहित्यिक सांगाती’, ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ आणि ‘पुणे नगर वाचन मंदिर- दीडशे वर्षांचा इतिहास’ आदी ग्रंथ लिहिले आहेत.  
१९६६ > कवी, नाटककार टीकाकार यशवंत खंडेराव कुलकर्णी यांचे निधन. त्यांच्या स्फुट कवितांचे दोन संग्रह तसेच ‘एकच हिंदुस्थान’ आणि ‘नरवीर तानाजी’ या दीर्घकाव्यांचे संग्रह प्रकाशित झाले होते. संत मीराबाईंच्या जीवनावर ‘संगीत साध्वीरत्न’ हे नाटक व काही एकांकिकाही त्यांनी लिहिल्या होत्या.
संजय वझरेकर

जे देखे रवी..      अमेरिकेतील अवांतर
माझे अमेरिकेतले दुसरे वर्ष मनाजोगते गेले. खूप प्रकारचे काम करायला मिळाले. हातावरच्या शस्त्रक्रियेच्या विभागात खूप प्रकारच्या शस्त्रक्रिया बघितल्या. एकदा एक पाच वर्षांच्या मुलाच्या हाताची विकृती तपासताना ‘तुला काय त्रास आहे’ असा मूर्ख प्रश्न त्या मुलाला मी विचारला तेव्हा तो मुलगा म्हणाला, ‘मला काहीही त्रास नाही. माझे दोन हात एक सारखे नाहीत एक लहान आहे तर दुसरा मोठा आहे एवढेच.’  मी त्याची समजूत बघून खजील झालो. डिट्रॉइटला असताना एका शिक्षकाने मला विचारले काय रे रविन हे जग कशाच्या जोरावर चालते पैशाच्या की प्रेमाच्या तेव्हा त्याला मी म्हणालो होते ‘पैशाच्या प्रेमाच्या जोरावर’ तेव्हा तो म्हणाला होता ‘इतक्या देशातले निवासी डॉक्टर माझ्याकडे शिकून गेले, पण बोलण्याच्या बाबतीत भारतीय डॉक्टरांचा हात कोणी धरू शकत नाही.’ एकदा एका परिषदेला  जाण्यासाठी विमानातून जात होतो. तेव्हा शेजारचा प्रवासी मोठय़ा कुतूहलाने भारताबद्दल विचारू लागल्यावर  मी आपल्या संस्कृतीबद्दल मोठय़ा लंब्या चौडय़ा गोष्टी सांगू लागलो त्याने अर्धा तास ऐकून घेतले आणि मग मला विचारले ‘हे सगळे ठीकच आहे, परंतु तुमची आर्थिक स्थिती इतकी हलाखीची का आणि तिथली माणसे कोठेही प्रातर्विधी करतात हे खरे का?’ मी वरमलो. तेव्हा आपल्याकडे सरकारी समाजवाद फोफावला होता.
अमेरिकेतील माझे शेवटचे वर्ष वॉटरगेट प्रकरणाने गाजवले. वॉटरगेट हॉलवर मध्यरात्री पडलेल्या दरोडा निक्सन या अमेरिकेच्या अध्यक्षाने प्रतिपक्षाची गोपनीय कागदपत्रे पळवण्यासाठी घातला होता हे उघड झाले आणि ते गुपित वूडवर्ड आणि बर्नस्टाइन या वार्ताहारांच्या जोडीने फोडले होते. त्यानंतर त्याचा तपास करण्यासाठी अमेरिकेच्या सिनेटची चौकशी समिती नेमण्यात आली आणि त्याचे दर्शन टेलिव्हिजनवर तासन्तास दाखवण्यात आले. व्हिएतनाम युद्धातली पीछेहाट, हे चौकशीचे वृत्तांकन आणि अमेरिकेतल्या विद्यापीठांमधल्या विद्यार्थ्यांची प्रस्थापितांच्या विरोधातली निदर्शने असा तो काळ होता, पण अमेरिकेत लोकशाही प्रणाली होती. न्यायसंस्था खंबीर होत्या आणि वृत्तपत्रे किंवा ज्याला हल्ली माध्यमे म्हणतात (टी्िरं) ती स्वतंत्र होती. रोष व्यक्त करायला मुभा होती, राज्यकर्ते निवडून आलेले असले तरी त्यांची सत्ता निरंकुश नव्हती आणि हे सगळे मिळून व्यवस्था लवचिक होती म्हणून अमेरिका ढासळली तर नाहीच, परंतु हळूहळू परत महासत्ता म्हणून उभी राहिली.
वैधानिक मार्गाने होणारी संथ उत्क्रांती कितीही क्लेशकारक असेना का ती रक्तरंजित क्रांतीपेक्षा परवडते हेच खरे.

रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com