आधुनिक शुश्रूषाशास्त्राची मुहूर्तमेढ रचण्याचे श्रेय ज्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना दिले जाते, त्यांचा १२ मे हा जन्मदिवस! हट्टाने रुग्णपरिचर्या शिकून अवघ्या तीन वर्षांत सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालये या विषयातील त्या तज्ज्ञ मानल्या गेल्या. मात्र त्यांनी समाजसुधारणेसाठी संख्याशास्त्राचा उपयोग केल्याचे फार कमी लोकांना माहीत असावे.

क्रिमियन युद्धकाळातील रुग्णसेवेसाठी तसेच लष्करी दवाखान्यातील स्वच्छताविषयक सुधारणेसाठी नाइटिंगेल ओळखल्या जातात. १८५६ मध्ये त्यांनी युद्धात जखमी झालेले आणि त्यामुळे नंतर दगावलेले सैनिक, याची चिकित्सा करणारा अहवाल ‘ब्रिटिश कमिशन’कडे सुपूर्द केला. त्यात लष्करी रुग्णालयातील मृत्युदराची हंगामी कारणे मांडण्यासाठी स्वत: काढलेल्या रंगीत ध्रुवीय क्षेत्र रेखाकृतींचा (पोलर एरिया डायग्रॅम) म्हणजेच ‘रोझ’ तक्त्यांचा वापर केला. या ‘कॉक्सकॉम्ब’ रेखाकृती म्हणजे आधुनिक वृत्तालेखाचे (पाय आलेख) पूर्वरूप आहे. वेगवेगळ्या रंगांच्या या रेखाकृतींत वर्तुळाचे भाग करून प्रत्येक भागात वर्षांचा एक विशिष्ट कालावधी त्यांनी दाखवला. या भागांतील संख्या त्या रुग्णालयातील वार्षिक मृत्युदर दर्शवीत होत्या, ज्यामुळे कालांतराने घडलेले बदल त्यात दिसत होते. संख्याशास्त्रीय सामग्रीचे आलेखीय प्रदर्शन या अभिनव पद्धतीमुळे पथदर्शक झाले.

१८५७ नंतर भारतात नेमलेल्या ब्रिटिश सैनिकांचा मृत्युदर इंग्लंडमधील सैनिकांच्या मृत्युदराच्या तिप्पट, म्हणजे दर हजारी ६९ होता. नाइटिंगेल यांनी त्याचे संख्याशास्त्रीय विश्लेषण करून सिद्ध केले की, याला कारण भारतातील हवामान नसून सैनिकांच्या वसतिगृहातील अस्वच्छ वातावरण आहे. त्यांच्या सूचना अमलात आणल्यावर त्याचे चांगले परिणाम दिसून आले. भारतातील आरोग्यसेवा सुधारण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. शांततेच्या काळातही वैद्यकीय शुश्रूषा व सार्वजनिक आरोग्यसेवा यांतील सुधारणेसाठी संख्याशास्त्रीय विश्लेषण, कुशल संघटन आणि तत्पर प्रशासन यांवर त्यांनी भर दिला. त्यासाठी त्यांनी समकालीन बेल्जियमचे संख्याशास्त्रज्ञ आणि सामाजिक संख्याशास्त्राचे संस्थापक अ‍ॅडॉल्फ क्विलेट यांच्या कल्पना स्वीकारल्या. आरोग्यसेवा, गुन्हे, बालमजुरी,  शिक्षण या प्रश्नांवर निव्वळ आकडेवारीने भरलेले संख्याशास्त्रीय अहवाल आणि प्रस्ताव न देता त्यांत रेखाकृतींचा चपखल उपयोग करून त्यांनी सनदी अधिकाऱ्यांना आणि संसदपटूंना आपले विचार पटवून दिले. त्यांच्या या कार्यामुळे संख्याशास्त्राची पदवी नसतानाही रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीच्या पहिल्या महिला सदस्य म्हणून नाइटिंगेल निवडून आल्या. सैनिकांसाठी आशादीप म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाइटिंगेल यांनी संख्याशास्त्रालाही उजळले!

– निशा पाटील

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org