News Flash

रोमन साम्राज्याचा अस्त

एडवर्ड गिबन याचा ‘डिक्लाइन अ‍ॅण्ड फॉल ऑफ रोमन एम्पायर’ हा सहा खंडांचा अभिजात ग्रंथ! 

एडवर्ड गिबन याचा ‘डिक्लाइन अ‍ॅण्ड फॉल ऑफ रोमन एम्पायर’ हा सहा खंडांचा अभिजात ग्रंथ!  गिबन इतिहासकार! त्यामुळं त्याच्या ग्रंथात रोमन साम्राज्याच्या अस्ताची ऐतिहासिक तथा तत्कालीन भूराजकीय कारणं यांचा ऊहापोह असावा यात नवल नाही. पण अलीकडेच वैज्ञानिकांना या महाकाय साम्राज्याच्या अस्ताला शिसे कारणीभूत असल्याचा शोध लागला आहे.

जेरोम न्रिआगू या कॅनडातील वैज्ञानिकानं ख्रिस्तपूर्व ३० ते ख्रिस्ताब्द २२० या अडीचशे वर्षांत सिंहासनावर असलेल्या तब्बल तीस सम्राटांच्या आहाराविषयी माहिती गोळा केली. यापकी बहुतेकांना शिशाचा अंश असलेल्या खाद्यपदार्थाची चटक लागली होती, असं त्याला आढळलं. खास करून ज्या मद्याचा ते स्वाद घेत असत त्यासाठी द्राक्षांना शिशाच्या पात्रात संथपणे बराच वेळ उकळवून त्याचा रस केला जाई. त्यातून तयार होणाऱ्या मद्यात अर्थातच शिशाचा शिरकाव होई. पण त्याची चव मात्र वाढत असे. हे मद्य पिण्याच्या सवयीपायी मग शिशाचा त्यांच्या शरीरात प्रवेश होई. त्यातूनच त्यांना मंदबुद्धी, बुद्धिभ्रंश, कमजोर हातपाय, गाऊट यांसारख्या विकारांची बाधा होत असे, सम्राट क्लॉडीयस याचं जे वर्णन इतिहासात आढळतं, ते या विकाराच्या लक्षणांशी सुसंगतच आहे.

सम्राटच नव्हे तर सामान्य नागरिकांनाही शिशाच्या विषारीपणाचा फटका बसत होता. इतर काही वैज्ञानिकांना रोमला पाणीपुरवठा करणारे पाइप शिशाचे बनवलेले असल्याचा पुरावा मिळाला आहे. ते पिण्याचं पाणी शिसेमिश्रित असल्यास नवल नाही. इतरांनी रोममधील टायबर नदीत सोडलेलं सांडपाणी जिथं समुद्रात जाऊन मिळे त्याठिकाणी उत्खनन करून त्या पाण्यातील आणि तिथल्या जमिनीतील शिशाचं प्रमाण मोजलं आहे. ते धोकादायक असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. इतर काहीजणांना मात्र शिशाचं ते प्रमाण धोकादायक मानता येणार नाही, असंच वाटतं. परंतु अमेरिकेतील सेन्टर फॉर डिसीज कण्ट्रोल या शिखर संस्थेनं  शिशाचं कोणतंही प्रमाण निर्धोक नसल्याचाच, खास करून बालकांच्या बाबतीत, निर्वाळा दिला आहे. त्यामुळं लहान वयातच जर त्या पाण्यातील शिसं पोटात जात असेल तर मग बौद्धिक वाढीवर त्याचे अनिष्ट परिणाम होणं अटळ आहे. अशी मंदबुद्धी प्रजा त्या साम्राज्याचं कसं रक्षण करू शकेल. असाच सवाल या वैज्ञानिकांनी खडा केला आहे.

– डॉ. बाळ फोंडके

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 2:53 am

Web Title: the roman empire
Next Stories
1 गोंडवनचा पीर- हेमेनडॉर्फ
2 दुभंग
3 हेमेनडॉर्फचे आदिवासी-विषयक अहवाल
Just Now!
X