14 November 2019

News Flash

कुतूहल : स्पुटनिकचे भ्रमण

पहिल्या योजनेनुसार ५७० किलोग्रॅम वजनाचा ‘ऑब्जेक्ट-डी’ हा उपग्रह अंतराळात सोडण्याचे ठरले.

अंतराळात ‘उपग्रह’ सोडण्याची कल्पना वैज्ञानिक जगतात फार पूर्वीपासून चर्चिली गेली आहे. न्यूटनने अंतराळात सोडलेला काल्पनिक तोफगोळा, हा एक शास्त्रशुद्ध गणितावर आधारलेला प्रयोग होता. यानंतर वैज्ञानिक आणि विज्ञानकथा लेखकही या शक्यतेचा विचार करीत होते. १९५७-५८ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भू-भौतिक वर्ष’ म्हणून जाहीर करण्यात आले. यानिमित्त पृथ्वीच्या अभ्यासासाठी अंतराळात उपग्रह सोडण्याचा संकल्प प्रथम अमेरिकेने व त्यानंतर रशियाने जाहीर केला. या शर्यतीत अखेर बाजी मारली ती रशियानेच. रशियाकडून सोडल्या गेलेल्या या पहिल्यावहिल्या कृत्रिम उपग्रहाचा मार्ग मात्र खडतर होता.

पहिल्या योजनेनुसार ५७० किलोग्रॅम वजनाचा ‘ऑब्जेक्ट-डी’ हा उपग्रह अंतराळात सोडण्याचे ठरले. हा उपग्रह, त्या वेळी विकसित होत असलेल्या ‘आर-७’ या आंतरखंडीय अग्निबाणाद्वारे अंतराळात झेपावणार होता. यामुळे आर-७ अग्निबाणाच्या क्षमतेचीही चाचणी होणार होती. परंतु दरम्यानच्या काळात, या उपग्रहांत बसवण्याच्या वैज्ञानिक उपकरणांची निर्मिती रेंगाळली. तसेच अजून पूर्ण विकसित न झालेल्या या अग्निबाणाद्वारे इतका मोठा उपग्रह अंतराळात सोडता येईल का, याबद्दलही शंका उपस्थित झाल्या. त्यामुळे ऑब्जेक्ट-डी या उपग्रहाऐवजी ‘पीएस-१’ हा छोटा उपग्रह तयार करण्याचे ठरले. हा उपग्रह सर्वसामान्यांसाठी ‘स्पुटनिक’ या नावे ओळखला जाणार होता. सुमारे ५८ सेंटिमीटर व्यासाचा आणि ८३ किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह, अ‍ॅल्युमिनियमचे दोन चकचकीत अर्धगोल वापरून बनवलेला होता. या उपग्रहावर कोणतीही नियंत्रण यंत्रणा नव्हती.

१९५७ च्या ऑगस्ट महिन्यात आर-७ अग्निबाणाच्या चाचण्या यशस्वी झाल्या आणि ४ ऑक्टोबर १९५७ रोजी याच अग्निबाणाद्वारे हा उपग्रह अंतराळात यशस्वीरीत्या सोडला गेला. सुमारे ९६ मिनिटांत पृथ्वीभोवतालची प्रदक्षिणा पूर्ण करणारा हा उपग्रह, पृथ्वीच्या अगदी जवळ असताना २३० किलोमीटर उंचीवर असायचा, तर अगदी दूर असताना ९४० किलोमीटर उंचीवर असायचा. या उपग्रहावरील अडीच ते तीन मीटर लांबीच्या चार अ‍ॅण्टेनांद्वारे प्रसारित केलेले संदेश जगभरचे रेडिओ पकडू शकत होते. स्पुटनिकच्या या यशामुळे संदेशवहनासाठी एक नवीन साधन उपलब्ध झाले. स्पुटनिकच्या संदेशवहन यंत्रणेला वीजपुरवठा करणाऱ्या विद्युतघटांची क्षमता संपुष्टात आल्यामुळे २२ दिवसांनंतर त्याचा रेडिओसंपर्क तुटला. अखेर ४ जानेवारी १९५८ रोजी हा उपग्रह पृथ्वीच्या वातावरणात शिरून नष्ट झाला.

– सुनील सुळे मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

First Published on November 8, 2019 12:07 am

Web Title: the satellite newton fired artillery akp 94