20 January 2019

News Flash

विध्वंसक की तारणहार?

एका बाजूला अणुबॉम्बचा विकास चालू आहेच.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

दुसऱ्यामहायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकल्यामुळे मृत पावलेल्यांची संख्या आणि त्या शहरांचा झालेला विध्वंस यावरून अणुबॉम्बच्या क्षमतेची कल्पना जगाला आली. त्यामुळे अनेक शास्त्रज्ञांनी अणुबॉम्बनिर्मितीला विरोध केला. सगळ्या लोकांच्या मनात अणुबॉम्बची जबरदस्त भीती निर्माण झाली. तरीही एका बाजूला अणुबॉम्बचा विकास चालू आहेच. याशिवाय भयंकर बाब म्हणजे या अणुबॉम्बपेक्षा महाभयंकर अशा हायड्रोजन बॉम्बचा विचार चालू झाला.

अमेरिकन शास्त्रज्ञ एडवर्ड टेलर यांच्या नेतृत्वाखाली प्रथम १९५२ साली हायड्रोजन बॉम्बची जी चाचणी घेण्यात आली, त्या बॉम्बची क्षमता ही हिरोशिमा बॉम्बच्या तुलनेत ५०० पटीने अधिक होती. अलीकडे उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी घेऊन जगाला हादरा दिला आहे. असा हा हायड्रोजनचा विध्वंसक म्हणून वापर करण्याचा प्रयत्न चालू झाला असला तरीही सध्याच्या इंधन समस्येवर हायड्रोजन तारणहार ठरेल काय, या दृष्टीने शास्त्रज्ञांचे प्रयत्न चालू झाले. याबाबत शास्त्रज्ञही आशावादी आहेत, कारण हायड्रोजन विद्युतनिर्मितीसाठी वापरतात. शिवाय तो साठवताही येतो, वहनासाठीही सुलभ आहे आणि मुख्य म्हणजे पर्यावरण दृष्टीने पूर्णपणे सुरक्षित आहे.

जीवाश्म इंधनावर अवलंबून न राहता जगभरातून इंधन म्हणून हायड्रोजनचा वापर विकसित करण्याचे तंत्रज्ञान निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यात मुख्य अडचण आहे ती हायड्रोजन निर्मितीची. जरी विश्वात हायड्रोजन मूलद्रव्याचे प्रमाण विपुल म्हणजे जवळ्जवळ ९२ टक्के असले तरीही पृथ्वीवर हायड्रोजन फारच अल्प प्रमाणात आहे. मात्र पाणी, नैसर्गिक वायू अशा संयुंगांच्या स्वरूपात तो विपुल प्रमाणात आहे. पाण्यापासूनही हायड्रोजन वायू मिळवता येतो. पण तो त्यातून अलग करण्यास फार मोठय़ा प्रमाणावर विद्युत ऊर्जा लागते. म्हणजेच हायड्रोजन उत्पादनासाठी लागणारी ऊर्जा जीवाश्म इंधन जाळून मिळवावी लागते. म्हणून यासाठी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा अथवा जलविद्युत यांसारखे पर्याय वापरल्यास जीवाश्म इंधनांचा वापर कमी होऊ शकेल. त्यामुळे कमी ऊर्जेत हायड्रोजन निर्मितीचे प्रयोग व संशोधन जगभर चालू आहे. यात यशही येईल, पण हायड्रोजनचा वापर विध्वंसक म्हणून की तारणहार म्हणून करायचा हे सर्वस्वी आपल्यावरच अबलंबून असेल.

– शुभदा वक्टे        

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

रानटी शक टोळ्यांचा भारतप्रवेश

प्राचीन काळात हिंदुस्थानावर झालेल्या परकीयांच्या आक्रमणांमध्ये, इसवी सनापूर्वी अलेक्झांडर आणि नंतर शक आणि कुशाण होते. अलेक्झांडर, त्याचे सेनाधिकारी आणि सैनिकही सुसंस्कृत, सुशिक्षित होते; परंतु शक आणि कुशाण हे तर टोळ्याटोळ्यांनी राहणारे रानटी आणि लुटारू जमातींचे होते.

साधारणत: इ.स.पूर्व पाचव्या शतकापासून पुढच्या दोन सहस्रकांत भारतीय प्रदेशावर ज्यांनी ज्यांनी आक्रमणे केली, त्यात सर्वाधिक रानटी, असंस्कृत आणि हिंस्रक हे शक, कुशाणच होते; परंतु आश्चर्य म्हणजे हेच लोक इथल्या संस्कृतीशी सर्वाधिक समरस होऊन पूर्णपणे भारतीय झाले, भारतातच रमले!

शक हे मूळचे उत्तर चीनमधील झिंगझियांग प्रांताचे रहिवासी. या प्रदेशात मूळच्या मंगोल वंशाच्या रानटी, भटक्या जमातींच्या अनेक टोळ्या राहत होत्या. या टोळ्यांना युह-ची टोळ्या म्हणत. या टोळ्यांचा उपद्रव चीनचे सम्राट शी-हुआंग-टी यांना व्हायला लागल्यामुळे त्यांच्यापासून आणि उत्तरेकडून होणाऱ्या आक्रमणांपासून संरक्षण म्हणून त्यांनी एक विशाल भिंत बांधली. या युह-ची टोळ्यांमध्ये आपसांमध्येही नेहमी संघर्ष चालत असत. अशाच संघर्षांतून शक किंवा शाक नावाच्या जमातीच्या टोळ्या प्रथम चीनमधून बाहेर हुसकल्या गेल्या. या टोळ्यांनी प्रथम कझाकिस्तान आणि बाल्कमध्ये आश्रय घेतला. याच काळात मध्य आशियात अवर्षण पडल्यामुळे चराऊ कुरणे विरळ होऊ लागली. त्यामुळे पशुपालन करणाऱ्या शक टोळ्यांना कुरणांच्या शोधात सारखे स्थलांतर करीत राहावे लागले. शक टोळ्या कझाकिस्तानातून प्रथम इराणमध्ये व पुढे अफगाणिस्तान, सिंध आणि काश्मिरात आल्या. शकांच्या प्रथम आलेल्या टोळ्यांचा संघर्ष अफगाणिस्तानात आणि सिंधमध्ये इंडो-ग्रीक राजे आणि पाíथयन ऊर्फ पहल्लव राजे यांच्याशी झाला. शकांनी इंडो-ग्रीक आणि पहल्लव सत्तेचे भारतीय प्रदेशातून उच्चाटन केले. पुढे शक टोळ्यांच्या प्रमुखांनी भारतीय प्रदेशात वेगवेगळ्या भागांमध्ये आपापली राज्ये थाटली. शक हे नाव पíशयन, तर ग्रीकांनी त्यांना सिथीयन म्हटले. शकांच्या मूळच्या रानटी, असंस्कृत टोळ्या प्रथम इराणी आणि नंतर ग्रीकांशी आलेल्या संबंधांतून सुसंस्कृत होत गेल्या.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

First Published on January 11, 2018 3:34 am

Web Title: thermonuclear weapon