शस्त्रक्रिया म्हटली की कात्री, सुऱ्या अशी शस्त्रक्रियेची हत्यारे डोळ्यासमोर येतात. आता मात्र या हत्यारांची जागा लेझर किरणांनी घेतली आहे. डोळ्यातील मोतीबिंदूची शस्त्रक्रिया, कर्करोग उपचार, गर्भाशयातील आंतरपटलाची शस्त्रक्रिया अशा अनेक शस्त्रक्रिया थुलिअमयुक्त ‘याग लेझर’ने केल्या जातात. दंतवैद्यकीय क्षेत्रातील शस्त्रक्रिया, तसेच चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढणे, चेहऱ्यावरील आणि पायांवरील रुंद झालेल्या रक्तवाहिन्यांच्या उपचारामध्येही या लेझरचा उपयोग होतो. लष्करात आणि हवामानशास्त्रातही याग लेझर उपयुक्त आहेत. ‘थुलिअम-१७०’ हे किरणोत्सारी समस्थानिक ब्राचीथेरपी (brachytherapy) या उपचारपद्धतीने कर्करोगाच्या उपचारात वापरले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

थुलिअम अत्यल्प प्रमाणात उपलब्ध असल्याने महाग आहे. असे असूनही थुलिअम क्ष-किरण उपकरणात वापरले जाते. यिट्रिअमप्रमाणेच अति उच्च तापमानाला अतिसंवाहक म्हणून थुलिअमचा वापर करतात. मायक्रोवेव्हमध्ये वापरले जाणाऱ्या फेराइट या सिरॅमिक चुंबकीय पदार्थातही थुलिअमचा वापर केला जातो.

किरणोत्सारी मूलद्रव्यांविषयी संशोधन करताना संशोधक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना किरणोत्साराला सामोरे जावे लागतेच. मारी क्युरी, पीअरे क्युरी या शास्त्रज्ञांच्या कथांमधून आपल्याला याची माहिती मिळते. थुलिअम हे मूलद्रव्य या बाबतीत महत्त्वाचे ठरते. थुलिअमचा एक महत्त्वाचा उपयोग, किरणोत्सारी वातावरणात अथवा किरणोत्सारी पदार्थाशी संबंध येईल अशा ठिकाणी काम करणारे यांना किती प्रमाणात किरणोत्साराची बाधा झाली आहे, हे समजण्यासाठी होतो. यासाठी ‘जे डोसीमीटर’ नावाचे उपकरण वापरले जाते त्यात थुलिअम वापरले जाते. क्ष-किरण फोटोग्राफी करणारे (Radiographers) किंवा अशा किरणांचा कर्करोगावर उपचार (Radiotheraphists) करणारे तसेच अणुभट्टीशी संबंधित काम करणारे अशा व्यक्तींना या उपकरणाचा उपयोग होतो. अशाच प्रकारच्या काही उपकरणांत थुलिअममिश्रित कॅल्शिअम सल्फेट वापरले जाते. ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाते त्यांच्यासाठी तर थुलिअम उपयुक्त आहेच; पण हे मूलद्रव्य रुग्णांवर उपचार करणाऱ्यांच्या आरोग्याची काळजीही घेते. कोणत्याही देशाचे चलन, बँकेचे धनादेश, डिमांड ड्राफ्ट बनवताना काळजी घेतली जाते. त्यावर एखादं चिन्ह, वॉटर मार्क असं ठेवलं जातं ज्यामुळे खोटे धनादेश किंवा डिमांड ड्राफ्ट तयार करता येऊ  नयेत. अतिनीलकिरणांमध्ये थुलिअम निळ्या रंगाने चमकतो. या गुणधर्मामुळे युरोपिअन बँकनोटमध्ये थुलिअम वापरले जाते. या थुलिअममुळे बँकनोटेच्या खरेपणाची पडताळणी होते.

– अनघा वक्टे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thulium chemical element
First published on: 28-08-2018 at 02:29 IST