कुतूहल
टीएनटी आणि डायनामाईट स्फोटके

टीएनटी हे रसायन १८६३ साली जर्मन रसायनशास्त्रज्ञ ज्युलिअस विलब्य्रान्ड यांनी तयार केलं. ते तयार करण्यासाठी टोल्युईन, सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल वापरलेले होते. प्रथम ते एक पिवळा रंग म्हणून वापरले जायचे. काही वर्षांनी त्याच्यापासून फोटोग्राफीची रसायने तयार करण्यात आली. शंभर वर्षांनी ते एक स्फोटक असल्याचे लक्षात आले. याचे शास्त्रीय नाव आहे ‘ट्राय-नायट्रो-टोल्युइन’(ळठळ). सध्या ते औद्योगिक आणि लष्करी दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. घर्षण, दाब आणि दणका दिला तरी त्याचा स्फोट होत नाही. साहजिक ते एक सुरक्षित स्फोटक आहे. पाण्यात ते विरघळत नसल्याने ऐन पावसातही वापरता येते. स्फोटके करण्यासाठी प्रथम ते ८० अंश सेल्सिअस तपमानाला वितळावे लागते. ज्या स्फोटकांचा स्फोट करण्यासाठी अजून एक स्फोटक लागते, त्याला विस्फोटक (डिटोनेटर) म्हणतात. टीएनटीचा स्फोट घडवून आणायला विस्फोटक म्हणून लेडचा (शिसे) एक क्षार, लेड अझाइड लागते. एक ग्रॅम टीएनटीचा स्फोट झाला की त्यातून सेकंदाला ६.९ किलोमीटर वेगाने मुक्त झालेले एक लिटर कार्बन व नायट्रोजनचे वायू प्रक्षेपित होतात. टीएनटीची स्फोटक-शक्ती मध्यम आहे. ती प्रमाण धरून इतर स्फोटकांचा किंवा अणुबॉम्बच्या स्फोटन-शक्तीचे मापन करतात.

Realme P1 Realme P1 Pro martphones will be available for purchase with Bank offers discounts and more
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; रिअलमीच्या ‘या’ बजेट फ्रेंडली फोनची आज पहिली विक्री, जाणून घ्या आकर्षक सवलती
How dangerous is excess sugar for children?
अतिरिक्त साखर लहान मुलांसाठी किती धोकादायक? ‘हेल्दी ड्रिंक्स’ म्हणून जाहिरात करण्यास केंद्र सरकारने का केली मनाई?
WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Airtel Xtreme
लाईट्स, कॅमेरा, XStream : तुमचं वन स्टॉप एन्टरटेन्मेंट हब

आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाईट नामक एक स्फोटक १८६७ साली तयार केले होते. त्यामध्ये त्यांनी कीसेलगर ही सच्छिद्र मृत्तिका मिसळलेली होती. त्यात नायट्रोग्लिसरिन शोषले जाते. त्यामुळे हे स्फोटक वापरायला सुरक्षित झाले. या स्फोटकाला सुरुवातीला ‘नोबेल्स सेफ्टी पावडर’ म्हणायचे, नंतर डायनामाईट झाले. ग्रीकभाषेत ‘डायनामिस’चा अर्थ होतो ‘शक्ती’. सोडियम नायट्रेट, नायट्रोग्लिसरिन, लाकडाचा भुस्सा आणि कीसेलगर असे काही घटक मिसळून त्याचे काही प्रकार तयार झाले. डायनामाईट हे २० सेंटिमीटर लांबीच्या आणि ३ सेंमी व्यासाच्या नळकांडय़ाच्या स्वरूपात विकले जायचे. प्रत्यक्ष स्फोट करण्यासाठी त्याला विद्युततारेची सोय केलेली असते. त्याकाळात डायनामाईटची जागतिक मागणी वाढत चालली होती. तेव्हा त्यांच्या उत्पादनाची नक्कल करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. त्यांच्या स्फोटकांमुळे जगामध्ये अनेक उत्तम रचनात्मक प्रकल्प सुलभपणे पार पडले, हे मात्र खरे!
डॉ. अनिल लचके (पुणे)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
noffice@mavipamumbai.org

प्रबोधन पर्व
गाय माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे!
‘गायीत देव आहेत म्हणून पोथ्या सांगतात तर वराहवतारी देव डुक्कर झाले होते असेही पोथ्या सांगतात! मग गोरक्षणच का करावे? डुक्कर-रक्षण-संघ स्थापून डुक्कर-पूजा का प्रचलवू नये, ज्याअर्थी गोरक्षण, गोपूजा, गोभक्ती ह्य़ा कल्पनाच मुळी मायासृष्टीतल्या आहेत, त्याअर्थी त्यांचे स्वीकरण या धि:क्करण हेही ह्य़ा व्यावहारिक; प्रापंचिक नी तुलनात्मक विवेकानेच करणे शक्य आहे, अुचित आहे. त्या मायासृष्टीत जोवर मनुष्य आहे आणि गाय वा बैल पशु आहे, तोवर मनुष्याने त्याच्याहून सर्व गुणांत हीनतर असलेल्या पशूस देव मानणे मनुष्यास पशुहूनही नीच मानण्यासारखे व माणुसकीसच कमीपणा आणणारे आहे. मनुष्याहून सर्व गुणात अत्युच्च असलेल्या प्रतीकासच मनुष्याच्या देवाचे प्रतीक मानणे अुचित. गाडवाने पाहिजे तर त्याहून श्रेष्ठ पशु असलेल्या गायीस देवी मानावे; पण मनुष्याने तसे मानण्याचा गाढवपणा करू नये.’’
स्वा. वि. दा. सावरकर ‘गाय : अेक अुपयक्त पशु, माता नव्हे-देवता तर नव्हेच नव्हे!’ या लेखात पुढे म्हणतात –
‘अशा भाकड नी मूर्ख संस्कारास आता चाट द्यावी हेच आपल्या धर्माच्या नी संस्कृतीच्या थोरवीस साजेसे होईल. गोरक्षणाचे दृष्टीनेही आजच्या वैज्ञानिक युगात पशूस देवता मानणारी ती खुळचट गोमाहात्म्ये सांगून भागणार नाही. तसली भाबडी प्रवृत्ती राष्ट्रात पसरविण्याचे सोडून जर आमचे गौरक्षक व्याख्याते ह्य़ा कृषिप्रधान देशात त्या अुपयुक्त पशूंचा आर्थिक अुपयोग किती मोठा आहे.. हे सर्व प्रयोगसिद्ध नी रासायनादिक घटकासह प्रत्यक्षनिष्ठ भाषेत सांगतील नी गोशाळा प्रभृति संस्था गायींच्या आणि बैलांच्या जोपासनेचा मनुष्यास अधिकात अधिक प्रत्यत्र उपयोग कसा होईल याच अैहिक दृष्टीने चालवितील, तरच आता गोरक्षणाचे महत्त्व लोकास अधिक पटणारे आहे.. गाय हा पशू अुपयुक्त आहे म्हणून रक्षणीय आहे, अशा धोरणाने गोरक्षणाचे धार्मिक स्वरूप सोडून त्यास आर्थिक स्वरूप दिले की झाले. त्यायोगे गोरक्षण हवे त्याच प्रमाणात नी प्रकाराने होईल. धार्मिक स्वरूपाने आजच्या युगात काही लाभ नसून अुलट भाबडी प्रवृत्ती पसरविण्याची हानी मात्र आहे.’’

मनमोराचा पिसारा
कालिदासांचा वसंत
श्रीकृष्णानं आपलं वर्णन करताना मी महिन्यामधला सर्वोत्तम मार्गशीर्ष आणि ऋतूमध्ये कुसुमाकर म्हणजे वसंत असं म्हटलंय! मासानाम् मार्गशीर्षोऽहम, ऋतुनाम् कुसुमाकर: .. ते का, हे कळण्यासाठी कालिदासाचं ‘कुमारसंभव’ वाचायला हवं.
मुळात कुमारसंभव म्हणजे शिव-पार्वती यांचा पुत्र स्कंध याची कहाणी. तारकासुर नावाच्या असुराने देवांनाही ‘त्राहिमाम’ करून सोडलं. सारे देव इंद्राला शरण गेले आणि असे ठरले की, तारकासुराच्या वधासाठी महापराक्रमी योद्धा हवा. केवळ शिव-पार्वतीचा पुत्र हे महत्कार्य करू शकेल; परंतु शिव हिमालयात तपश्चर्या करीत होते. त्यांचं पार्वतीशी मीलन व्हायला हवं, त्यासाठी त्यांनी नेत्र उघडून पाहायला तर हवं. शिव अतिशय निश्चयी आणि कोपिष्ट, त्यांना तपामधून जागं करायचं ते कसं? इंद्राने त्यासाठी साक्षात मदनाला पाचारण केले. त्याने ती जबाबदारी स्वीकारली, कारण ‘वसंत ऋतू’ हा मदनाचा सखा. त्याचा अग्रदूत. मदनानं केलेल्या आवाहनानुसार वसंत हिमालयात दाखल झाला आणि अहो! काय किमया त्याची? काय त्याची जादू? कुमारसंभवात वसंताचं आगमन होतं ते असं!
कवी कालिदास अतिशय चतुर आणि मर्मग्राही, झालंच तर आजच्या भाषेत ‘बोल्ड आणि ब्युटिफूल’. त्यांनी कुमारसंभवात केलेलं वसंत वर्णन म्हणजे साक्षात वसंताचा अनुभव शब्दबद्ध होतो.
वसंताच्या बहरानं अवघा हिमालय बहरून येतो आणि तोही अचानक. सृष्टीमधली वृक्ष आणि पर्णराजी चकित होते, समस्त वन्य पशू-पक्ष्यांच्या या अनपेक्षित आरंभाने आनंदाला नि शृंगाराला पारावार राहत नाही. संस्कृत काव्यातील संकेतानुसार अशोकाचे वृक्ष पाना-फुलांनी बहरून येण्यापूर्वी तिथे वावरणाऱ्या सुंदर स्त्रियाना आपल्या नाजूक पायानी नूपुरांच्या नादासह लत्ताप्रहार करावा लागतो; परंतु त्या वेळी अशोकाचे वृक्ष अचानक पर्ण-पुष्पसंभारांनी बहरून आले.
वसंताने मदनाला त्याची शृंगार किमया साधण्यासाठी आम्रवृक्षाच्या (सुगंधित) मोहोराचे बाण दिले. हे मोहोर रंगतदार पिसांसारखे भासत होते. त्यावर अनेक मधमाश्या रुंजी घालत होत्या. मदनाचे नाव त्या बाणांवर त्या रेखाटत होत्या, असा सज्ज बाण मदनाकडे वसंताने सुपूर्द केला.
परंतु कालिदास तिथे थांबत नाहीत. वसंताची या सर्व पशु-पक्ष्यांच्या मनोवृत्तीवर चढलेली नशा ते समर्पक शब्दांत मांडतात- भुंगा आणि त्याची नारी, दोघंही एकाच पुष्परूपी पात्रातून मध चाखू लागले; तर उत्तेजित झालेल्या हरणाने आपल्या हरिणीला शिंगाने खाजविल्यामुळे त्या स्पर्शाने हर्षभरित होऊन (तिने) डोळे मिटून घेतले. जलाशयातील कमळपुष्पाच्या परागांनी सुगंधित झालेल्या पाण्याचा घोट हत्तिणीने हत्तीला प्रेमभराने भरविला. चक्रवाक पक्ष्याने आपल्या पक्षिणीला कमलपुष्पांचा अर्धवट उष्टावलेला (खाल्लेला) देठ बहाल केला. किंपुरुषांनी आपल्या प्रेयसीला गाण्याच्या अंतऱ्यात हर्षभराने चुंबन दिले. या प्रेयसीचे डोळे पुष्पासवाच्या (फुलापासून बनविलेले मद्य) अतिप्राशनाने भिरभिरत होते आणि गाताना आलेल्या घर्मबिंदूंनी त्यांच्या चेहऱ्यावर रेखाटलेली सुंदर नक्षी किंचित ओली आणि विरूप झाली. संस्कृत काव्यात वृक्ष आणि वेली यांना प्रियकर- प्रेयसी मानलं जातं. वसंताच्या बहरामुळे या वेलींना अचानक पुष्पसंभार फुटले. ते पुष्पसंभार जणू त्यांचे वक्षभार आणि नाजूक कोवळी पालवी म्हणजे त्यांचे मीलनोत्सुक होऊन थरथरणारे अधर अशा वेलींनी प्रेमभरानी वृक्षांना आलिंगन दिलं..
कवी कालिदासांच्या शब्द आणि उपमा यांचा या वसंताइतकाच मनोहर बहर आपल्याला मंत्रमुग्ध करतो.
डॉ.राजेंद्र बर्वे
drrajendrabarve@gmail.com