उत्तर-मध्य इजिप्तमधील अलेक्झांड्रिया शहराला भूमध्य सागराचा ३२ कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. सिकन्दरीया हे या शहराचे अरेबिक नाव. ४१ लाख लोकवस्तीचे अलेक्झांड्रिया शहर जुनी इजिप्शियन आणि आधुनिक पाश्चात्त्य संस्कृती यांचे सुरेख मिश्रण आहे. इथले बंदर इजिप्तमधले सर्वाधिक मोठे बंदर असून या बंदरातून इजिप्तची ८०% आयात-निर्यात चालते. सध्या शहरात सुन्नी मुस्लीम अधिक असले तरी या शहरात सातव्या शतकात अरब मुस्लीम सत्तास्थापनेपूर्वी ज्यू आणि ख्रिश्चनांचे प्राबल्य होते. नाईल नदीच्या पश्चिम शाखेतून, अलेक्झांड्रिया शहरापासून २७ कि.मी. लांबीच्या पाइपलाइन्स आणून शहराला पाणीपुरवठा केल्यापासून पिण्याच्या पाण्याची इथे रेलचेल झाली आहे. १८९० साली येथे नगर प्रशासन स्थापन झाले. इथला इजिप्शियन कापूस उत्तम प्रकारचा समजला जातो आणि जगातून या कापसाला मोठी मागणी असते. येथे तेलशुद्धीकरण केंद्रे असून तेराव्या शतकापासून इथला जहाजबांधणी आणि वाहतूक व्यवसाय तेजीत आहे. अलेक्झांड्रिया बंदर, रेड सी आणि सुवेज कालव्यापासून जवळ असल्यामुळे जमिनीवरील आणि सामुद्रिक व्यापारी दळणवळणाचे अलेक्झांड्रिया हे एक महत्त्वाचे ठाणे झालेय. शहराचे अर्थकारण सिमेंट, पेट्रोकेमिकल्स, तेलशुद्धीकरण, जहाजबांधणी, सागरी व्यापार या व्यवसायांवर चालते. कैरो ते अलेक्झांड्रिया अशी रेल्वेसेवा इ.स. १८५६ मध्ये सुरू झाली, तर १८६३ साली या शहरात घोडय़ांनी ओढायची ट्राम आली. १९०२ साली येथे शहरांतर्गत विजेवर चालणारी ट्राम सुरू झाली. ६८% साक्षरता असलेल्या या शहराने शिक्षण क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. १९०२ मध्ये शहरात व्हिक्टोरिया कॉलेज स्थापन झाले. मुस्लिमांचे प्राबल्य असूनही अलेक्झांड्रियात १९२५ साली मुलींसाठी पहिले स्कॉटिश स्कूल सुरू झाले, तर १९३५ मध्ये मुलींसाठी इंग्लिश कॉलेज सुरू झाले. तांत्रिक शिक्षणासाठी अलेक्झांड्रिया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी ही इथली प्रमुख संस्था आहे.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

उष्णकटिबंधातील पर्जन्यवने

विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेस २३.५ अंश पसरलेला प्रदेश म्हणजे उष्णकटिबंध. येथे वर्षभर सूर्यकिरणे सरळ पोहोचतात. या भागात जेथे वर्षांतल्या ३०० पेक्षा जास्त दिवसांत सुमारे २००० मिमी पाऊस पडतो तेथे सदाहरित पर्जन्यवने निर्माण होतात. वनस्पती आणि त्यांवर अवलंबून असणारे प्राणी यांची मोठय़ा प्रमाणावर वाढ होते. ही वने जैववैविध्यासाठी प्रसिद्ध आहेत. पृथ्वीवरील ४ खंडांत अशी वने आहेत. उदा. अमेरिकेत ब्राझील, व्हेनेझुएला, इक्वेडोर, कोलंबिया, पनामा, मेक्सिको, कोस्टारिका; आफ्रिकेतील कोंगो, घाना, मादागास्कर; आग्नेय आशियातील मलेशिया, इंडोनेशिया, अंदमान-निकोबार बेटे. भारतात जेथे दोन मोसमांत मिळून २०० दिवस पाऊस पडतो तेथील डोंगराळ भागात पर्जन्यवनसदृश परिस्थिती दिसते. काही वैज्ञानिक या वनांना ढगाळ वने म्हणतात. ही वने भारताच्या ईशान्य भागात- आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश इ. आणि पश्चिम घाटाच्या दक्षिणेतील कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यांत आढळतात.

ही वने तीनमजली असतात. पहिला मजला १५-२० मीटर उंचीच्या वृक्षांचा, दुसरा ३०-४० मीटर उंच वृक्षांचा. या दोनमजली दाट वृक्षराजीमुळे सूर्यप्रकाशाचे कवडसे क्वचितच जमिनीपर्यंत पोहोचतात. फायकस, डीप्तेरोकॅर्पस, टेत्रामिलीस यांसारखे काही वृक्ष दोन्ही मजल्यांतून वर डोके काढून ६०-६५ मीटर उंचीवर फांद्या पसरतात.

अशा दाट वनात शिरल्यावर भोवती उंच झाडांचे खांबासारखे बुंधे, आकाश झाकणारे गर्द हिरवे छत, अंधूक-धूसर प्रकाश यामुळे एखाद्या प्रचंड गुहेत शिरल्यासारखे वाटते. काही वृक्षांच्या बुंध्याभोवती अजगरासारखे वेटोळे घालत उंचच उंच वाढणारे वेत, गारंबीसारखे वेल दचकायला लावतात. नेचे-ऑर्चिडसारखी झुडपे उंच वृक्षांच्या फांद्यांवर विराजमान झालेली दिसतात.

अंधूक प्रकाशात जमिनीवर मात्र हिरव्या झुडपांची उणीव भासते. कुजणाऱ्या पालापाचोळ्यावर कवके, कीटक-कृमी, जळवा यांची दाटी असते. आळंबी- पांढरी, पिवळी, शेंदरी, अंधारात चमकणारी, उजेडाने निळी पडणारी – अनेक प्रकारची. धाग्यासारखी मुळे जमिनीत आणि फक्त फूल तेवढं जमिनीवर – अशी उग्र वासाची राफ्लेसिआ.

नसíगक सुबत्तेत सगळेच फोफावतात. जगण्यासाठी चढाओढ, जमिनीवर जागेसाठी, हवेत प्रकाशासाठी – एकापेक्षा दुसरा उंच, त्याच्या स्थिरतेसाठी बुंध्याला फळीसारखी आधारमुळे. जुळवून घेण्याची वनस्पतींची प्रवृत्ती, त्यामुळे होणारी उत्क्रांती, जैववैविध्यांची रेलचेल इथे पाहायला मिळते.

प्रा. शरद चाफेकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org