19 October 2019

News Flash

टॉम अल्टरची चित्रपटसंपदा (३)

टॉम हा राजेश खन्नाला दैवत मानत होता. त्याच्या या दैवताबरोबर ‘नोकरी’मध्ये काम करण्याची संधी टॉमला मिळाली.

टॉम ऊर्फ थॉमस अल्टर हा उत्तराखंडात राहणाऱ्या अमेरिकन दाम्पत्याचा मुलगा फिल्म इन्स्टिटय़ूटची पदवी प्राप्त करून मुंबईच्या हिंदी चित्रपट उद्योगात दाखल झाला. प्रदíशत झालेला आणि महत्त्वाची भूमिका असलेला त्याचा पहिला चित्रपट होता ‘चरस’ (१९७६). टॉम हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या तिन्ही भाषा सफाईदारपणे बोलत असे. त्यामुळे त्याला विविध प्रकारच्या चित्रपटांमधून भूमिका मिळाल्या. त्याच्या कारकीर्दीत त्याने ६५ हून अधिक चित्रपटांमधून कामे केली. यात हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, कानडी चित्रपटांचा समावेश आहे. हिंदी, उर्दू अस्खलीत बोलणाऱ्या आणि शेरोशायरीचा जाणकार असलेल्या टॉमला नामवंत दिग्दर्शकांकडे काम करायची संधी मिळाली. यामध्ये सत्यजीत रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’, रामानंद सागर यांच्या ‘चरस’चा समावेश आहे. टॉम हा राजेश खन्नाला दैवत मानत होता. त्याच्या या दैवताबरोबर ‘नोकरी’मध्ये काम करण्याची संधी टॉमला मिळाली.

टॉम अल्टरच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये ‘चरस’, ‘शतरंज के खिलाडी’, ‘देस-परदेस’, ‘साहेब बहादूर’, ‘क्रांती’, ‘गांधी’, ‘राम तेरी गंगा मली’, ‘कर्मा’, ‘जुनून’, ‘वीर-जारा’, ‘ऐतबार’ आदींचा समावेश आहे. त्याने काम केलेल्या इंग्रजी सिनेमांमध्ये ‘अवतार’ हा ब्रिटिश-ऑस्ट्रेलियन-अमेरिकन सिनेमा विख्यात आहे. त्याशिवाय ‘सन ऑफ फ्लॉवर’, ‘ड्रेसिंग रूम’ वगरे त्याचे इंग्रजी चित्रपट विशेष उल्लेखनीय आहेत.

टॉमने दूरदर्शनवरील दहा मालिकांमध्येही काम केले. त्यांपकी ‘शक्तिमान’, ‘यहाँ के हम सिकंदर’, ‘रिश्तों का चक्रव्यूह’, ‘संविधान’ या मालिका उल्लेखनीय आहेत. ‘वन नाइट विथ द किंग’ या हॉलीवूडच्या चित्रपटातही टॉमने महत्त्वाची भूमिका केली आहे.

त्याच्या चित्रपट, नाटक, दूरदर्शन, क्रीडा, साहित्यिक अशा विविध क्षेत्रांतल्या योगदानाबद्दल भारत सरकारने २००८ साली पद्मश्री  देऊन टॉमचा गौरव केला. २०१७ साली या चतुरस्र कलाकाराचा मृत्यू त्वचेच्या कर्करोगामुळे मुंबईत झाला. टॉम अल्टरची पत्नी कॅरोल इव्हान्स, मुलगा जेमी आणि कन्या अफशान हे अनुक्रमे मुंबई आणि नॉएडा येथे राहतात.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

First Published on December 28, 2018 3:24 am

Web Title: tom alter