‘सांग दर्पणा कशी मी दिसते’ असं मनातल्या मनात म्हणत एखादी सुंदरी जेव्हा आरशासमोर स्वत:ला बघते, तेव्हा मनाच्या कोपऱ्यातून तिला कदाचित उत्तर मिळत असेल ‘शब्दावाचून कळले सारे, ते शब्दांच्या पलीकडले’. थोडय़ा फार फरकाने आपल्या सर्वाचं अगदी असंच असतं. सुंदर दिसावं, रुबाबदार दिसावं आणि मुख्य म्हणजे चारचौघांत उठून दिसावं असं आपल्याला वाटत असत. आपलं व्यक्तिमत्त्व आपला आत्मविश्वास वृिद्धगत करायला मदत करतं. आपण ट्रेंडी फॅशनेबल वेशभूषा करावी असे आपल्याला वाटत असते आणि यात गर असं काहीच नाही. साजेसा आणि प्रसंगानुरूप पोशाख हवा. साजेशा वेशभूषेने आपल्या व्यक्तिमत्त्वास बहर येतो नि ते खुलून दिसते हे नि:संशय. आता पुरुषही फॅशनेबल होऊ लागले आहेत, ही स्वागतार्ह बाब म्हणावयास हवी.
वेशभूषेस खऱ्या अर्थाने रंग भरतात ते म्हणजे फॅशन डिझायनर्स. पूर्वी ट्रेंडी टेलर्सकडे आपण कपडे शिवायला जायचो, आताही जातो. तसा विचार केला तर तेही त्यांच्यापरीने डिझाइनर अथवा स्टायलिश आहेत, असे म्हटले पाहिजे. आता रेडीमेड कपडे खरेदी करण्याकडे कल वाढत चालला आहे. बदलत्या काळाप्रमाणे फॅशन ही संकल्पना प्रगत होऊ लागली आणि फॅशन डिझायिनगला महत्त्व प्राप्त होऊ लागलं. आपल्या कल्पकतेने आणि कलात्मकतेने फॅशन डिझायनर्सनी वेशभूषेत खूपच रंगत आणली.
फॅशन डिझायनर्सना आवश्यक असते ती त्यांची कलाविष्कार साकार करू शकतील अशा वस्त्रांची. विविध रंगछटा, पोत, वीण, मिश्र वस्त्रे, विशेष गुणधर्म असलेले सूत इत्यादींचा सुरेल संगम कलात्मक किमया करून जातो. मात्र यासाठी हवं वस्त्रनिर्मिती प्रक्रियांचं ज्ञान. तसेच कापडाच्या दर्जाविषयींच्या घटकांचेही ज्ञान असणे आवश्यक ठरते. यामुळे फॅशन डिझायनर्सच्या मनातील कलाकृतींना मूर्त स्वरूप येण्यास मदत होते. फॅशन डिझायनर मूळ वस्त्रावर डिझायिनग करण्यात वाकबगार असतात. यासाठी योग्य दर्जाचं कापड निवडणं खूप आवश्यक ठरतं. वस्त्रनिर्मिती प्रक्रियांचे आणि दर्जाविषयीचा अभ्यास परिपूर्णतेच्या दिशेने वाटचालीस मदत करतो. सुयोग्य वस्त्राची उपलब्धता आणि फॅशन डिझायनर्सच्या कलेचा मिलाफ झाला की त्यांच्या मनपटलावरील कलाविष्कार मूर्त रूप धारण करतो आणि परिधान केल्यावर समोरून शब्द येतात- ‘वाह क्या बात है!!!’
सुनील गणपुले (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – संस्थान सुरगाणा
सध्या नाशिक जिल्हय़ात असलेले सुरगाणा या तालुक्याच्या ठिकाणी ब्रिटिशराजच्या काळात सुरगाणा संस्थानाचे प्रमुख ठाणे होते. मूळचे ‘सुरगण’ असे नाव अपभ्रंश होऊन त्याचे सुरगाणा झाले. सुरगाणा राज्याचे शासक सुरुवातीस देशमुख हे उपनाव लावीत. सुरगाणा राज्याचा प्रदेश सुरत ते दख्खन या दळणवळणाच्या रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी होता. या शासकांच्या पूर्वजांनी गुजरातच्या सुलतान मुहमदाशी संधान जुळवून पश्चिम घाटातील वन्य जमाती, भिल्लांच्या हल्ल्यांपासून जनतेचे संरक्षण करणे, सुलतानास हवी तेव्हा सनिकी सेवा देणे, त्यांच्यासाठी खानदेशच्या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवणे इत्यादी कामे केली. काही काळ त्यांनी मराठय़ांसाठीसुद्धा हथगड या डोंगराळ प्रदेशात भिल्ल, लुटारू यांच्यापासून संरक्षण देण्याचे काम केले. त्यामुळे त्यांना हथगडजवळ सुरगाणा आणि इतर १७ गावांचे इनाम मिळून देशमुख हा खिताब मिळाला. पुढे या शासकांनी सुरगाणा ही राजधानी ठेवून आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले. मराठे, मोगल, ब्रिटिश यांना देशमुखांनी खंडणी देण्याचे नाकारल्यामुळे त्यांना ‘बंडखोर सरदार’ असे नाव पडले. पुढे या शासकांनी पवार हे उपनाव लावले. मल्हारराव या शासकाने १८१९ साली ब्रिटिशांचे काही सनिक सुरतला जात असताना त्यांच्यावर हल्ला करून लूट केल्यामुळे कंपनी सरकारने मल्हाररावास कैद करून फाशी देऊन त्याचा पुतण्या भिकाजीला गादीवर बसविले. त्याच वर्षी म्हणजे १८१९ मध्ये कंपनी सरकारने सुरगाण्याशी संरक्षण करार करून संस्थान आपल्या आधिपत्याखाली आणले. पुढे इ.स. १९४७ पर्यंत एक संस्थान बनून राहिलेल्या सुरगाण्याचे राज्यक्षेत्र ९३० चौ.कि.मी. आणि त्यात ६० खेडय़ांचा अंतर्भाव होता.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com