News Flash

नवदेशांचा उदयास्त : त्रिनिदाद-टोबॅगो

त्रिनिदाद अ‍ॅण्ड टोबॅगो हा देश कॅरिबियन क्षेत्रातील सर्वाधिक समृद्धी प्राप्त झालेला देश समजला जातो.

त्रिनिदाद अ‍ॅण्ड टोबॅगो हा देश कॅरिबियन क्षेत्रातील सर्वाधिक समृद्धी प्राप्त झालेला देश समजला जातो.

भारतीयांना त्रिनिदाद या वेस्ट इंडियन बेटाचे नाव माहिती असते ते क्रिकेटमुळे. ‘प्रिन्स ऑफ पोर्ट ऑफ स्पेन’ म्हणून ओळखला जाणारा आणि दंतकथा बनलेला ब्रायन लारा हा माजी क्रिकेटपटू या त्रिनिदाद बेटावरचाच रहिवासी! त्रिनिदाद हा वेस्ट इंडिज बेटसमूहांपैकी एक स्वतंत्र सार्वभौम देश आहे, हे मात्र अनेकांना माहीत नसावे. ‘त्रिनिदाद अ‍ॅण्ड टोबॅगो’ हे या देशाचे नाव. त्रिनिदाद आणि टोबॅगो या दोन प्रमुख बेटांव्यतिरिक्त इतर काही लहान बेटांचा मिळून बनलेला रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अ‍ॅण्ड टोबॅगो हा कॅरिबियन समूहातला सर्वात दक्षिणेतला देश. १३ लाखांच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या या देशाची ९६ टक्के लोकवस्ती त्रिनिदाद बेटावर, तर केवळ चार टक्के वस्ती टोबॅगो या लहान बेटावर आहे. ३१ ऑगस्ट १९६२ रोजी युनायटेड किंगडमकडून स्वातंत्र्य प्राप्त झाल्यावर त्रिनिदाद हा एक स्वायत्त देश म्हणून अस्तित्वात आला. सध्या त्रिनिदाद अ‍ॅण्ड टोबॅगो हा देश कॅरिबियन क्षेत्रातील सर्वाधिक समृद्धी प्राप्त झालेला देश समजला जातो.

अमेरिकेचे मूलनिवासी ‘अमेरिण्डीयन्स’- म्हणजे आपण ज्यांना ‘रेड इंडियन’ म्हणतो त्या लोकांची त्रिनिदादमध्ये पूर्वी वस्ती होती. १४९८ साली ख्रिस्तोफर कोलंबस त्याच्या तिसऱ्या अमेरिका मोहिमेवर असताना या त्रिनिदाद आणि टोबॅगो बेटांजवळून गेला. कोलंबसने दिलेल्या माहितीनुसार स्पॅनिश लोकांनी तिथे वस्ती करण्यासाठी त्रिनिदादचा काही प्रदेश ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येक वेळी स्थानिक आदिवासींनी तो हाणून पाडला. पुढे १५९२ साली त्रिनिदादचा बराच प्रदेश ताब्यात घेऊन स्पॅनिश लोकांनी तिथे त्यांची सान जोस ही छोटी वसाहत स्थापन केली. दरम्यान, या काळात टोबॅगो बेटाचा ताबा घेण्यासाठी डच, इंग्रज आणि फ्रेंचांनी बरेच प्रयत्न केले. त्या काळात टोबॅगो बेट हे चाचेगिरीचा अड्डाही बनले होते. सन १७६२ मध्ये ब्रिटिश मात्र टोबॅगो बेटावर आपला अंमल बसविण्यात यशस्वी झाले. सतराव्या शतकात स्पॅनिश वसाहतवाल्यांनी ख्रिस्ती धर्मप्रसार करण्याच्या हेतूने स्पेनच्या कॅथॉलिक मिशनची अनेक केंद्रे त्रिनिदादमध्ये सुरू केली होती.

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 12:37 am

Web Title: trinidad and tobago west indian island zws 70
Next Stories
1 नवदेशांचा उदयास्त : सध्याचा स्वतंत्र जमैका
2 कुतूहल : वैशिष्ट्यपूर्ण सिमसन रेषा
3 नवदेशांचा उदयास्त : जमैका : वसाहतीकडून स्वातंत्र्याकडे…
Just Now!
X