त्रिनिदादमधील ब्रिटिश वसाहत ३१ ऑगस्ट १९६२ रोजी बरखास्त होऊन ‘त्रिनिदाद अ‍ॅण्ड टोबॅगो’ या नवदेशाचा उदय झाला. ब्रिटिश महाराणी एलिझाबेथ-द्वितीयकडे या नवदेशाचे औपचारिक राष्ट्रप्रमुखपद आले. येथील गव्हर्नर जनरल सॉलोमॉन होचॉय हे राणीचे प्रतिनिधी म्हणून काम करू लागले. एरिक विल्यम्स हे लोकप्रिय नेते देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून विराजमान झाले; १९८१ पर्यंत ते या पदावर होते. अमेरिकेतल्या नागरी हक्क चळवळीपासून प्रेरणा घेऊन १९७० मध्ये ‘ब्लॅक पॉवर मूव्हमेंट’ ही चळवळ राजधानी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये उभी राहिली. संप, निदर्शने यांमुळे सर्व व्यवहार थंडावले; परंतु पंतप्रधान विल्यम्सनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

१९७२ ते १९८३ या काळात त्रिनिदादच्या समुद्रात अनेक ठिकाणी खनिज तेलाचे साठे सापडले आणि नेमके याच काळात कच्च्या खनिज तेलाचे जागतिक दर कडाडले. त्यामुळे त्रिनिदादच्या अर्थव्यवस्थेला मजबुती आली. लोकांचे जीवनमान उंचावले. १९७६ साली ‘त्रिनिदाद अ‍ॅण्ड टोबॅगो’ हे प्रजासत्ताक राष्ट्र बनले आणि राष्ट्रकुल संघटनेचे सदस्य झाले. गव्हर्नर जनरल हे पद जाऊन त्याजागी राष्ट्राध्यक्ष हा नामधारी राष्ट्रप्रमुख बनला. निवडणुकीद्वारे इथे लोकप्रतिनिधी निवडले जातात. बसदेव पांडे (१९९५-२००१) आणि कमला प्रसाद-बिसेसर (२०१०-२०१५) या दोन मूळ भारतीय वंशाच्या व्यक्तींनी त्रिनिदादचे पंतप्रधानपद भूषवले आहे. कीथ रॉली हे विद्यमान पंतप्रधान आहेत.

त्रिनिदादची अर्थव्यवस्था प्रामुख्याने खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांच्या निर्यातीवर भक्कमपणे उभी आहे. पर्यटन व्यवसाय हा तिथला उत्पन्नाचा आणखी एक स्रोत. देशाच्या अंतर्गत आवश्यकतेपुरते साखर उत्पादन तिथे होते. समृद्ध अर्थव्यवस्थेमुळे हा देश सध्या जगातल्या ७० उच्चस्तरीय विकसित देशांच्या पंक्तीत आला आहे! सुमारे १३ लाख लोकसंख्येच्या या देशात ५६ टक्के ख्रिस्ती, २० टक्के हिंदू, पाच टक्के इस्लामधर्मीय आहेत. त्यांपैकी ३८ टक्के भारतीय आणि ३७ टक्के आफ्रिकी लोकवस्ती आहे. इंग्रजी ही येथील राजभाषा असली तरी, भोजपुरी पद्धतीची त्रिनिदादी हिंदुस्थानी भाषा इथे मोठ्या प्रमाणात बोलली जाते. – सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com