03 June 2020

News Flash

कुतूहल : विदेशी प्रजाती

पर्यावरणप्रेमी म्हणून आपण याबाबत जनजागृती घडवून आणू शकतो.

सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली अभयारण्याजवळ एका संध्याकाळी निरीक्षणे नोंदविताना एक कासव माझ्या नजरेस पडले. कानाजवळील भाग लालभडक रंगाचा आणि बाकी शरीर हिरवट राखाडी रंगाचे. उत्सुकतेने त्याची माहिती जमवण्यास सुरुवात केल्यावर असे निदर्शनास आले की, ही प्रजाती भारतातील नसून दक्षिण अमेरिका व मेक्सिको येथील आहे. ‘रेड-इअर्ड स्लायडर टर्टल’ असे त्याचे नाव! या देशांमध्ये आणि आता दुर्दैवाने भारतातही हे कासव एक आवडता पाळीव प्राणी झाले आहे.

घरात पाळीव प्राणी हवा, कुटुंबात नवीन सदस्य हवा म्हणून कित्येक जणांनी मोठय़ा उत्साहाने विकत घेतलेले हे कासव ‘नकोसे’ झाल्यावर घराजवळील एखाद्या नैसर्गिक तलावात, नदीत किंवा डबक्यात सहज सोडून दिले जाते. वरवर ही साधी गोष्ट दिसत असली, तरी स्थानिक परिसंस्थेसाठी अशी कृती घातक ठरू शकते.

भारतात नैसर्गिकरीत्या न आढळणाऱ्या- म्हणजेच ज्यांचे मूळ अधिवास भारतात नसून इतर देशांत आहे अशा या ‘विदेशी प्रजाती’ (एक्झॉटिक स्पेशीज्) विविध कारणांनी, विविध मार्गानी इथे दाखल होतात. काही विशिष्ट कारणांसाठी मानवाकडून कायदेशीररीत्या वा बेकायदेशीररीत्या त्यांना येथे आणले जाते. मात्र, त्यांच्यामुळे बहुतेक वेळा स्थानिक किंवा देशी प्रजातींचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. या विदेशी प्रजातींमुळे स्थानिक परिसंस्थेचे संतुलन बिघडू शकते. या असंतुलनाची तीव्रता अधिक असेल, तर स्थानिक जैवविविधतेचा ऱ्हास होण्याचाही धोका संभवतो. यातून पर्यावरणविषयक प्रश्न निर्माण होतातच; पण आरोग्य आणि स्थानिक नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेवरही त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

आपल्याकडील हवामान, त्यांना लागणारे अन्न सहजरीत्या उपलब्ध न होणे, स्थानिक प्रजातींचा हक्काचा अधिवास या व अशा अनेक कारणांमुळे बहतेक वेळा अशा विदेशी प्रजाती नष्ट होतात. परंतु ‘सव्‍‌र्हायव्हल ऑफ फिटेस्ट’ या चार्ल्स डार्विन यांच्या सिद्धांताप्रमाणे काही प्रजाती अशा वातावरणातदेखील तग धरून राहतात.

पर्यावरणप्रेमी म्हणून आपण याबाबत जनजागृती घडवून आणू शकतो. सर्वप्रथम विदेशी प्रजातींना आपल्या घरात ‘पाळीव प्राणी’ म्हणून स्थान न देता, इतरांनाही तसे करण्याची विनंती आपण नक्की करू शकतो. आपल्या परिसरातील बागेत देशी रोपांची लागवड करू शकतो. भारतात मूळ असलेल्या प्रजातींचे हरवत चाललेले महत्त्व आपण त्यांना पुन्हा प्राप्त करून देऊ शकतो.

– सुरभि वालावलकर,

मराठी विज्ञान परिषद,वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2020 1:54 am

Web Title: turtle foreign species zws 70
Next Stories
1 धर्मातीत ध्यान
2 मनोवेध : ध्यानावस्थेतील शारीरक्रिया
3 कुतूहल : लुप्तप्राय प्रजाती दिवस
Just Now!
X