जमिनीच्या आतील जलस्रोतांना भूजल म्हणतात. पावसाचे पाणी नदी, नाले, ओढे यांतून वाहाते. धरणे, बांध, बंधारे, तलाव, शेततळी, पाझर तलाव असलेल्या ठिकाणी पाण्याचा साठा होतो. यातील १५ टक्के पाणी वाफेच्या स्वरूपात आणि झिरपण स्वरूपात व्यय पावते. २० ते २५ टक्के पाणी जमिनीत मुरते. अशा रीतीने भूजलनिर्मिती प्रक्रिया सुरू असते. पाऊस कमी झाला, अवर्षण झाले की पाण्यासाठी या भूजलाचा उपसा सुरू होतो. यामध्ये पिण्याचे पाणी व सिंचन या प्रमुख गरजा असतात. भूजल ही नैसर्गिक संपत्ती असल्याने त्यावर कोणाचीही मालकी नसते. परंतु हे भूजल ज्या वेळी कूपनलिकांद्वारे उपसले जाते, तेव्हा त्यावर हक्क सांगायला सुरुवात होते. किंबहुना यासाठी तंटेही घडतात. वास्तविकत: ज्या ठिकाणी शेतीपिके, पशुधन व पिण्यासाठी पाण्याची खरी गरज आहे, अशा ठिकाणी कूपनलिका घेऊन पाणी उपसणे रास्त ठरते. परंतु एक कूपनलिका पूर्ण कार्यक्षम असताना दुसरी, तिसरी कूपनलिका खोदणे जलसाक्षरतेच्या दृष्टीने पूर्णत: अयोग्य आहे. त्यासाठी प्रत्येक राज्याने भूजल अधिनियम कायद्यानुसार भूजल उपशावर पूर्णपणे नियंत्रण आणले पाहिजे.
आज महाराष्ट्रासह अकरा राज्यांत देशातील ९० टक्के भूजलाचा उपसा होतो. पाऊस कमी होतो त्या वर्षी भूजल उपशाची टक्केवारी वाढते. यावर्षी महाराष्ट्रातील काही जिल्हे व तालुक्यांत भूजल मिळणे दुरापास्त झाले आहे. कूपनलिका पूर्णत: कोरडय़ा पडल्या आहेत. जेवढय़ा प्रमाणात व वेगात भूजल उपसा होतो त्या प्रमाणात व गतीने भूजलाचे पुनर्भरण होत नाही. भूजल ही फुकट मिळणारी बाब असली तरी ती राष्ट्रीय संपत्ती आहे ही धारणा पक्की करून मोजूनमापून व गरजेपुरतेच भूजल वापरण्याची मानसिकता सर्व स्तरांवरून जोपासली जाणे जलसाक्षरतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
साधारणत: दरडोई पाण्याची गरज ३००० ते ३५०० घनमीटर इतकी गृहीत धरतात. १७०० घनमीटरला पाणीटंचाई, १२०० घनमीटरला तीव्र पाणीटंचाई तर ७५० घनमीटर व त्यापेक्षाही कमी दरडोईला अति तीव्र पाणीटंचाई मानतात. आपण सध्या टंचाईकडून तीव्र पाणीटंचाईकडे जात आहोत. त्यामुळे ही धोक्याची घंटा समजून भूजल सोन्यासारखे जपायला व वापरायला हवे.
– सुधीर फडके (अहमदनगर)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

जे देखे रवी..:कामाचा महापूर
१९६२, ६३ आणि ६४ या वर्षांत मी ऊर फाटेपर्यंत आणि जीव टेकीला येईपर्यंत काम केले. आठवडय़ातून दोन दिवस आणि महिन्यातले दोन किंवा तीन शनिवार, रविवार असे दिवस तातडीच्या रुग्णांसाठी राखीव होते. दररोजचे नेहमीचे काम सकाळी सात वाजता सुरू होत असे ते कधी कधी रात्री नऊ वाजता संपत असे. शिवाय ठरलेल्या दिवशीचे तातडीचे रुग्ण.
 त्या वेळचा जमाना वेगळा होता. सायनच्या रुग्णालयात अस्थिभंग आणि व्यंग (orthopedics) आणि सर्वसाधारण शल्यचिकित्सा (General Surgery) ज्याच्यात शिरापासून पायाच्या नखापर्यंतच्या सगळ्या व्याधींचा समावेश असे दोन्ही आम्हीच सांभाळत होतो. पूर्व उपनगरे झपाटय़ाने वाढू घातली होती. मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे दोन्ही जवळच धावत होत्या. धारावीतील गुंडगिरी जोमाने वाढीस लागली होती आणि इकडे आग्य््रााकडे जाणारा रस्ता आणि पलीकडे पुण्याचा जुना रस्ता यांचा संगमच मुळी शीव या उपनगराच्या पलीकडे होता. त्यामुळे अपघात, खून, मारामाऱ्या, डोके फोडी, सुरामारी यांचा वर्षांव होत असे. पोटाचा क्षयरोग, अमीबांचा धुमाकूळ  आणि आतडय़ाचा टायफॉइड यांचे रुग्ण डझनवारी दाखल होत असत. शस्त्रक्रिया अहोरात्र चालत. अनेक कारणांमुळे मी यातून निभावलो. एक तर मी तरुण होतो, शिकण्याची जबरदस्त इच्छा होती. आधीच्या रुग्णालयाचे दरवाजे माझ्या तथाकथित दुष्कृत्यामुळे बंद झाले होते. आणि सगळ्यात महत्त्वाचे देखरेख तर होतीच, परंतु ती जाचक नव्हती. डायस सरांनी आमच्यावर विश्वास टाकला होता. त्या विश्वासाला जागावे खेळ करू नये, त्यांची प्रतारणा होऊ नये अशी भावना होती.
माणसांना दंडा दाखवून नव्हे तर प्रेमाने कवेत घेऊन त्यांच्याशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करावेत म्हणजे बहुसंख्य लोक सरळ वागतात असे त्यांचे ब्रीदवाक्य होते. जे या उपायांना मानत नाहीत त्यांना दंडुके दाखवूनही सुधारता येत नाही हे त्यांनीच मला समजवले. ज्या संस्थेसाठी काम करायचे ती संस्था तात्पुरती का असेना आपली आहे अशा प्रेरणेने वागणे हेच खरे कर्माचे इंगित आहे हे त्यांनीच अप्रत्यक्षपणे सांगितले. या सगळ्या दुधात एकच मिठाचा खडा होता. तो म्हणजे निवासी डॉक्टरांना मिळत नसलेल्या साध्या सुविधा. उशीर झाला तर टेबलावर झाकून ठेवलेल्या शिळ्या अन्नाभोवती उंदीर फिरत असत. अंघोळीला गरम तर सोडाच कधी कधी पाणी नसे आणि वर जेवणघर (Mess) धरून ज्या नव्या सुविधा तयार झाल्या होत्या त्या परिचारिकांसाठी (Nurses) राखून ठेवण्यात येत आहेत, असे कळल्यावर माथी फिरली आणि देशातला पहिला निवासी डॉक्टरांचा जो संप झाला..
 त्याचा अनाहूतपणे माझ्या स्वभावाप्रमाणे मीच नेता झालो. त्याबद्दल पुढच्या लेखात.
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

water supply has been restored but complaints of water shortage are still continue
पिंपरी : पाणीपुरवठा पूर्ववत, मात्र तक्रारींचा ओघ
water scarcity, Pimpri chinchwad , shortage of water supply, Andhra Dam
पिंपरी : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट…उपनगरांमध्ये पाणीटंचाई
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स

वॉर अँड पीस : फुफ्फुसाचे विकार : भाग – २
लक्षणे – थोडय़ाशा श्रमाने धाप लागणे, ‘फा फू’ होणे. जिन्यांची जास्त चढउतार केल्याने श्वास लागणे. पाच दहा किलो वजन उचलण्याने छातीत दुखणे. फुफ्फुसात ठराविक जागी दुखणे. बोलण्याचे श्रम थोडे अधिक किंवा अधिक काळ झाल्याने छातीत दुखणे; जास्त काम करण्याची उमेद नसणे, घाबरणे, भीती वाटणे, आत्मविश्वास कमी होणे, जोरात पळता न येणे, हवा किंवा पाणी यात थोडा बदल झाला, गारठा वाढला की सर्दी, पडसे, दमा हे विकार होणे. छातीचा घेर वयाच्या मानाने न वाढणे.
कारणे – आनुवंशिकता; जन्मानंतर हयगय, ताप, सर्दी, पडसे असे विकार बालकांना होणे. कोंदट, अपुरा उजेड व हवा असलेल्या घरात राहणे; व्यायाम, हालचाल, खेळ यांचा अभाव असणे. अस्थिधातूंचे पोषणास आवश्यक असणाऱ्या पदार्थाचा रोजच्या जेवणात अभाव असणे. रागराग करणे, चिडचिड करणे, खाल्लेले अन्न अंगी न लागू देणे, कृमी, जंत, मुडदूस, पोटाचा डबा या विकारांमुळे छातीच्या पिंजऱ्यावर कळत नकळत परिणाम होतो.
फुफ्फुसाचा घेर हा माणसाच्या वयावर, उंचीवर व एकूण परिस्थतीवर अवलंबून आहे. वयात आलेल्या माणसास, फुफ्फुसाचा घेर वाढवण्यास संधी असते. त्याकरिता छाती न फुगवता व फुगवून असे दोन्ही प्रकारे मोजमाप नोंदवून ठेवावे. दर तीन महिन्यांनी तपासावे. नाडी व श्वसनाच्या वेगाची नोंद करावी. त्यांत कमी जास्त काय आहे, त्याप्रमाणे उपाययोजना करता येते. छातीत कफ, चिकटा, कुंई कुंई आवाज आहेत का, हे पाहावे.
छातीच्या हाडांच्या पिंजऱ्याच्या रचनेत दोष लहानपणीच लक्षात आला तर योग्य उपचार करता येतात. उंचीच्या व वयाच्या मानाने छातीचा आकार कमी असला तर, तरुण वयात प्रयत्नपूर्वक व्यायाम व योग्य औषधोपचाराने छातीची रुंद वाढ होऊ शकते. त्याकरिता सुधावर्धक, मांसवर्धक आहार, विहार व औषधे यांची योजना करता येते. सावकाश व्यायाम वाढवून उपचारांचे परिणाम समजून घेता येतील.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत:१० एप्रिल
१३१७ > शके १२३९च्या चैत्र भगवद्भक्त, संत गोरा कुंभार समाधिस्थ झाले, त्या दिवशी  ही तारीख होती. सगुणभक्तीला गोरोबांनी अधात्मज्ञानाची जोड दिली आणि तुलनेने कमी, परंतु अर्थगर्भ अभंगरचना केल्या.
१८७३ > ‘हुंडणावळीचे दरासंबंधी वाद’, ‘बँका आणि त्यांचे व्यवहार’ आदी पुस्तके विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या वर्षांत लिहिणारे अर्थशास्त्रविषयक लेखक वामन गोविंद काळे यांचा जन्म.
१९०१ > अर्थतज्ज्ञ, सहकारी चळवळीचे अध्वर्यू, संसदपटू आणि लेखक धनंजय रामचंद्र गाडगीळ यांचा जन्म. २५ हून अधिक ग्रंथ आणि लेखसंग्रहाचे दोन खंड, अशी त्यांची ग्रंथसंपदा होय. भारताचा आर्थिक इतिहास हा त्यांचा खास विषय होता.
१९०७ > नाटककार आणि कादंबरीकार म्हणून गाजलेले मोतीराम गजानन रांगणेकर यांचा जन्म. चित्रपटांचा प्रभाव वाढत असतानाच्या काळात ‘नाटय़निकेतन’ ही संस्था काढून ‘मोगं’नी आशीर्वाद, कुलवधू, माझं घर, एक होता म्हातारा, भटाला दिली ओसरी, हेही दिवस जातील अशी अनेक नाटके लिहिली, रंगभूमीवर आणली. त्यापैकी ‘कुलवधू’ सर्वाधिक गाजले. खुसखुशीत विनोदी लेखनासाठीही ते प्रसिद्ध होते. सीमोल्लंघन, मृगजळ या त्यांच्या कादंबऱ्या.
– संजय वझरेकर