06 July 2020

News Flash

कुतूहल – गंधकाचा वापर

सल्फर (गंधक) या अधातूच्या औषधी गुणधर्मामुळे याचा वापर वाढत आहेच, पण औद्योगिक क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात वापरलं जात असल्यामुळे या मूलद्रव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.

| July 15, 2014 12:19 pm

सल्फर (गंधक) या अधातूच्या औषधी गुणधर्मामुळे याचा वापर वाढत आहेच, पण औद्योगिक क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात वापरलं जात असल्यामुळे या मूलद्रव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. सल्फर मानवाला फार प्राचीन काळापासून परिचित आहे. लवायजर या शास्त्रज्ञानं सल्फर हे एक स्वतंत्र मूलद्रव्य आहे, हे सिद्ध करीपर्यंत या पेटणाऱ्या आणि निळसर ज्योत देणाऱ्या दगडांभोवती चमत्काराचं काल्पनिक आणि कल्पनातीत रहस्यमय समजुती निर्माण झाल्या होत्या.
एकूण भूपटलाच्या सुमारे ०.१% एवढं निसर्गामधलं सल्फरचं मूलद्रव्यस्वरूपात आणि संयुगाच्या स्वरूपात अस्तित्व आहे. इटली, अमेरिका, कॅनडा, जपान, रशिया, चिली इ. अनेक देशांत शुद्ध सल्फरच्या मोठाल्या खाणी आहेत. भारतात मात्र शुद्ध सल्फर सापडत नाही. भूपृष्ठाखाली हजार-दोन हजार फुटांवर शुद्ध सल्फरचे थर असतात. नलिका कूपासारख्या विवरातून एवढय़ा खोलीवर एका बाजूनं वाफ सोडली जाते आणि वितळलेलं शुद्ध सल्फर नळीतून वर येऊन वाहू लागतं. शुद्ध सल्फरनंतर औद्योगिक महत्त्वाच्या दृष्टीनं पायराइट या सल्फरयुक्त खनिजाचा वापर होतो.
रासायनिक औद्योगिक क्षेत्रात सल्फर हा अधातू वापरून सल्फ्युरिक आम्ल (गंधकाम्ल) तयार केलं जातं. तसंच लाकडाच्या कागदासाठी लगदा बनविण्यासाठी, कार्बन डायसल्फाइडसारखी रसायनं, कीटकनाशकं  व बुरशीनाशकं तयार करण्यासाठी सल्फर वापरतात. सल्फर वापरून सुरुंगाची दारू, बंदुकीची वा शोभेची दारू बनवितात. साखर कारखान्यात रसाच्या शुद्धीकरणासाठी सल्फरचा वापर होतो. सल्फा वर्गातली अनेक औषधं व मलमं आणि अनेक आयुर्वेदीय औषधांमध्ये सल्फरचा वापर होतो. सल्फर वापरून तयार केलेल्या एका खास रंगानं विटांच्या िभती रंगविल्या तर त्या जलविरोधी तर होतातच, पण इमारतीवर भूकंपासारख्या आपत्तीत वेडावाकडा ताण पडला असताही त्या चांगल्या टिकाव धरतात, असं निदर्शनास आलं आहे.  
भारतात सल्फर शुद्ध स्वरूपात सापडत नाही. शुद्ध सल्फरला पर्यायी पदार्थ म्हणून पायराइट वापरून सल्फ्युरिक आम्ल बनविण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. सल्फरला आणि सल्फ्युरिक आम्लाला आणि जिथं जिथं सल्फरचा उपयोग होतो तिथं तिथं पर्यायी पदार्थ शोधणं हे भारतीय शास्त्रज्ञांना परिस्थितीचं एक आव्हान आहे.
शुभदा वक्टे (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – कालिदासाचा ‘ऋ तुसंहार’ (भाग दुसरा)
महाकवी कालिदास यांची प्रतिभा सभोवतालच्या परिसराचा मर्मग्राही वेध घेत असे. नाजूक वेलीवरची मुकुलिका असोत की विशाल वृक्षाचा राठ बुंधा असो. पशु-पक्षी यांचे मूड असोत की स्त्री-पुरुष असोत. कालिदास या सर्वाच्या अंतरंगात प्रवेश करून त्यांच्या सुप्त भावना आणि लुप्त विचारांचं मनोज्ञ लालित्यपूर्ण शब्दचित्र काढीत असत. त्यांच्या काव्यामधील स्त्री-पुरुष अत्यंत शृंगारिक भावनांनी विभोर झालेले आढळतात.
प्रेमी जनांच्या मनातली सूक्ष्म वादळं, हुरहुर आणि ‘तडप’ ते काव्यात मांडत असत. गंमत म्हणजे प्रत्यक्ष शृंगाराच्या वर्णनापेक्षा शृंगार उत्सुक तरुण आणि समर्पण करायला राजी झालेल्या युवती आपल्याला त्यांच्या काव्यात भेटतात. देहबोलीच्या वर्णनावरून या नायक-नायिकेच्या मनातल्या आंदोलनाचे अंदाज आपल्यापुढे ते सादर करतात. त्यामुळे हा शृंगार आभास निर्माण करतो. तीन मनांचा विलक्षण खेळ कालिदास खेळतात. काव्य-नाटय़ामधील पात्रांचे मन, त्या नाटय़ काव्याचा अनुभव घेणाऱ्या आस्वादक-रसिकाचं मन आणि या दोन मनानं खेळवणारं त्यांचं स्वत:चं प्रतिभासमृद्ध मन. सगळंच मनभावन आणि विलक्षण.
ऋतुसंहारातील वर्षांऋतूच्या द्वितीय सर्गीमधील पावसामुळे पृथ्वी आणि आकाश यांचा अन्योन्य संबंध, पक्षी आणि पशूंच्या हालचाली आणि प्रेमीजनांचं मिलन-विरहाची धुंदी याचा अत्यंत मनस्वी अनुभव आपण घेतो.
अभीक्षणम् उच्च:ध्वनता पयोमुचा..
स्त्रिय: रागात् प्रयान्ति।।१०।।
या श्लोकात अभिसारिकांचं वर्णन आहे. पावसाळ्यातल्या रात्री आधीच निबिड अंधारमय, ना चंद्र दिसत ना चांदणं, त्यात आकाशातले ढगही काळेकुट्ट. या सर्व अंधकारमय वातावरणात वावरणारी अभिसारिका इतकी प्रणयोत्सुक होते की तिला आकाशातल्या गडगडाटाची भीती वाटत नाही. गडगडाट पुन: पुन्हा झाला तरी त्यांचं मन डगमगत नाही. उलट आभाळात (अधूनमधून) चमकणाऱ्या विजेच्या लखलखाटात त्या वाटा शोधतात. अनुरागाने भावुक आणि मीलनोत्सुक झालेल्या अभिसारिका (आधी निश्चित केलेल्या) संकेतस्थळी लगबगीने जाताना दिसतात.
प्रेमातुर आणि कामातुर झालेल्या स्त्रियांना कसं भान राहात नाही. यांचं वर्णन कालिदास करतात आणि मनाचे कंगोरे नकळत स्पष्ट दाखवतात.
अभिसारिकेनं स्वत:चं आणि जनलज्जेचं भान सोडलेलं असल्याचं खुसखुशीतपणे दाखवून पुढच्या श्लोकात ते स्त्रीस्वभावाचं आणखी एक वैशिष्टय़ दाखवतात.
भीमगंभीरनि:स्वनै: पयाधरै: निरंतरम्।। ११।।
कालिदास म्हणतात, वर्षांऋतूच्या रात्री मेघगर्जना करीत पाऊस कोसळतो, तेव्हा त्या भीमकाय आवाजाने स्त्रिया घाबरतात. त्यांची हृदयं धडधडतात आणि त्या उद्विग्न होतात. तेवढय़ात विद्युल्लेखा चमकून जाते आणि शय्येवरचा अपराधी (बेवफा) प्रियकर त्यांना दिसतो. त्या आपला रुसवा आणि मानभावीपणा सोडून त्याला बिलगतात. जणू काही अखंड जलधारांमध्ये त्यांचा कृतक कोप वाहून जातो आणि प्रियकरानं अनुनय न करताच त्याला त्या मिठीत घेतात..
इकडे कालिदासांच्या या विलक्षण वर्णनांनी आपण फक्त अवाक् होतो!
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – कागदाच्या पानावरील खाद्य.. विचारशक्तीचे!
‘‘माझी मासिकाकडे पाहण्याची दृष्टी केवळ साहित्यिकाची नव्हती. माझा मराठी साहित्याशी अगदी बेताचा संबंध होता. मात्र एखाद्या मासिकामुळे ज्याप्रमाणे वाचकाचे मनोरंजन करता येते, त्याचप्रमाणे त्यांच्या विचारशक्तीला जोमदार करणारे खाद्यही पुरवता येते हे मी चांगले ओळखून होतो. या खाद्याची समाजाला फार जरूर आहे असेही मला वरचेवर वाटे. त्यामुळे आमच्या मासिकासाठी हेच ध्येय समोर ठेवण्याचा माझा विचार व्हावा हे साहजिकच होते. मला राजकारणाचे फारसे आकर्षण नसे. आपल्या देशाचे गमावलेले स्वातंत्र्य परत मिळाले पाहिजे असेही मला तीव्रतेने वाटत होते. देशात सुरू असलेल्या चळवळीकडे मी त्या भावनेने पाहत असे..एखाद्या आजारी माणसाची मलेरियाच्या तावडीतून सुटका करताना त्याला या आजाराची बाधा करणार्या डासांच्या डबक्यांचाही बंदोबस्त व्हावयास नको का? त्याचप्रमाणे आमची राजकीय गुलामगिरी ही आम्ही स्वतवर लादलेल्या मानसिक गुलामगिरीबद्दल मिळालेले प्रायश्चित्त आहे हे आम्ही जाणून घेणे जरूर आहे. पण या गुलामगिरीवर कोणीच कसे हत्यार उचलित नाही? तो प्रयत्न आपण करायला काय हरकत आहे? – अशी माझी विचारसरणी होती.’’ शंकरराव किल्रेस्कर यांनी १९१६ मध्ये ‘किर्लोस्कर खबर’ हे मासिक सुरू केले त्या वेळी संपादनाविषयी त्यांनी लिहिले आहे – ‘‘मासिकाच्या संपादनाची खुबी मी हेरली ती अशी, की हे काम व भेजन वाढणाऱ्या गृहिणीचे काम यात विशेष अंतर नाही. एक कागदाचे पान तर दुसरे केळीचे. दोन्हीवर निरनिराळ्या रुचींचे व रसांचे साहित्य व चटण्या-कोशिंबिरी वाढायच्या असतात; पण त्यांची जागा व प्रमाण ठरावीक पाहिजे. रोजच्या भात-भाजीच्या जोडीला एक पक्वान्न हवे. आणि हे सर्व पदार्थ अगदी ताजेतवाने, गरमागरम पाहिजेत. भोजनाने पोट व मन तर भरलेच पाहिजे; पण ते आरोग्याला हितकारक ठरले पाहिजे. आणि या पानाभोवती सुंदर रांगोळी असली आणि हवेत उदबत्तीचा घमघमाटही सुटला असला, तर कोणीही भोजनभाऊ मिटक्या मारीतच त्यावर हात मारणार!’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2014 12:19 pm

Web Title: use of sulfur
टॅग Navneet
Next Stories
1 कुतूहल: रासायनिक उद्योगांचा कच्चा माल
2 कुतूहल: औद्योगिक क्षेत्रात मिठाचा वापर
3 कुतूहल: रासायनिक उद्योगांचा कच्चा माल
Just Now!
X