पॅलॅडिअम हे फार क्वचित चच्रेत असलेले मूलद्रव्य असून त्याची ज्ञाती जनसामान्यात विशेष नाही. पॅलॅडिअम या मूलद्रव्याचा शोध १८०३ साली लंडनमध्ये इंग्रज संशोधक विल्यम वॉलस्टन यांनी लावला. पॅलॅडिअम हे नाव त्या काळी नुकत्याच शोध लागलेल्या लघू ग्रह पल्लास यावरून ठेवले गेले. त्याआधी इ. स. १७०० मध्ये ब्राझीलच्या खाणीत एक धातू सापडला होता, त्याला ‘ओरो पोड्रे’ हे नाव दिले होते. या पोर्तुगीज भाषेतील शब्दाचा अर्थ निरुपयोगी सोने असा होतो. हा धातू म्हणजे सोने आणि पॅलॅडिअमचे संमिश्र होते. सध्या व्हाइट गोल्ड (सफेद सोने) वापरण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. व्हाइट गोल्ड हे संमिश्र करताना काही वेळा सोन्याबरोबर पॅलॅडिअम मिसळतात.

पॅलॅडिअम हा धातू प्लॅटिनमसारखा मऊ व चांदीसारखा चमकणारा आहे. याचा वितळणिबदू १५५५ अंश सेल्सिअस व घनता पाण्यापेक्षा बारा पट जास्त आहे. हा धातू बहुतांश सोन्याच्या खाणीत मिश्रधातू रूपात सापडतो. पॅलॅडिअमची नैसर्गिक उपलब्धता रशिया, दक्षिण आफ्रिका, कॅनडा आणि उत्तर अमेरिका या देशांमध्ये आहे. या मौल्यवान धातूची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत प्रत्येक किलोग्रॅमला ३६००० डॉलर म्हणजे जवळपास किलोचे २२ लाख रुपये इतकी आहे. त्याचा चमकदारपणा, तन्यता, वर्धनीयता यांचा उपयोग १९३० पासून दागिने बनविण्यासाठी होऊ लागला. पॅलॅडिअम शल्यचिकित्सेची अवजारे तसेच दंतवैद्यकशास्त्रात; जसे दातातील पोकळी भरणे यासाठी वापरला जातो. अर्ध्याहून अधिक पॅलॅडिअम हा वाहनांच्या उत्प्रेरक परिवर्तकामध्ये वापरला जातो. उत्प्रेरक परिवर्तकामध्ये विषारी वायूंवर नियंत्रण ठेवता येते.

पॅलॅडिअमचा उपयोग रसायनशास्त्रात उत्प्रेरक म्हणून केला जातो. रंग व औषधे बनवण्याच्या प्रक्रियेत निर्माण होणारी उप-उत्पादने ही पर्यावरणाला हानीकारक आहेत. याला पर्याय म्हणून पॅलॅडिअम हा उत्प्रेरक वापरला जाऊ लागला. या प्रक्रियेत ०.१ ते ०.५ टक्के पॅलॅडिअम कार्बनमध्ये मिसळून अभिक्रिया केल्या जातात. तेच उत्प्रेरक १०-२० वेळा वापरले जाऊ शकते व त्यानंतर या उत्प्रेरकावर प्रक्रिया करून ते परत मिळवले जाऊ शकते. या प्रक्रियेत फक्त १० टक्के पॅलॅडिअम वाया जाते. अशा रीतीने पॅलॅडिअम हे आर्थिकदृष्टय़ा किफायतशीर आहे आणि त्याच्या वापरामुळे पर्यावरणाला आपण ऱ्हास होण्यापासून वाचवू शकतो. संगणक, मोबाइलमध्ये वापरण्यात येणाऱ्या सिरॅमिक कपॅसिटर्समध्ये (संधारित्रामध्ये) पॅलॅडिअमचा वापर केला जातो.

क्रांती आठल्ये

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org