शेतकरी शेतात राबतो, पण आपल्या शेतमालाची किंमत तो कधीच ठरवू शकत नाही. शेतीसाठी ज्या निविष्ठा तो खरेदी करतो, त्यांच्या किमतीवरदेखील त्याचं नियंत्रण नाही. यामुळे बऱ्याचदा पिकाचा उत्पादनखर्च बाजारात ठरलेल्या त्याच्या विक्री-किमतीपेक्षा जास्त होतो. म्हणजे शेती करून शेतकऱ्याला नफा मिळण्याऐवजी तोटाच होतो.
जॉर्ज वॉशिंग्टन काव्‍‌र्हर या आफ्रिकी वंशाच्या अमेरिकन शास्त्रज्ञाने यावर उपाय म्हणून मोलवृद्धी (व्हॅल्यू अ‍ॅडिशन) हा प्रकार शोधून काढला. पिकाची विक्री करण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करून विविध अन्नपदार्थ बनवले आणि ते विकले, तर त्यातून जास्त नफा मिळतो, हे या मोलवृद्धीचे तत्त्व. अमेरिकेतील अलाबामा येथील आफ्रिकीवंशीयांच्या वस्तीतील शेतकऱ्यांना त्यांनी शेंगदाण्यापासून दूध, दही, चीज, क्रीम, कँडी, रंग, पॉलिश असे जवळपास ३०० पदार्थ बनविण्याची पद्धत आणि त्यातून पिकांची मोलवृद्धी शिकवली.
इंदूर येथील आमच्या रंगवासा जैविक ग्राम संस्थेत आम्ही काव्‍‌र्हरने शिकविलेले अनेक प्रयोग केले. घरात वापरतो त्या मिक्सरमध्ये भाजलेले खारे दाणे घातले व त्यापासून पीनट बटर तयार केले. इंदूरच्या बाजारात अमेरिकेतील पीनट बटर ५०० रु. किलोने विकले जाते. इंदूरमध्ये शेंगदाण्याचा भाव ८० ते १०० रुपये किलो इतका आहे. म्हणजे, पीनट बटर घरच्याघरी बनवून शेतकऱ्यांनी विकले तर त्याला तीन ते चार पट फायदा मिळू शकेल. इंदूरच्या पब्लिक स्कूलमध्ये पीनट बटरला भरपूर मागणी आहे.
लाल अंबाडी हे पीकसुद्धा मोलवृद्धीसाठी उपयुक्त आहे. मागच्या वर्षी जुलमध्ये आम्ही अंबाडीचे बियाणे पेरले. नोव्हेंबरमध्ये पिकाची कापणी केली. त्याच्या फुलापासून चहा, चटणी, जॅम, जेली, कँडी व शीतपेय बनविले. त्याच्या पेराला ठेचून पाण्यात चार दिवस ठेवले व त्यातून वेताच्या दोरखंडासारखा दोर तयार केला. पालक, मेथी व पुदिना यांची पाने उन्हात वाळवून, त्याची भुकटी बनवून बाजारात विकली. त्याला पिकाच्या दहापट किंमत मिळाली. या व्यवहारात पीनट बटरची प्रक्रिया सोडल्यास कुठेही विजेचा खर्च आला नाही. थोडक्यात, या सर्व पिकांची मोलवृद्धी केल्यास ग्रामोद्योगाला चालना मिळेल, हे नक्की!

जे देखे रवी.. – ज्ञानेश्वर
माझ्या आयुष्यातल्या इतर सगळ्या आनंद देऊन गेलेल्या गोष्टी एकत्र केल्या तरी त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आनंद देणारी गोष्ट होती. ज्ञानेश्वरांचे वाचणे. मी ऊर्जायुक्त, आक्रमक, थोडा फार भडक, जिज्ञासू आणि म्हणून संशयी, एककल्ली आग्रही/ रजोगुणी लटपटय़ा आणि उलाढाल्या करणारा माणूस आहे. त्याचा तपशील पुढे येईलच. माझ्या कुंडलीत चंद्र वृश्चिक राशीत आहे आणि जन्माच्या वेळेचा सकाळचा सूर्य सिंह राशीतला. या दोन्ही प्राण्यांमध्ये मार्दवतेचा अभाव आहे. शेवटी प्राण्यांची उदाहरणे द्यायची तर वाघ त्याचे पट्टे बदलू शकत नाही आणि नाग फणा काढणारच. वाघाला रक्ताची चटक लागू नये आणि नागाने डूक धरून दंशाचा हैदोस घालू नये एवढीच अपेक्षा ठेवता येते. म्हणूनच माझ्यासारखा माणूस ज्ञानेश्वरी वाचून संतत्वाला पोहोचेल, असा संभव नव्हताच. माझ्या स्वभावात काही थोरपणा प्रकट झाला नाही; परंतु माझी अवनति टळल्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘शिणवी ते व्यसन कैसे’ अशा अर्थाची ज्ञानेश्वरांची रचना आहे. इथे व्यसन म्हणजे आवड किंवा सवय असा अर्थ नाही. ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे माझ्या मनातला शीण फार लोपला. ज्ञानेश्वरी ही गोष्ट आवड किंवा सवयीच्या पलीकडची पायरी आहे. माझ्यासारखा आक्रमक माणूस मानी असतो. गर्विष्ठ नसेलही कदाचित. पण मान ताठ ठेवणे हे आक्रमक माणसाचे लक्षण असते. ज्ञानेश्वरांनी माझ्याशी एकांतात ज्या गुजगोष्टी केल्या त्यात मानीपणाच्या विरुद्ध अमानित्वाचे जे वर्णन केले आहे ते खाली उतरवितो. ते वाचल्यामुळे अवनति टळली असणार.
हृदयात उमटलेल्या ज्ञानाने। देहात उमटतात जी चिन्हे।
ती मी आता सांगतो। ती ऐकणे.
कोणाशीही नको बरोबरी। मानसन्मान ज्याला होतात भारी।
त्याचे गुणगान जर गाईले। किंवा त्याला मान देऊ म्हटले।
प्रतिष्ठेचे वजन त्याला बिलगले। तर जसा वाघाने कोंडी करावा हरिण।
किंवा भोवऱ्यात अडकला। बाहुबली तरुण।।
तसा अवघडतो। भांबावतो। आणि प्रतिष्ठा करतो। बाजूला।।
खरे तर वाचस्पति।। सर्वज्ञता त्याच्या अंगी।
पण गौरवांच्या धाकाने। घुसतो पांघरूणी।
माझे अस्तित्व नाहीसे होवो। नामरूप लोपले जावो।
प्राणिमात्रांना वाटेल भीती। असा मी नको।।
असली चिन्हे। म्हणजे ज्ञानाचे मळवट। त्या मळवटाचे नाव। अमानित्व।।
योगायोग असा की, एका माझ्या मित्राच्या ज्याला या ओव्या तंतोतंत लागू पडल्या असत्या त्याच्या शोक सभेला हा लेख संपल्यावर मी जाणार आहे त्याच्याबद्दल पुढच्या लेखात.
– रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
uran marathi news, uran farmers marathi news, mangroves uran marathi news
उरणच्या शेती, मिठागरांत समुद्राचे पाणी; खारफुटीमुळे शेतकऱ्यांवर जमिनींचा मालकी हक्क गमावण्याची वेळ
Income tax now on loans overdue for more than 45 days of business
उधारीच्या नव्या नियमाने वस्त्रोद्योगाचे धागे विस्कटले ! ४५ दिवसांहून अधिक काळ थकलेल्या उधारीवर आता प्राप्तिकर

वॉर अँड पीस  – कृशता
पांडु या विकारात जगभर विविध नावांनी ‘आयर्न टॅबलेट’ देण्या-घेण्याची प्रथा आहे. तसेच बहुतेक आधुनिक विज्ञान चिकित्सक यासोबत कॅल्शियमच्या गोळ्यांचा मारा करतात. मी सर्वसामान्य पांडुग्रस्त रुग्णांशी मूलभुत कारणांच्या निवारणाकरिता व शरीरात दर क्षणाला उत्तम रक्त तयार व्हावे; या करता सुसंवाद करू इच्छितो. आयुर्वेदात रुग्णाची अष्टविध परीक्षा आहे. व्यक्तीची प्रकृती, कुठे बिघाड,  प्रदेश व हवामान,आहारविहार, व्यवसाय, निद्रा, कमी अधिक सवयी, व्यसन असा सार्वत्रिक विचार करायला लागतो.
सामान्यपणे सर्व तऱ्हेच्या पांडुविकारात सुवर्णमाक्षिकादि वटी, चंद्रप्रभा, शृंग भस्म प्र. ३ गोळ्या दोन वेळा व आस्कंद चूर्ण पुरेसे आहे. पांडुतेमुळे चक्कर, तोल जात असल्यास लघुसूतशेखर, चंद्रकला, सुवर्णमाक्षिकादि, लक्षादि, गोक्षुरादि प्र. ३ गोळ्या दोन वेळा; कृश रुग्णास अश्वगंधारिष्ट, भूक नसल्यास कुमारी आसव, संडास चिकट असल्यास फलत्रिकादि काढा जेवणानंतर ४ चमचे पाण्यासह घ्यावा.
हृद्रोग, धाप, दम लागणे, हार्ट ब्लॉक असताना सुवर्ण माक्षिकादि, शृंग, लाक्षादि, अभ्रक मिश्रण, गोक्षुरादि प्र. ३ दोन वेळा; भोजनोत्तर अर्जुनारिष्ट वा राजकषाय द्यावा. विटाळ खूप जात असल्यामुळे पांडुता असल्यास प्रवाळ, कामदुधा शतावरी घृतासह द्याव्या. शतावरी चूर्णाची लापशी प्यावी. पांडुतेमुळे  पाळी अनियमित वा अल्प असल्यास कन्यालोहादि, कठपुतली, चंद्रप्रभा, गोक्षुरादि, त्रिफळा गुग्गुळ; कुमारी आसव, आर्तव क्वाथ तारतम्याने योजावे.
पांडुता खूप असल्यास पुष्टीवटी २ गोळ्या; बुहतवातचिंतामणी १, लक्ष्मीविलास २ गोळ्या गोरखचिंचावलेहासह योजाव्या. पांडुता दीर्घकाळ असल्यास तारतम्याने च्यवनप्राश, धात्रीरसायन, अश्वगंधापाक, कुष्मांडपाक, शतावरी कल्प यांची योजना करावी, पोटदुखी, अरुचि असल्यास भोजनोत्तर प्रवाळपंचामृत, अम्लपित्त टॅबलेट; संग्रहणी विकारात दाडीमावलेह; शरीरात रुक्षता असल्यास शतावरी घृत, लाक्षादि घृत, द्राक्षादि घृत योजावे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – ८ एप्रिल  
१८४४>‘विविधज्ञानविस्तार’  या नियतकालिकाचे मालक-संपादक पुरुषोत्तम गोविंद नाडकर्णी यांचा जन्म.
१९२४ > कुमारगंधर्व म्हणजेच शिवपुत्र सिद्धरामय्या यांचा जन्म. शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत असा भेद न मानता त्यांनी अभिजात संगीताची निर्मिती केली.. त्यांनी लिहिलेला ‘अनूपरागविलास’ हा मराठी ग्रंथ त्यांच्या हयातीत प्रसिद्ध झाला होता.
१९२८ > ‘स्वामी’कार रणजित देसाई यांचा जन्म. श्रीमान योगी, पावनखिंड, राजा रविवर्मा, माझा गाव व सर्वाधिक गाजलेली स्वामी या कादंबऱ्यांतून इतिहास-कल्पिताचा गोफ त्यांनी रचला. गरुडझेप, रामशास्त्री, हे बंध रेशमाचे ही नाटके, जाग, गंधाली हे कथासंग्रह, स्नेहधारा आणि मी एक प्रेक्षक हे लेखसंग्रह आणि काही चित्रपटांच्या पटकथा असे त्यांचे लेखन होते.
१९९८ > महानुभाव पंथाचे गाढे अभ्यासक, साहित्यिक, समीक्षक व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू विष्णू भिकाजी कोलते यांचे निधन. तेराव्या शतकातील सांकेतिक लिपीतून महानुभावांचे एकादशस्कंध, वछहरण, स्थानपोथी आदी ग्रंथ त्यांनी मराठीत आणले. लीळाचरित्राचेही पुस्तक निघाले, पण प्रसृत झाले नाही. ‘प्राचीन विदर्भ व आजचे नागपूर’ या ग्रंथातून त्यांचा इतिहासाभ्यासक पैलू दिसला.
– संजय वझरेकर