आपली पृथ्वी ही अनेक मूलद्रव्यांची बनलेली आहे. मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन्सच्या मांडणीनुसार त्या मूलद्रव्यावर किंवा त्याच्या संयुगावर प्रकाश पडल्यास विशिष्ट प्रकाशलहरी शोषून उरलेल्या परावर्तित करण्यातून ही मूलद्रव्ये व संयुगे वेगवेगळे रंग दाखवू लागली. ३ या कक्षेतील इलेक्ट्रॉन्सच्या संख्येनुसार संयुगांचे रंग बदलत होते. यावरून संक्रामक मूलद्रव्यांच्या रांगेचा उदय झाला आणि अशा दहा दहा मूलद्रव्यांच्या तीन रांगा आवर्तसारणीत मांडल्या गेल्या.

यातील पहिल्या रांगेतील तिसऱ्या क्रमांकाचे मूलद्रव्य व्हॅनॅडिअम! याचा जन्मच मुळी चुकीच्या नावावर झाला. १८०१ मध्ये अ‍ॅड्रेस मॅन्युएल डेल रिओ ह्य़ाने हे विलग केले, पण त्याला ते क्रोमिअमच वाटले.  नंतर १८३० मध्ये  स्विडिश शास्त्रज्ञ, नील्स सेल्फस्ट्रॉमने ते वेगळे मूलद्रव्य असल्याचे सांगितले. शेवटी १८६७ मध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञ सर हेन्री रॉस्कोने ते वेगळे मूलद्रव्य आहे असे घोषित करून त्याच्या संयुगाच्या – व्हॅनॅडाइटच्या आकर्षक लाल रंगामुळे त्याचे नाव व्हॅनॅडिअम ठेवले. अशा ह्य़ा मूलद्रव्याचा अणुक्रमांक २३ आणि ५१ अणुभार! पाणी व हवेपासून स्वतचे संरक्षण करणारा हा धातू, लोखंडाशी एकत्र होऊन अतिशय मजबूत संमिश्र तयार करतो. याचा वापर चक्क दातात भरण्याच्या धातूपासून सायकल, चार चाकी वाहनांचे सांगाडे ते जेट विमानाच्या इंजिनापर्यंत केला जातो. उत्तम घर्षणक्षमता असल्यामुळे अति उच्च वेगाच्या इंजिन्समध्ये याचा भरपूर वापर होतो.

व्हॅनॅडिअम आणि गॅलियम एकत्रित करून सुपर कंडक्टिंग चुंबकामध्ये वापरले जात आहे.  सिरॅमिकमध्ये रंग आणण्याकरिता व्हॅनॅडिअमचा वापर होतो. त्याच्या वेगवेगळया ऑक्सिडेशन अवस्थांमुळे जांभळा, हिरवा, निळा, पिवळा अशी विविध रंगांची संयुगे बनतात.

मधुमेहावर गुणकारी ठरल्यामुळे, त्याच्यावर बरेच संशोधन चालू आहे. तसेच क्षय, रक्ताची कमी यामध्येही हा धातू उपयोगी असल्याचे आढळले आहे. हृदय, मूत्रिपड, यकृत व मज्जासंस्थेवर त्याचे दुष्परिणामही होतात. व्हॅनॅडिअम पेंटॉक्साइडच्या वाफांनी डोळे, त्वचा, श्वसनावर वाईट परिणाम दिसून आले आहेत. आपल्या जेवणातील अळंबी, मिरी, पार्सली, तिसऱ्या यांमध्ये व्हॅनॅडिअम आढळते. चीनमध्ये बॅटरीज बनविण्यासाठी याचा वापर फारच वाढल्यामुळे जगातील बाजारात गेल्या दोन वर्षांत व्हॅनॅडिअम धातूची किंमत चक्क तिपटीने वाढली आहे.

– डॉ. कविता रेगे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org