01 October 2020

News Flash

कुतूहल – फळांपासून विविध पेये- १

फळांपासून तयार केल्या जाणाऱ्या प्रक्रियायुक्त पदार्थामध्ये पेयांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा पेयांचे आहारमूल्यसुद्धा चांगले असते.

| December 13, 2013 12:51 pm

फळांपासून तयार केल्या जाणाऱ्या प्रक्रियायुक्त पदार्थामध्ये पेयांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा पेयांचे आहारमूल्यसुद्धा चांगले असते. फळांच्या रसापासून सरबते, स्क्वॅश, सिरप, कॉíडयल, भुकटी इत्यादी वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात.
फळांचा अमादक रस हा फळांच्या मूळ स्वरूपातील नसíगक रस असून तो तसाच मूळ स्वरूपात टिकवतात. या रसामध्ये पाणी मिसळून, बदल करूनही पेय म्हणून त्याचा आस्वाद घेता येतो.
स्क्वॅश हे मलमलच्या कापडातून गाळलेल्या रसापासून, गोडीसाठी साखर मिसळून तयार करतात. या पेयात फळांच्या रसाबरोबरच फळांचा गरसुद्धा काही प्रमाणात मिसळतात. उदा. आंबा, संत्रा, लिंबू, अननस यांचे स्क्वॅश.
कॉíडयल हे पेय फळांच्या रसातील संपूर्ण गराचे कण वेगळे करून गरविरहित रसापासून तयार करतात व त्यात गोडीसाठी थोडी साखर मिसळतात. उदा. लिंबू रसाचे कॉíडयल.
क्रश या प्रकारच्या पेयामध्ये फळरसाचे प्रमाण २५ टक्के असते. फळांच्या रसात दीडपट ते दुप्पट प्रमाणात साखर आणि दीड-दोन टक्के सायट्रिक आम्ल मिसळून तयार केलेले एक संपृक्त पेय म्हणजे सिरप. या पेयात १:४ किंवा १:५ या प्रमाणात थंड पाणी मिसळून त्याचा आस्वाद घेतला जातो. उदा. फणस, जाभूळ, करवंद यांचे सिरप. कृत्रिम सुगंध आणि दीड-दोन टक्के सायट्रिक आम्ल वापरून केलेला तिनतारी साखरेचा पाक म्हणजे कृत्रिम सिरप. उदा. चंदन सिरप, गुलाब सिरप.
फळांच्या रसातील पाण्याचा अंश उष्णता देऊन किंवा शीतकरण पद्धतीने कमी करून संपृक्त पेय बनवतात. कार्बन डायॉक्साईड वायू वापरून या संपृक्त पेयापासून इतर पेये बनवली जातात.
फळांच्या रसातील किंवा गरातील पाण्याचा अंश कमी करून फळांच्या रसाची भुकटी मिळवतात. ही भुकटी बंद न करता उघडय़ावर ठेवल्यास हवेतील दमटपणामुळे ती लगेच ओलसर होते. म्हणून ती निर्वात डब्यात/ पिशवीत साठवून ठेवतात. गोठवून वाळवलेल्या फळरसाच्या भुकटीपासून उत्कृष्ट पेय तयार करता येते.
– डॉ. विष्णू गरंडे (कोल्हापूर) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..       रुद्र, शिव, शैव, शक्ति, पार्वती..
मराठीतील रौद्रस्वरूप हा शब्द रुद्र या देवतेपासून आला. रौद्ररस भाषेत वापरला जातो तेव्हा काहीतरी भयंकर दाखवले जाते. ज्याची भीती वाटते किंवा जो काहीतरी भयंकर करतो तो रुद्र आणि त्याची आळवणी रुद्रोपासना आणि ही उपासना ऋग्वेदातही सापडते. ऋग्वेदातही म्हणण्याचे कारण हा वेद उत्तरपश्चिमेकडचा. ह्य़ा रुद्राचे समांतर व्यक्तिमत्त्व म्हणजे शंकर तिसरा डोळा उघडून कामदेवाचा नाश करणारा, हलाहल विष पचवणारा, डोक्यावर गंगा उतरवणारा. हे व्यक्तिमत्त्व उत्तर पूर्वेकडचे हिमालयाच्या पायथ्याजवळचे किंवा पूर्व देशामधल्या घनदाट अरण्यातले.
स्वत:हून तपश्चर्या करून झालेली याची बायको म्हणजे हिमालयाची मुलगी पार्वती. ही तेजस्वी, श्रीमंत पण या भस्म लावणाऱ्या आणि जनावराची कातडी पांघरणाऱ्या शीघ्रकोपी पण शुद्धस्वच्छ माणसाच्या प्रेमात पडली अशी कथा. अंघोळ करताना स्वत:च्या त्वचेच्या मळातून हिने मुलगा निर्माण केला आणि संरक्षणाला बसवला तर भूलचुकीने शंकराने त्याचे मुंडकेच उडवले म्हणून मग हत्तीचे लावले तो गणपती.
गणपतीवर पूर्वेकडच्या अथर्ववेदात एक गाणे रचले आहे. ज्ञानेश्वर ज्या नाथसंप्रदायले त्यातला नाथ म्हणजे हा शिव (आणि हा नाथ संप्रदाय) म्हणूनच ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्याच ओवीत देवा तूचि गणेशु हा उल्लेख श्रीकृष्णाच्या आधीच येतो. ही मंडळी गुरूला मानणारी, यांची परंपरा गुरूवर अवलंबून (वडिलांवर नव्हे) आणि योगाभ्यासातून मुक्तता मिळवणारी म्हणून ज्ञानेश्वरी. निवृत्तिनाथ (गुरू) आणि योगावरच्या अनेक उताऱ्यांनी ओतप्रोत भरली आहे.
मुळात हा संप्रदाय द्वैती. देव निराळा आपण वेगळे असे म्हणणारा, पण पुढे अद्वैती झाला,  तेव्हा शिव (शंकर) आणि पार्वती (शक्ति) ही दोघे एकमेकांची पूरक रूपे आहेत, एकत्रच आहेत. शिव शक्तीमार्फत हे जग प्रसवत: असला तरी तो शक्तिशिवाय अर्थहीन आहे आणि ही शक्ति शिवाशिवाय अस्तित्वहीन आहे अशा मताचा बनला.
या सिद्धान्तावर आधारित ज्ञानेश्वरांनी पुढे अमृतानुभव लिहिले, पण ग्यानबाची मेख अशी की त्यांनी आधी गीतेवर एक विलोभनीय आख्यान सांगितले ती ज्ञानेश्वरी. गीता हा ग्रंथ वैष्णवी आहे. त्यातले युद्ध हे शहरांमधले आहे. रानावनातले नव्हे. इथे अर्थशास्त्राचा उगम झाला आहे आणि माणसे आधुनिक व्यवहारात गुंतलेली आहेत हे महत्त्वाचे.
तू आधी गीतेवर आख्यान दे, हा निवृत्तिनाथांचा आदेश ज्ञानेश्वरांनी तंतोतंत आणि अभूतपूर्व अशा तऱ्हेने पाळला. कारण व्यवहार आणि संसार आणि तत्त्वज्ञान याचा मेळ घालण्याची तत्कालीन गरज.
उद्या या वैष्णवांबद्दल.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस  – लठ्ठपणा : शरीर सौंदर्याकरिता अडथळा
तेरा वर्षांपूर्वी संपलेल्या विसाव्या शतकात स्थौल्य, मधुमेह, हृदयरोग, रक्तदाबवृद्धी हे वृद्धापकाळाचे आजार होते. पण या एकविसाव्या शतकात फाजील स्थौल्यामुळे तरुण पिढीला ऐन विशी- पंचविशीत अनेकानेक रोगांचा सामना करावा लागत आहे. या तरुण वयात ‘तरुणाईला’ आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्याची खूप खूप काळजी असते.  हा काळ ‘प्रथम तुज पाहता!’ असे बघता क्षणी प्रेम जडण्याचा असतो. पण अशा ऐन जवानीला जर फाजील लठ्ठपणाची बाधा झाली, तर  चेहराही खूप निबर, राठ व अनाकर्षक होतो. चेहऱ्यावर मुरुमासारखे फोड येतात. हे मुरुम किंवा मुखदूषिका म्हणजे खरा रोग नसतो. मूळ रोग फाजील चरबी असते. तारुण्यपीटिका हे शरीरातील फाजील चरबीचे दर्शन. चेहरा नितळ, आकर्षक असणे, हे निरोगी शरीराचे एक व्यवच्छेदक लक्षण आहे.
अनेकानेक केसांच्या विकारांनीसुद्धा आजची ‘तरुणाई’ फार हैराण असते. केस गळणे, केस पांढरे होणे, केसात कोंडा, खपल्या होणे,  खाज सुटणे, अकाली टक्कल या सगळ्यांमागचे प्रमुख कारण फाजील चरबी हेच असते. चेहऱ्याव्यतिरिक्त खांदे, दोन्ही हात, गळा काळा असणे हे सुद्धा सौंदर्याला बाधक आहे. फाजील चरबी हे प्रमुख कारण चेहरा, केसांचे विकार, शरीर काळवंडणे यामागची पाश्र्वभूमी तयार करते. फाजील चरबी टाळणे तुमच्या-आमच्या हातात आहे. त्याला पैसे पडत नाहीत.
 शरीरातील फाजील चरबी निर्मितीच्या मागे चार घटक आहेत. अकारण मिठाचा फाजील वापर, खूप तेलकट, तुपकट, शिळे, आंबवलेले पदार्थ, गारगार पदार्थ व व्यायामाचा अभाव. ही चार कारणे टाळावीत. भात, गहू याऐवजी ज्वारीचा वापर, बटाटा, रताळे सोडून सर्व उकडलेल्या, बिनमिठाच्या भाज्या, पालेभाज्या, घाम निघेल असे गरम पाणी. चेहऱ्याला लावण्याकरिता दशांगलेप, सुवर्णमुखी चूर्ण, केस धुण्याकरिता केश्यचूर्ण, आकर्षक त्वचेकरिता शतधौतघृत या बाह्योपचारांबरोबर प्रवाळ, कामदुधा, चंदनादि, उपळसरीचूर्ण, मौक्तिकभस्म यांची योजना करावी.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – १३ डिसेंबर
१९२०> तत्त्वज्ञानविषयक ग्रंथाचे कर्ते श्रीनिवास हरी दीक्षित यांचा जन्म. भारतीय तत्त्वज्ञान नीतिमीमांसा, तर्कशास्त्र, नैतिक आणि सामाजिक तत्त्वज्ञान आणि ग्रंथ प्रसिद्ध.
१९२४> ख्यातनाम साहित्यिक डॉ. विद्याधर गंगाधर पुंडलिक यांचा जन्म.  टेकडीवरचे पीस, देवचाफा, माळ, फॅन्टॅसिया हे कथासंग्रसह, चक्र व चौफुला हे एकांकिका संग्रह, चार्वाक, माता द्रौपदी, कुणीकडून कुणीकडे ही नाटके तसेच आवडलेली माणसे (व्यक्तिचित्रे) आणि शाश्वताचे रंग (समीक्षात्मक) ही त्यांची साहित्यसंपदा.  १९८९ मध्ये ते निवर्तले.
१९२८> चतुरस्र लेखिका सरिता मंगेश पदकी यांचा जन्म. चैत्रपुष्प (काव्यसंग्रह)  बारा रामाचे देऊळ, घुम्मट (कथासंग्रह) बाधा, खून पाहावा करून, सीता (नाटके) व ब्राझीलच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या करोलिना मारिया डि जीझस यांच्या आत्मनिवेदनाच्या काळोखाची लेख  या अनुवादासह चार अनुवादित पुस्तके व भरपूर बालसाहित्य त्यांच्या नावावर आहे.
१९६९> कथाकार, नाटककार नरहर गणेश कमतनुरकर यांचे निधन. रेसच्या नादाच्या दुष्परिमाणांवरील श्री या नाटकासह चार नाटके,  तीन कथासंग्रह  व मराठय़ांची मुलगी ही ऐतिहासिक कादंबरी त्यांनी लिहिली.
– संजय वझरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2013 12:51 pm

Web Title: variety of drinks from fruit 1
टॅग Navneet,Navnit
Next Stories
1 कुतूहल – प्रक्रियायुक्त पदार्थ आणि परिरक्षक
2 कुतूहल – फळे व भाजीपाला : साठवण
3 कुतूहल – काढणीनंतरचे व्यवस्थापन
Just Now!
X