फळांपासून विविध प्रकारची पेये तयार करण्यासाठी प्रथम त्यांचा रस काढून घ्यावा लागतो. रस काढण्याची पद्धत ही प्रत्येक फळासाठी वेगवेगळी असते. रसाचे प्रमाण जास्त मिळवण्यासाठी काही रसायनांचा उदा. जिलेटिन, केसिन तसेच काही विकरांचा उदा. पेक्टिनॉल, ट्रायझाईम-५० तसेच पेक्टीनेक्स-३ एएक्सएल इत्यादींचा वापर केला जातो. योग्य पद्धतीने काढलेल्या रसाचा टीएसएस व आम्लता विचारात घेऊन त्यामध्ये योग्य प्रमाणात साखर, सायट्रिक आम्ल व पाणी घालून, चांगले ढवळून मलमलच्या कापडातून गाळून घेऊन थंड झाल्यावर आस्वाद घ्यावा. आस्वाद घेताना चवीप्रमाणे मीठ, जिरा पावडर किंवा आल्याचा रस वापरल्यास ती आणखी चविष्ट लागतात.  
दोन भिन्न प्रकारच्या फळांचे रस एकत्र करून तयार केलेल्या पेयाला ‘मिश्र पेय’ म्हणतात. विविध फळांचे रस वापरून आपणास उत्कृष्ट प्रतीचे काबरेनेटेड शीतपेय बनवता येते. यासाठी मूळ रसातील साखर व आम्लता लक्षात घेऊन रसामध्ये साखर, टीएसएस, सायट्रिक आम्ल, केएमएस टाकून त्याचा सिरप बनवून घ्यावा. सिरप बाटलीत भरून काबरेनेशन यंत्राच्या साह्य़ाने कार्बन डायॉक्साइड वायू भरावा व लगेच बाटल्या हवाबंद कराव्यात. नंतर या बाटल्या ७० अंश सेल्सियस तापमानास १५ मिनिटे गरम कराव्यात. थंड झाल्यावर लेबल लावून शीतगृहात ठेवाव्यात. या शीतपेयाच्या बाटल्या दोन ते अडीच महिने टिकतात. हे तयार केलेले शीतपेय बाजारात उपलब्ध असलेल्या इतर काबरेनेटेड शीतपेयांपेक्षा निश्चितपणे आरोग्यवर्धक असते. यासाठी फळरसापासून केलेल्या शीतपेयांचा प्रचार व प्रसार लोकांमध्ये व्हायला हवा.
फळे किंवा फळांचा रस संपूर्णपणे आंबवून मादक पेय तयार करता येते. या मादक पेयात अल्कोहोलचे प्रमाण कमी-जास्त ठेवता येते. उदा. द्राक्ष, करवंद, जांभूळ, डािळब इत्यादी. अल्कोहोलयुक्त फळांच्या रसाला वाइन म्हणतात. आरोग्याच्या दृष्टीने अशा वाइनचा उपयोग काहीजण करतात. अपचन, पोट जड होणे, भूक न लागणे, अशक्तपणा येणे, फुप्फुसाचे विकार, दमा, खोकला, रक्तातील वाढीव कोलेस्टेरॉल अशा विविध व्याधींवर ते उचित प्रमाणात घेतल्यास गुणकारी आहे.
-डॉ. विष्णू गरंडे (कोल्हापूर) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..  –   वैष्णव धर्म= सोपा पेपर
तसा मी श्रद्धाळू नाही. ज्ञानेश्वरीने माझे जीवन वेढले असले तरी मी अजून वारीला जायचा आहे. तुम्ही कुठे तीर्थाला जाऊ नका, आपले कर्म करत राहा असा त्यांचाच संदेश सोयिस्करपणे तंतोतंत पाळला आहे. मी देवळात जाणाऱ्यांपैकी नव्हतो. हल्ली जातो. मागे सुरवतीलाच लिहिले तसे हल्ली तिसरी आणि शेवटची शनीची साडेसाती चालू असल्यामुळे मारुतीची उपासना नव्हे तर त्याचे दर्शन घेतो. काही दिवसांपूर्वी एका संतुष्ट झालेल्या रुग्णाने एक भलीमोठी अक्कलकोट महाराजांची तसबीर दिली आहे. ती कपडय़ाच्या कपाटात उभी केली आहे, म्हणून दररोज दर्शन घडतेच. तसा मी भित्रा नाही. मी खूप सहन करून तगलो आहे. परंतु वैद्यकीय शास्त्रात ज्याप्रमाणे preventive Medicine चा हा प्रकार. मला फारसे सुख लागत नाही, पण आता यापुढे शक्यतोवर दु:ख नको अशा अपेक्षेने या उपाय योजना.
चाणाक्षांच्या हे लक्षात आले असेल की भक्तांचे दोन प्रकार वरच्या लिखाणात संपले. चौकस भक्त हा तिसरा प्रकार. म्हणून हे पृथ:करण. कोकणात एका शंकराच्या देवळात पिंडी तळघरात आहे. तिथे दररोज पुजारी जाऊ शकतो.  public ला वर्षांतून तीनचारदाच जाता येते असे ऐकले. एकंदरच शंकर रागीट, त्याची उपासना अवघड. त्याची मंदिरे डोंगरकपारीत आणि पार्वतीची दुर्गा कालिमाता ही रूपे जरा भयप्रदच. शंकराची पिंडी म्हणजे उघडय़ावर ठेवलेली स्त्री- पुरुषामधली मेख आणि तिथला नंदीबैल हा लैंगिकतेची खूण आहे. विष्णू त्या मानाने सौम्य, मुत्सद्दी, कुटुंबवत्सल आणि जे सगळ्यांना पाहिजे असते ते म्हणजे पैसे त्याची मालकीण लक्ष्मी ह्य़ाची बायको. विष्णूचे रूप समन्वयवादी आहे. त्याचा कित्ता पुढे श्रीकृष्णाने गिरविला. तो म्हणतो मला फळ-फूल-पान काहीही दे नाहीतर पाण्याचा थेंब पुरेल.  श्रीकृष्ण (ज्ञानेश्वरीत) काय म्हणतो ते बघा.
ह्या अभ्यासाला। काही नाही कठीण। ह्यानेच तू। गाठ माझे ठिकाण।।
करू नकोस इंद्रियांचा निग्रह। सोडू नकोस भोग। आपल्या जातीचा अभिमान। टाकू नको।। चालव कुलधर्म। निधीचे अनुपालन। रहा मोकळा। सुखात।।
परंतु मन वाणी शरीराने। जे कर्माचे होते घडणे।
ते ‘मी’ केले म्हणणे। ते टाकणे श्रेयस्कर।
माळ्याने जसे नेले। तसे पाणी आपसूक गेले।
पाण्याला हे असे घडले। हे ठाऊक कोठले।।
वृक्ष किंवा वेली। टाकतात फळे योग्य वेळी।
तशी पडू देत तुझी कर्मे। वेळो वेळी।।
शेवटी सगळे कर्माच्या अनुषंगानेच सांगावे लागते. माणूस म्हटला की कर्म आलेच.विष्णू आणि श्रीकृष्णाच्या रूपातला आपला सखा विठ्ठल त्याबद्दल सोमवारी.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस – गुडघेदुखीकरिता लठ्ठपणाचे ‘योगदान’!
अलीकडे पस्तिशीनंतरच गुडघेदुखीच्या तक्रारी घेऊन; मोठय़ा संख्येने रुग्ण येत असतात. नवीन संशोधनानुसार गुडघेदुखीचे प्रमाण स्त्री-पुरुषांमध्ये ४:१ असे आहे. गुडघेदुखीची लक्षणे : चालताना व पायऱ्या चढ-उतार करताना दुखणे, गुडघ्यातून कटकट आवाज येणे; चढ चढताना दुखणे, पायऱ्या उतरताना जास्त त्रास होणे, सपाटीवर चालताना काही त्रास न होणे, गुडघे दुखत असताना आराम केला तर गुडघेदुखी काही काळ बंद होणे.
या वाढत्या रुग्णसंख्येचा मागोवा घेतला तर असे लक्षात येईल, की स्थूल, लठ्ठ, कंबरेत जास्त वजन असणाऱ्या मंडळींच्यात गुडघेदुखी लवकर सुरू होते. उंचीच्या मानाने शरीराचे वजन वाढले, तर सर्व शरीराचा भार गुडघ्यावर येतो. गुडघ्याच्या हाडांमध्ये कूर्चा-गादी असते. वाढत्या वजनामुळे व वयानुसार ही गादी घासली जाते. गुडघ्यातून कटकट आवाज येतो. जिना उतरताना ज्यांना जास्त त्रास होतो, त्यांच्या गुडघ्यातील वंगण कमी झालेले असते. अशी स्थूल मंडळी वर्षांनुवर्षे उभ्याने काम करत असतात. चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी  विविध शारीरिक कामे, महिलावर्ग ‘कंबरेत वाकूनच’ करत असत. आता मात्र स्वयंपाक घरातील उभ्या ओटय़ामुळे महिलांच्या गुडघ्याच्या वाढत्या तक्रारी ही ‘गुडघे बदल’वाल्या हॉस्पिटलकरिता पर्वणीच झाली आहे.
ज्यांचे गुडघे वर सांगितल्याप्रमाणे दुखतात, कटकट आवाज करतात, चार पायऱ्या चढायच्या म्हटलं, तर ‘अगोबाई’ अशी चिंता त्रास देते, त्यांनी अजिबात निराश होऊ नये. पथ्य पाण्याचे पुढील नियम पाळले, वजनावर, कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड यावर लक्ष ठेवले, तर आपण लठ्ठपणाची पर्यायाने गुडघ्याची लढाई नक्कीच जिंकू शकतो. ज्वारी, उकडलेल्या बिन मिठाच्या भाज्या, सायंकाळी लवकर व नेहमीपेक्षा निम्मे जेवण, गरम गरम पाणी या जोडीला सकाळ-सायंकाळ महानारायण तेलाचे अभ्यंग, मीठ-गरम पाण्याचा शेक योजावा. लाक्षादि, गोक्षुरादि, सिंहनाद, संधिवातारी, आभादि, गमेश, त्रिफळा गुग्गुळ यांचा सुयोग्य वापर करावा.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत  –  १४ डिसेंबर
१८९२> कवी, कथाकार, नाटककार विठ्ठल कृष्ण नेरूरकर यांचा जन्म. ‘मुलींची शाळा’ ही एकांकिका, नागरिकता वाचनमाला पुस्तक १, २ तसेच साधना व नवा नमुना या कादंबऱ्या. ‘प्रतिबिंबे फोटोचं लग्न नि इतर लघुकथा हे कथासंग्रह, तसेच ‘मधली सुट्टी, माणूस आणि पशू, शिलाचे मोल’ ही लहान मुलांसाठी पुस्तके त्यांनी लिहिली.
१९१८> जागतिक कीर्तीचे योगाचार्य आणि या विषयावरील लेखक बी. के. एस. अय्यंगार यांचा जन्म. आरोग्य योग, योग सर्वासाठी, योग- एक कल्पतरू इ. पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.
१९७७>  गीतरामायणकार या उपाधीने साऱ्या महाराष्ट्राला परिचित असणारे ख्यातनाम गीतकार, पटकथालेखक, कादंबरीकार, आत्मचरित्र लेखक कवी गजानन दिगंबर माडगूळकर यांचे निधन. सुगंधी वीणा हा गीतसंग्रह, जोगिया हे काव्य आणि रामायणावर आधारित  गीतांची मालिका गीतरामायणसह कृष्णाची करंगळी ते चंदनी उदबत्ती मिळून १० कथासंग्रह, आकाशाची फळे, उभे धागे आडवे धागे  या कादंबऱ्या. मंतरलेले दिवस, वाटेवरल्या सावल्या, तीळ-तांदूळ  हे आत्मकथनात्मक लेखन, युद्धाच्या सावल्या हे नाटक अशी त्यांची निर्मिती चित्रपट क्षेत्राबाहेरही बहरली.
– संजय वझरेकर