29 March 2020

News Flash

सावधान, वनस्पतीप्लावक घटताहेत..

सर्वसाधारणपणे समुद्राचा रंग निळा असतो. पण जेथे समुद्राचा रंग निळा असेल तेथे वनस्पतीप्लावक फारच कमी असतात.

समुद्रातले फायटोप्लांक्टन किंवा वनस्पतीप्लावक म्हणजे सूक्ष्म एकपेशीय शैवाल. एक मिलीमीटर जागेत लाखो वनस्पतीप्लावक राहू शकतात, इतके ते सूक्ष्म असतात. वनस्पतीप्लावक सूक्ष्म असले तरी समुद्राच्या अन्नसाखळीत त्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण हे सूक्ष्मजीव समुद्राच्या अन्नसाखळीचा पाया आहेत. अब्जावधी मासे, जेलीफिश, कोळंब्या, समुद्रगोगलगायी, व्हेलसारख्या अवाढव्य जलचरांच्या अन्नाचा ते स्रोत आहेत.

या वनस्पतीप्लावकांना वाढण्यासाठी लागणारा सूर्यप्रकाश आणि फॉस्फेट्स, नायट्रेटॅस, सिलीकेट्ससारखी द्रव्यं समुद्रकिनाऱ्याजवळच्या उथळ पाण्यात भरपूर मिळतात. साहजिकच तिथं त्यांची जोमाने वाढ होते. पण खोल समुद्रात सूर्यकिरणं पोहोचत नसल्यानं तिथे वाढण्यात त्यांना अडचण येते. पण सूर्यप्रकाश जर पोहोचत असेल तर अगदी १२० मीटर खोलीपर्यंतही वनस्पतीप्लावक आढळतात.

सर्वसाधारणपणे समुद्राचा रंग निळा असतो. पण जेथे समुद्राचा रंग निळा असेल तेथे वनस्पतीप्लावक फारच कमी असतात. वनस्पतीप्लावक प्रकाशातला लाल-निळा भाग शोषून हिरवा भाग परावर्तित करतात. त्यामुळे समुद्रात वनस्पतीप्लावकांच्या घनतेनुसार, त्यांच्या प्रकारानुसार समुद्राच्या पाण्याच्या विविध रंगछटा दिसतात.

आपल्याकडे किनाऱ्यावर वनस्पतीप्लावकांची वाढ जास्त होते, त्याचं कारण समुद्रात सोडलं जाणारं सांडपाणी आहे.  सांडपाण्यात साबणातले फॉस्फेट आणि जोडीला सूर्यप्रकाश त्यामुळे त्यांची संख्या वाढू लागते.

संतुलित परिसंस्थेसाठी वनस्पतीप्लावक जरी आवश्यक असले तरी त्यांच्या प्रमाणापेक्षा जास्त वाढीमुळे विषारी द्रव्यं तयार होतात. याशिवाय वनस्पतीप्लावक काही प्रदूषित द्रव्यंही शोषून घेतात. त्याचे दुष्पपरिणाम पुढील अन्नसाखळीतील सजीवांवर आणि अर्थात मानवावरही होतातच.

पण शास्त्रज्ञांच्या चिंतेचा विषय नेमका उलट आहे. किनाऱ्याजवळ वनस्पतीप्लावकांची वाढ प्रमाणाबाहेर असली तरी त्यांची संख्या समुद्रात घटत चालली आहे!  त्यामुळे जलचरांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे.

वनस्पतीप्लावकांच्या घटत्या संख्येचं कारण समुद्राचं वाढतं तापमान हे आहे. २०१० मध्ये ‘नेचर’ या आंतरराष्ट्रीय मासिकात छापून आलेल्या संशोधनानुसार १९५० पासूनच्या साठ वर्षांत वनस्पतीप्लावकांचं प्रमाण ४० टक्क्यांनी कमी झालेलं आहे. २०१४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार वनस्पतीप्लावक दरवर्षी एका टक्क्याने कमी होत आहेत.  एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर अन्नसाखळीचे मूलभूत स्त्रोत कमी होणं, हा एक मोठा चिंतेचा विषय आहे.

– चारुशीला सतीश जुईकर मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2020 12:05 am

Web Title: vegetative phytoplankton micro algae akp 94
Next Stories
1 मनोवेध : तणाव व्यवस्थापन
2 कुतूहल : जागतिक तापमानवाढ
3 मनोवेध : शरीराची युद्धस्थिती
Just Now!
X