१९४५ सालानंतर चेकोस्लोव्हाकियात जहाल कम्युनिस्टांचे सरकार आले. परंतु १९६० च्या दशकात तेथील अर्थव्यवस्था ढासळू लागल्यामुळे पक्षाच्या सेक्रेटरीने तिथे थोडा सौम्य, समाजाभिमुख समाजवाद आणून काही कम्युनिस्टेतर लोकांना सरकारात घेऊन प्रशासकीय बदल केले. ते न  रुचल्याने कम्युनिस्ट देशांनी चेकोस्लोव्हाकियावर आक्रमण करून तिथला कारभार जहाल कम्युनिस्ट नेत्यांच्या हातात सोपवला. या नवीन सरकारने १९६८ पासून देशाच्या औद्योगिक उत्पादन वाढीचे प्रयत्न केले, त्यासाठी त्यांनी जनतेवर दडपशाही केली. या बदलामुळे देशाची अर्थव्यवस्था बऱ्याच प्रमाणात सुधारली. पुढे दोन शतकांनंतर १९८९ मध्ये पूर्व युरोपीय कम्युनिस्ट देश आणि रशियामध्ये तत्कालीन सोव्हिएत नेते मिखाइल गोर्बोचेव्ह यांच्या प्रभावामुळे पक्षात काहीसे लोकशाहीवादी धोरण आले होते. गोर्बोचेव्ह यांनी पक्ष व सरकार यांच्या कार्यपद्धतीत बराचसा सौम्यवाद आणला. त्यांच्या प्रोत्साहनाने चेकोस्लोव्हाकियाच्या कम्युनिस्ट पक्षाने तिथे बहुपक्षीय राजकीय व्यवस्था स्थापन केली. या काळात पूर्व युरोपीय देशांमधून कम्युनिस्ट सरकारांच्या बरखास्तीला सुरुवात झाली होती. चेकोस्लोव्हाकियातही १७ नोव्हेंबर ते २९ डिसेंबर १९८९ या काळात विद्यार्थी आणि कामगार यांनी शांततापूर्ण, अहिंसक निदर्शने आणि मोर्चे काढून देशातील एकपक्षीय कम्युनिस्ट सरकारविरोधी जनमत तयार केले. अखेरीस २८ डिसेंबर १९८९ रोजी चेक अध्यक्ष गुस्ताव हसाक यांनी बिगर कम्युनिस्टांचे हंगामी सरकार नियुक्त करून १९९० मध्ये देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक घेतली. व्हॅल्काव्ह हावेल हे या देशाचे पहिले बिगर कम्युनिस्ट अध्यक्षपदी निर्वाचित झाले. पुढच्या महिनाभरात चेकोस्लोव्हाकियन प्रदेशातून संपूर्ण सोव्हिएत लष्कर बाहेर गेले. हा सत्ता बदल अतिशय शांततापूर्वक, अहिंसक मार्गाने सुरळीत पार पडला, त्यामुळे त्याला ‘वेल्व्हेट रिव्होल्यूशन’ असेही म्हटले जाते! १९४५ ते १९८९ अशी ४४ वर्षे चेकोस्लोव्हाकियात सोव्हिएत युनियनच्या वर्चस्वाखालील एकपक्षीय कम्युनिस्ट सरकार सत्तेवर होते. १९९२ मध्ये या देशात संघीय प्रजासत्ताक सरकार स्थापन झाले. यामध्ये चेक प्रजासत्ताक आणि स्लोव्हॅक प्रजासत्ताकांचा समावेश असल्याने त्याचे नाव चेक अ‍ॅण्ड स्लोव्हॅक फेडरेडिटिव्ह रिपब्लिक असे करण्यात आले. प्राग शहर ही या राष्ट्रसंघाची राजधानी करण्यात आली. – सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com