18 October 2019

News Flash

व्हेनिस.. नवव्या शतकापर्यंत

आठव्या शतकात व्हेनिसचा प्रदेश पूर्वेकडील रोमन साम्राज्य बेझंटाईनच्या अखत्यारीत आला.

इसवी चौथ्या शतकात हूण आणि लोम्बार्ड या जमातींच्या िहसाचारामुळे इटालीच्या ईशान्य भागातील एड्रियाटिक समुद्रकिनाऱ्यावरील भयभीत झालेले लोक एका पाणथळ, दलदलीच्या प्रदेशात पाण्यात लाकडी खांब रोवून त्यावर बांधलेल्या झोपडय़ात राहू लागले. हेच आजचे व्हेनिस. पाचव्या शतकात पश्चिमेकडील मूळ रोमन साम्राज्य उद्ध्वस्त झाले होते. आठव्या शतकात व्हेनिसचा प्रदेश पूर्वेकडील रोमन साम्राज्य बेझंटाईनच्या अखत्यारीत आला. सातव्या शतकाच्या अखेरीला व्हेनिसच्या इतरत्र पसरलेल्या लहानलहान बेटांवरच्या लोकांनी शेजारी उत्तर इटालीतील लोम्बार्ड या राज्याच्या आक्रमणापासून संरक्षण व्हावे म्हणून एक स्थानिक नेता निवडला. या नेत्याला त्यांनी ‘हिपॅटस’ किंवा ‘डक्स’ ही उपाधी दिली. डक्स हा शब्द ‘डय़ूक’ या शब्दावरून आलेला आहे. डक्सचे पुढे ‘डोज’ झाले. अर्स हा पहिला निवडला गेलेला डोज होता. व्हेनिसचे लोक एखाद्याला डोज पदासाठी निवडल्यावर कॉन्स्टंटिनोपल येथील बायझंटाइन सम्राटाची त्यासाठी मान्यता घेत. पहिल्या डोजच्या मृत्यूनंतर डोजपदी थिओडेटो आला. याच्या काळात बेझंटाइन साम्राज्याने उत्तरेतील बराच प्रदेश गमावल्यामुळे उत्तर इटालीत फक्त व्हेनिस हाच परगाणा बेझंटाइन राज्यप्रदेशात शिल्लक राहिला. ७५५ साली गाला गावलो हा व्हेनिसचा डोज झाला आणि त्याच्या काळात व्हेनिस हे स्वतंत्र राज्य बनले. याच काळात व्हेनिसमध्ये तीन प्रकारच्या राजकीय धारणा असलेले लोक होते. व्हेनिस कायम बेझंटाइन साम्राज्यात राहावे, फ्रँक लोकांच्या विचारसरणीचे आणि तिसरा प्रकार म्हणजे व्हेनिसमध्ये प्रजासत्ताक सरकार असावे असे तीन गट होते. डोजची निवड केल्यावर त्याला पोपची मान्यता घेण्याची प्रथा सुरू झाली. डोजची निवड आणि नियुक्ती त्याच्या आयुष्यभरासाठी असे आणि त्याचे मुख्यालय एराक्लिआ या ठिकाणी होते. पुढच्या काळात डोजचे अधिकार, त्याच्या निवडीची पद्धत यात बदल होत गेले. डोजचे पद हे ‘घराणेशाही’ न राहता त्याच्या निवडीसाठी चाळीस लोकांचे मंडळ निर्माण केले गेले. साधारणत: नवव्या शतकाच्या मध्यावर व्हेनिसमधील शासनाला प्रजासत्ताक सरकाराचे स्वरूप आले.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

प्रो. एम. एन. कामत

प्रोफेसर एम. एन. कामत यांचा जन्म रत्नागिरी जिल्हय़ातील उभादांडा येथे ५ मे १८९७ साली झाला. त्यांना लहानपणापासून झाडाझुडपांची आणि बागकामाची आवड होती. त्यांनी १९१९ साली कृषी महाविद्यालय पुणे येथून बी.एजी. ही डिग्री मिळवली. प्रो. कामत यांनी पहिल्या नोकरीची सुरुवात कृषी महाविद्यालय पुणे येथे असिस्टंट मायकोलॉजिस्ट म्हणून केली. त्यांच्या येथील वास्तव्यात सर्वप्रथम त्यांनी उत्तर कोकणातील सुपारीवरील रोगाच्या निर्मूलन आणि नियंत्रणासाठी जनजागृती मोहीम हातात घेतली आणि बोरेक्स मिश्रणाचा वापर करण्याचा प्रघात शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय केला.

प्रो. कामत यांनी वाटाण्यावरील ड्राय राट आणि विल्ट याप्रमाणे िलबावरील गॉयमासिसवर सर्वप्रथम काम करून अनेक निबंध प्रकाशित केले. द्राक्षावरील पावडरी मिल्डू रोग शोधून त्यावर गंधकाच्या पावडरचा शिडकावा करून नाशिक पुण्यातील द्राक्षशेतीचा रोगापासून खात्रीपूर्वक बचाव केला.

प्रा. कामत यांनी मिनिसोटा विद्यापीठातून प्लेंट पॅथालॉजी आणि मायकॉलॉजी या विषयात मास्टर्स पदवी संपादन केली. त्यांनी गव्हावरील तांबेरा रोग आणि ज्वारीवरील स्मट या रोगांच्या निर्मूलनाचे अनेक प्रकल्प राबवले. उदाहरणार्थ मँगो, जिरे, वाटाणा आणि सुपारी यावरील पावडरी मिल्डय़ू रोग. त्यांनी मुंबईमधील कवकांचे ग्रंथरूपात संकलन केले. त्याचप्रमाणे केळ्यांवरील फ्युझेरीयमचा अभ्यास केला.

प्रा. कामत यांनी भातावरील धोकादायक रोग ब्लास्ट ऑफ राइस यावर संशोधनपूर्वक अभ्यास करून प्रतिरोध करणारे वाण शोधून काढले. १९५२ पर्यंत प्रा. कामत कृषी महाविद्यालय पुणे येथे प्लॅन्ट पॅथॉलॉजीचे प्राध्यापक होते. नंतर १९५३ साली त्यांनी प्रॅक्टिकल्स इन प्लॅन्ट पॅथॉलॉजी या विषयावरील त्याचे पहिले पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक या विषयावरील अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरले. कालांतराने प्रा. कामत पुणे विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागात रुजू झाले. त्यानंतर कामत आघारकर संशोधन संस्थेत प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून मायकोलॉजी आणि पॅथालॉजी विभागाचे काम बघू लागले. या वास्तव्यात त्यांनी या संस्थेत ‘स्कूल ऑफ मायकोलॉजीची’ सुरुवात केली. त्यांचे जास्त शोधकार्य अ‍ॅस्कोमाइसीटीसवर होते. त्यांनी कवकाच्या ९ प्रजाती आणि  ३०० जाती स्थापित केल्या. त्यांनी मायकोलॉजी अ‍ॅड प्लॅन्ट  पॅथोलॉजी या विषयावर पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३० विद्यार्थ्यांना एम.एस्सी. आणि पीएच.डी.च्या पदव्या मिळाल्या आहेत.

डॉ. सी. एस. लट्ट 

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

First Published on May 6, 2016 3:59 am

Web Title: venice city
टॅग Venice,Venice City