सुनीत पोतनीस

सासकिया या मूळच्या नेदरलॅण्ड्समधील संगीतकार आणि सेलीस्ट. सेलो म्हणजे व्हायोलिनसारखे दिसणारे पण आकाराने बरेच मोठे असे पाश्चिमात्य संगीतात वापरले जाणारे वाद्य. १९९४ साली त्या भारतात आल्या आणि इथे विवाह करून भारतीयच झाल्या. भारतीय संगीताला वैशिष्टय़पूर्ण योगदान देणाऱ्या सासकिया राव दिल्लीत स्थायिक झालेल्या आहेत.

नेदरलॅण्ड्समधील अ‍ॅबकूड येथे १९७१ साली एका संगीतप्रेमी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. संगीताची उपजत आवड आणि घरातल्या लोकांच्या प्रोत्साहनामुळे सासकियाला तिच्या शालेय जीवनात अनेक वाद्यांची जाणकारी झाली होती. पण त्यापैकी तिचा कल सेलोकडेच अधिक होता. अ‍ॅमस्टरडॅमचे प्रसिद्ध हंगेरियन सेलोवादक टिबर डी मेहुला यांच्याकडे सासकियाने सेलोवादनाचे प्राथमिक धडे गिरवल्यावर पुढे अ‍ॅमस्टरडॅम विद्यापीठातून विभिन्न  मानववंशांचे संगीतशास्त्र या विषयात मास्टर्सपर्यंत शिक्षण घेतले. या काळात भारतीय अभिजात संगीतविषयक काही माहिती तिच्या वाचनात आली आणि त्याबाबत एक गूढ आकर्षण निर्माण होऊन तिने भारतीय संगीत शिकण्याचा निर्धार पक्का केला.

नेदरलॅण्ड्समध्येच रोटरडॅम येथील संगीत संवर्धन संस्थेत प्रसिद्ध भारतीय बासरीवादक आणि संगीतज्ञ हरिप्रसाद चौरसिया आणि कौस्तुव रे हे वर्षांतले चार महिने येऊन शिकवत असत. ही संधी साधून सासकियांनी चौरसियांकडून भारतीय संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. पुढे हरिप्रसाद चौरसियांच्या सल्ल्याप्रमाणे सासकिया भारतीय संगीत अधिक बारकाईने शिकण्यासाठी १९९४ साली भारतात प्रथम आल्या त्या दिल्लीत.

संगीतज्ञ डॉ. सुमती मुटाटकर यांच्याकडे त्यांनी रागदारी संगीताचे शिक्षण घेतले. सासकियांना भारतात येऊन इथले संगीत शिकण्यात ज्या अनेक अडचणी होत्या त्यात प्रमुख होती भाषेची. त्या मूळच्या नेदरलॅण्ड्सच्या असल्यामुळे त्यांचं इंग्रजी यथातथाच होतं आणि िहदीचा तर गंधच नव्हता. संगीत शिक्षणाबरोबरच त्यांनी िहदीचीही शिकवणी लावली होती. विद्यापीठाकडून मिळालेल्या शिष्यवृत्तीमुळे त्यांचा आर्थिक प्रश्न मिटला होता.