25 April 2019

News Flash

आठवणींची मालिका

आपल्या मनात असंख्य आठवणी असतात. चांगल्या-वाईट, मजेदार कशाही! पण आठवणींचा असा काही एक अल्बम नसतो.

आपल्या मनात असंख्य आठवणी असतात. चांगल्या-वाईट, मजेदार कशाही! पण आठवणींचा असा काही एक अल्बम नसतो. कपाटातून एखादा अल्बम काढला आणि तो बघत बसलो, असं काही होत नाही. ज्या घटना आपल्या लक्षात राहिलेल्या आहेत, त्या एखाद्या फोटोसारख्या स्मरणात गेलेल्या नसतात. तर आठवणींची साठवण करण्यात विविध पेशींनी काम केलेलं असतं. एक आठवण सांगायची तर अनेक क्षेत्रं कामाला लागतात.

घडून गेलेल्या आठवणी आपण कोणाला सांगत असतो तेव्हा तर अक्षरश: मेंदूच्या आत – विशेषत: हिप्पोकॅम्पसमध्ये उत्सव चाललेला असतो.

आपण एखादा सिनेमा बघत असतो तेव्हा काय घडतं? दृश्यं एकापुढे एक सरकत जातात. त्या दृश्यातलं घर, घरातल्या वस्तू, तिथली विविध माणसं, त्यांचा अभिनय हे सगळं दिसत असतं. पात्रांचे आवाज, पाश्र्वसंगीत ऐकू येत असतं. पण आपल्याला माहीत असतं की या दृश्यातलं घर म्हणजे एक सेट असतो. माणसांचा आवाज नंतर डब केलेला असतो. पाश्र्वसंगीत विविध व्यक्तींनी मिळून तयार केलेलं असतं. पण तरीही ते दृश्य परिणामकारक करतं.

साधारणपणे तेच आपल्या आठवणींच्या बाबतीत घडतं.

व्हिजुअल कॉर्टेक्स हा भाग घडलेल्या घटनेतलं फक्त चित्र नजरेसमोर उभं करतं.   या चित्रात रंग भरण्याचं काम रंगपेशी करतात.   तेव्हा जर काही संवाद घडले असतील, तर ते ऑडिटरी कॉर्टेक्समधून आठवून बोलण्याच्या केंद्राकडे पाठवले जातात.  संवाद नसतील, नुसतेच ठळक आणि वैशिष्टय़पूर्ण आवाज असतील तर ते ही ऑडिटरी कॉर्टेक्स पुरवतं.  अशा प्रकारे आकार, वास, चव, स्पर्श, हालचाल यांसाठीच्या विविध क्षेत्रांमधल्या पेशी कामाला लागतात. अत्यंत वेगात आणि सफाईदारपणे हे काम चालतं. या लगबगीतून त्या प्रसंगाचं संपूर्ण चित्र तयार होतं. एकापुढे एक अशी चित्रांची मालिकाच उलगडली जाते. हे काम कधी कधी अखंडपणे, कोणताही अडथळा न येता चालू राहतं. कधी कधी मधले तुकडे आठवत नाहीत. त्या आठवणी पुन्हा जोडायला वेळ लागतो. पण एखाद्या सेकंदात पुन्हा काम सुरू होतं. अशा कितीतरी दृश्य-मालिकारूपी आठवणींचा खजिना मेंदूने साठवून ठेवलेला असतो. एखादी विशिष्ट आठवण सांगून संपली की मग ती मालिकाही आपोआप खंडित होते.

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com

First Published on January 28, 2019 1:46 am

Web Title: visual cortex