News Flash

विश्वनाथ सत्यनारायण

आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्य़ातील नन्दुनूर या गावी ०६ ऑक्टोबर १८९५ रोजी त्यांचा जन्म झाला.

विश्वनाथ सत्यनारायण हे तेलुगु साहित्यातील एक वादग्रस्त व दबदबा असलेलं, जबरदस्त व्यक्तिमत्त्व. भारतीय ज्ञानपीठाचा १९७० चा साहित्य पुरस्कार विश्वनाथ सत्यनारायण यांना त्यांच्या ‘रामायण कल्पवृक्षमु’ या काव्यरचनेसाठी प्रदान करण्यात आला. ही साहित्यकृती १९५५ ते १९६३ या कालावधीत प्रकाशित, भारतीय सृजनात्मक साहित्यामध्ये सर्वश्रेष्ठ ठरविण्यात आली. तेलुगु साहित्यक्षेत्रात त्यांना ‘कवीसम्राट’ म्हणतात. आपल्या कविता गाऊन, त्या रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा गायक कवी म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. कवितेप्रमाणेच त्यांनी कादंबरी, नाटक, निबंध, समीक्षा लेखनही केलं आहे. त्यांची १००हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पुरातन संस्कृतीतील शाश्वत मूल्यांची त्यांनी श्रद्धेने जोपासना केली असून, तेलुगु साहित्यात त्यांनी, आपले एक विशिष्ट स्थान निर्माण केले आहे.

आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्य़ातील नन्दुनूर या गावी ०६ ऑक्टोबर १८९५ रोजी त्यांचा जन्म झाला. वडील शोभानाद्री हे हरिकथाकार, वैदिक ब्राह्मण होते. आई-वडिलांकडून त्यांना केवळ ईश्वरभक्तीचा वारसा मिळाला!   इंग्रजी शिक्षण घेऊन, चांगली नोकरी मिळवून मुलानं कुटुंबाची गरिबी दूर करावी, यासाठी वडिलांनी दूरच्या,  मछलीपट्टनम् या गावी छोटय़ा विश्वनाथला धाडलं. त्या शाळेत प्रसिद्ध तेलुगु कवी चैल्लपिल्ल वेंकटशास्त्री हे तेलुगु विषयाचे शिक्षक होते. त्यांच्या सहवासात, तेलुगु साहित्याने प्रेरित होऊन त्यांनी वयाच्या ११व्या वर्षी काव्यलेखनास सुरुवात केली. तेलुगु,  संस्कृत व इंग्रजी भाषांवर प्रभुत्व संपादन करून, तेलुगु व संस्कृतमध्ये काव्यलेखनही केलं. या सुरुवातीच्या कवितांमध्ये सौंदर्य, प्रेम आणि भक्तीचा संगम दिसतो. १९१५ मध्ये ते मॅट्रिक आणि १९१९ मध्ये  बी. ए. झाले. मद्रास विद्यापीठातून त्यांनी एम. ए. पदवी संपादन केली. याच सुमारास ते म. गांधींच्या असहकार चळवळीत सहभागी झाले. तुरुंगवासही भोगला. त्यानंतर ते मछलीपटनम्च्या नॅशनल कॉलेजमध्ये व गुंतूर (विजयवाडा) येथील पदवी महाविद्यालयात तेलुगुचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. काही काळ ते करीमनगर येथील शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य होते. ते कविश्रेष्ठ, पण ६० कादंबऱ्या, १५ नाटकं, ७ समीक्षा यांसह १११ ग्रंथांचे लेखन त्यांनी केलं आहे.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

रक्तदाबाचं मापन

पाऊस, वारे, वादळं यांचं पूर्वानुमान करताना हवेच्या दाबाचं आणि हवेच्या दाबातील फरकाचं मापन करणं आवश्यक ठरतं. विमान वाहतुकीसाठीसुद्धा हवेच्या दाबाचं मापन आवश्यक ठरतं. अर्थात, दैनंदिन जीवनात वायूंच्या दाबाबरोबरच द्रवाच्या दाबाचंही मापन केलं जातं. याबाबतीत आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं उदाहरण द्यायचं तर रक्तदाबाचं देता येईल.

आपल्या शरीरात ठरावीक दाबाने रक्त प्रवाहित असतं. या दाबाला ‘रक्तदाब’ म्हणतात. रक्तदाब वाढला किंवा कमी झाला तर त्या व्यक्तीला त्रास होतो.

१६२८ साली विल्यम हार्वे यांनी रक्ताभिसरणाचा शोध लावल्यानंतर तब्बल शंभर वर्षांनंतर म्हणजे १७३२ मध्ये इंग्लिश धर्मोपदेशक स्टीफन हेल्स यांनी शरीरातलं रक्त दाबाखाली प्रवाहित असतं हे सप्रयोग दाखवून दिले. याकरिता त्यांनी एका जिवंत घोडय़ावर प्रयोग केले.

रक्तदाब मोजण्यासाठी ‘रक्तदाबमापक’ वापरला जातो. रक्तदाब मोजण्यासाठी सर्वसाधारणपणे पाऱ्याचा रक्तदाबमापक वापरतात. यामध्ये रक्तदाब हा पाऱ्याच्या स्तंभाच्या आधारे मोजला जातो.

या उपकरणामध्ये सुमारे १२ सेंटिमीटर बाय २० सेंटिमीटर आकाराची रबरी पिशवी एका कापडी पिशवीत बसवलेली असते. रबरी पिशवीला दोन नळ्या जोडलेल्या असतात. त्यापकी एक नळी रक्तदाबमापकाला आणि दुसरी नळी छोटय़ा रबरी हातपंपाला जोडलेली असते. पंपाजवळ असलेल्या व्हॉल्व्हच्या मदतीने पिशवीतली हवा बाहेर सोडता येते. रक्तदाब मोजण्यासाठी व्यक्तीच्या दंडाभोवती रबरी पिशवी गुंडाळून घट्ट बसवतात आणि नंतर हातपंपाने तिच्यात हवा भरतात. या हवेच्या दाबामुळे रक्तवाहिनीतला रक्तप्रवाह अडवला जातो. हाताच्या कोपराच्या सांध्याच्या पुढे स्टेथोस्कोप ठेवून डॉक्टर हळूहळू पिशवीतली हवा सोडतात. त्यामुळे पुन्हा रक्तप्रवाह सुरु होतो आणि त्याचा विशिष्ट आवाज स्टेथोस्कोपमधून ऐकायला येतो. आवाज ऐकू आला त्या वेळी रक्तदाबमापकातील पारा ज्या अंकावर असेल तो त्या व्यक्तीचा ‘आकुंचक’ किंवा ‘वरचा रक्तदाब’ (सामान्यत: १२० मिमी) असतो. आवाज नंतर हळूहळू नाहीसा होतो. ज्या वेळी आवाज पूर्णपणे नाहीसा होतो त्या वेळी रक्तदाबमापकातील पाऱ्याचा स्तंभ ‘प्रसरणात्मक’ किंवा ‘खालचा रक्तदाब’ (सामान्यत: ८० मिमी) दर्शवतो.

ने-आण करण्यासाठी सुलभ असलेला डिजिटल रक्तदाबमापकसुद्धा आता उपलब्ध आहेत. या रक्तदाबमापकावर रक्तदाब किती हे थेट दिसतं.

– हेमंत लागवणकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2017 2:42 am

Web Title: viswanatha satyanarayana
Next Stories
1 हवादाबमापकाचे काही प्रकार
2 पाऱ्याचा हवादाबमापक
3 कुतूहल  : दाबमापनाची एकके
Just Now!
X