वॉिशग्टन डी.सी.मधील अमेरिकन फेडरल गव्हर्न्मेंटच्या मुख्यालयाची इमारत बांधून झाल्यावर निराळे चर्च बांधून होईपर्यंत कॅपिटॉलच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हच्या सभागृहातच रविवारी चर्च भरत असे. अध्यक्ष थॉमस जेफरसन सोमवार ते शनिवारी या सभागृहात हॉऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हची सभा भरवीत तर त्याच जागेत रविवारी चर्च म्हणून माससाठी येत. या सभागृहात ४४८ सभासदांची बसण्याची व्यवस्था आहे. डी.सी. म्हणजे डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया हे अमेरिकन संयुक्त संस्थानांचे शहर किंवा संघराज्य नसून मेरीलँड आणि व्हर्जििनया या दोन संघराज्यांमधल्या काही प्रदेशांचे विलीनीकरण करून अमेरिकन संयुक्त राज्यसंघांच्या राजधानीसाठी केलेली विशेष व्यवस्था आहे. डी.सी.च्या अंतर्गत वाहतुकीसाठी अ‍ॅमट्रक ही रेल्वे सेवा आहे. चार रेल्वेमार्ग असलेल्या अ‍ॅमट्रक सेवेचे एकूण ७२ कि.मी. लांबीचे लोहमार्ग आहेत. वॉिशग्टन मेट्रोपॉलिटन एरिया ट्रान्झिट अथॉरिटीच्या नियंत्रणाखाली सार्वजनिक बससेवा चालविली जाते. डी.सी.मधील एकूण प्रवासी वाहतुकीच्या चाळीस टक्के वाहतूक ही बससेवा करते. हवाई सेवेसाठी डी.सी.मध्ये एकूण तीन विमानतळ आहेत. रोनॉल्ड रिगन एअरपोर्ट, डय़ूल्स इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि बाल्टिमोर इंटरनॅशनल एअरपोर्ट. डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाच्या विधिमंडळावर तेरा निर्वाचित सदस्य असतात. मेयरची निवडसुद्धा सार्वजनिक मतदानातून होते. डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाला सिनेटमध्ये प्रतिनिधित्व नसते. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये डी.सी.चे प्रतिनिधी असतात, परंतु त्यांना मर्यादितच अधिकार असतात. अमेरिकन संयुक्त संस्थानांचे अध्यक्षीय निवासस्थान ‘व्हाइट हाऊस’चे बांधकाम इ.स. १७९२ ते १८०० या काळात झाले. जॉन अ‍ॅडम्स हे इथे राहावयास आलेले पहिले अमेरिकन अध्यक्ष.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
प्रतिकूल परिस्थितीतील अस्तित्व
कमळ व पद्मकमळासारख्या वनस्पती जलाशयात तळाशी असलेल्या चिखलात आपले खोड व मुळे रोवून असतात. त्यांची पाने पाण्याच्या पृष्ठभागाच्या बाहेर येतात. याकरिता त्यांच्या देठाची वाढ साधारण मीटरभर होते. रामबाण, नागरमोथा अशा चिखलात वाढणाऱ्या वनस्पतींची खोडे जमिनीलगत किंवा जमिनीत आडवी वाढतात. मुळे चिखलात रुतलेली तर पाने-फुले वगरे चिखलाबाहेर हवेत तरंगत असतात.
शुष्क किंवा अति कोरडय़ा वातावरणात वाढणाऱ्या वनस्पतींचे आपल्या अस्तिवासाठी खास अनुकूलन दिसून येते. आरटेमिसिया, अ‍ॅस्ट्रागलस अशा काही वनस्पती या अल्पजीवी असल्यामुळे पाण्याचे अति दुíभक्ष असलेल्या काळात त्या बीजरूपाने किंवा फळांच्या स्वरूपात निद्रिस्त राहतात आणि सुयोग्य काळात रुजतात, वाढतात, फळतात आणि जीवनचक्र अल्पकाळात पूर्ण करतात. याच प्रदेशात आढळणाऱ्या इतर वनस्पतींमध्ये पाण्याच्या अभावासोबत जगण्यासाठी विशेष अनुकूलन आढळते. या वनस्पतींचे जमिनीवरील अवयव खोड, फांद्या व पाने तुलनेने खुजे असतात. या कारणांमुळे श्वसनरंध्रे असलेल्या पृष्ठभागाचा विस्तार कमी होऊन बाष्पोच्छ्वासाचे प्रमाण घटते. अशा वनस्पतीत श्वसनरंध्रे त्यांच्या त्वचेत खोलवर वसलेली असतात किंवा त्यांच्यावर रक्षक अशा रोमांचे आच्छादन असते. अर्थात त्यामुळे बाष्पोच्छ्वसन कमी होते व त्यांच्या शरीरातील पाण्याचे जतन होते. या वनस्पतींचे खोड कडक असून त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत व चकाकणाऱ्या त्वचेचा असतो तो तीव्र सूर्यप्रकाश परावíतत करतो. त्यामुळे झाडाच्या तापमानात वाढ होत नाही.
साधा निवडुंग, फण्या निवडुंग, म्युहलेनबेकिया, रसकस, सुरू आणि शतावरी या वनस्पतींत पाण्याच्या अभावामुळे पानांची धारणा केली जात नाही. प्रकाशसंश्लेषण आणि अन्ननिर्मितीचे कार्य हिरव्या रंगाची खोडेच करतात. फडय़ा निवडुंगात पानांच्या जागी काटे असून पानाप्रमाणे पसरट खोडावर काटय़ांच्या तळाला श्वसनरंध्रे खोलवर वसलेली असतात. शिवाय खोडामध्ये पाणी साठवणारे पेशीजाल पानांचे कार्य करणाऱ्या अशा खोडांना ‘फायलोक्लेड’ ही संज्ञा आहे.
एखाद्या प्रदेशातील हवामान सहन न झाल्यास प्राणी स्थलांतर करू शकतात. अशा परिस्थितीत वनस्पतींकडे एकच पर्याय असतो तो म्हणजे वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी स्वत:मध्ये बदल घडवून आणणे. असे जर जमले नाही तर वनस्पती नाश पावतात.
– डॉ. रंजन देसाई
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org