News Flash

कुतूहल : पाण्यामुळे पेटणारा धातू

आग विझवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यामुळे आग लागू शकते, ही विसंगती वाटते; पण ते सत्य आहे.

(संग्रहित छायाचित्र)

हेमंत लागवणकर

आग विझवण्यासाठी पाणी वापरतात, हे आपल्याला माहिती आहे; पण पाण्यामुळे आग लागू शकते का? या प्रश्नाचं उत्तर ‘हो’ असं आहे. आग विझवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यामुळे आग लागू शकते, ही विसंगती वाटते; पण ते सत्य आहे.

आवर्तसारणीच्या सगळ्यात डाव्या बाजूच्या म्हणजे पहिल्याच उभ्या स्तंभात लिथिअम, सोडिअम, पोटॅशिअम, रुबीडिअम, सिझिअम ही मूलद्रव्यं आहेत. या मूलद्रव्यांची पाण्याबरोबर रासायनिक अभिक्रिया होते आणि ही अभिक्रिया स्फोट घडवून आणू शकते. जसजसं लिथिअमपासून सिझिअमपर्यंत खाली जावं, तसतशी पाण्याबरोबर होणारी या मूलद्रव्यांची अभिक्रिया अधिकच स्फोटक होत असल्याचं आढळतं. यामागचं कारण म्हणजे ही सगळी मूलद्रव्यं अल्कली धातू आहेत आणि अत्यंत क्रियाशील आहेत. पाण्याबरोबर त्यांची अभिक्रिया होऊन मुक्त होणारा हायड्रोजन वायू स्फोट घडवून आणण्यास कारणीभूत ठरतो. पोटॅशिअम, रुबीडिअम आणि सिझिअम ही मूलद्रव्यं पाण्यात टाकल्याबरोबर पेट घेतात.

या सगळ्या अल्कली धातूंच्या खाली म्हणजे सिझिअमनंतर आणखी एक मूलद्रव्य आहे आणि ते म्हणजे फ्रान्सिअम. सर्व अल्कली धातूंच्या तुलनेत फ्रान्सिअम अर्थातच जास्त क्रियाशील आहे. शिवाय, हा अल्कली धातू किरणोत्सारी आहे. त्यामुळे पाण्याचा केवळ एक थेंब जरी पडला तरी प्रचंड मोठा स्फोट होऊन आग लागू शकते. अर्थात, इतर अल्कली धातूंप्रमाणे पाण्याबरोबर फ्रान्सिअमची अभिक्रिया किती विस्फोटक होते हे प्रत्यक्ष प्रयोग करून पाहिलेलं नाही. यामागचं कारण म्हणजे फ्रान्सिअम हे मूलद्रव्य अ‍ॅस्टेटाइनखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे दुर्मीळ मूलद्रव्य आहे. नसíगकरीत्या ते युरेनिअमच्या खनिजांमध्ये सापडतं. फ्रान्सिअमची चाळीसपेक्षा जास्त समस्थानिकं ज्ञात आहेत; पण सगळ्यात स्थिर असलेल्या फ्रान्सिअम-२२३ या समस्थानिकाचा अर्धायुष्य काल हा जेमतेम २२ मिनिटांचा आहे. साहजिकच, पृथ्वीच्या कवचात एका ठरावीक वेळी केवळ ३५० ते ५५० ग्रॅम फ्रान्सिअम उपलब्ध असतं.

इतक्या कमी प्रमाणात आणि अत्यंत कमी कालावधीसाठी उपलब्ध असणाऱ्या या मूलद्रव्याचे अनेक रासायनिक आणि भौतिक गुणधर्म प्रत्यक्ष प्रयोग करून शास्त्रज्ञांना अजूनही अभ्यासता आलेले नाहीत.

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 2:34 am

Web Title: water bone metal
Next Stories
1 जे आले ते रमले.. : जस्टिन अ‍ॅबट (१)
2 कुतूहल : ‘फ्रान्सिअम’ आणि मार्गारेट पेरी
3 हिंदू धर्मग्रंथांचे अभ्यासक चार्ल्स विल्किन्स (२)
Just Now!
X